ॲल्डर: (लॅ. ॲल्नस कुल – बेट्युलेसी ). हे नाव अमेरिकेत वाढणाऱ्या काही लहान पानझडी व शोभिवंत वृक्षांना दिले आहे. ते जलद वाढणारे व साधारणत: ६–२५ मी. उंचीचे असून प्रवाहाच्या किंवा दलदलीच्या काठी बहुधा आढळतात. यांच्या एकूण ३५ जाती ॲल्नस या वंशात समाविष्ट आहेत. यांची अनेक शारीरिक लक्षणे बेट्युलेसी कुलातील ⇨बर्च प्रमाणे आहेत. याला मार्च-एप्रिलमध्ये पाने येण्यापूर्वी एकलिंगी, हिरवट किंवा पिवळट लोंबत्या कणिशासारखे फुलोरे येतात. स्त्री-कणिशे आखूड व पक्वावस्थेत लंबगोल शंकूप्रमाणे दिसतात. फळ लहान व कवचयुक्त (कपालिका). यांचे लाकूड पिंगट, घट्ट, बळकट, मॅहॉगनी किंवा काळ्या अक्रोडासारखे असून सजावटी सामान, हत्यारांचे दांडे इ. वस्तूंकरिता उपयुक्त आहे. भारतात वायव्य हिमालय व पंजाब येथे ‘कुनिस’ व ‘सारोली’ या हिंदी नावांनी ओळखला जाणारा मोठा (सु. ३० मी. उंच) वृक्ष (ॲ. निटिडा ) यांपैकीच असून त्याचे तपकिरी भुरे, नरम व हलके लाकूड खाटा, चाके, घरबांधणी इत्यादींकरिता आणि विशेषत: आगकाड्यांकरिता साल टॅनीन व रंग ह्यांकरिता व फांद्या टोपल्या— परड्यां- करिता वापरतात. कोवळ्या फांद्यांवर रोझीनसारखा पदार्थ झिरपून राहतो. ॲल्डरच्या आणखी एका जाती- च्या (ॲ. नेपालेंसिस ) मोठ्या पानझडी वृक्षाचा हिमालयाच्या कडेने उत्तर ब्रह्मदेशापर्यंत प्रसार झालेला आहे. आसाम व डोंगराळ भागात याला विशेष महत्त्व आहे. याचे लाकूड मऊ, हलके, करडे व उपयुक्त आहे.
पहा : बेट्युलेसी
परांडेकर, शं. आ.
“