अमेरिकन इंडियन भाषासमूह : उत्तर, दक्षिण व मध्य अमेरिकेत तिथल्या मूळ रहिवाशांकडून बोलल्या जाणार्‍या असंख्य भाषा आहेत. त्यांना ‘अमेरिकन इंडियन’ किंवा ‘अमेरिंड’ भाषा म्हणतात. पण ही संज्ञा केवळ भौगोलिक आहे. या भाषा रचनात्मक किंवा इतर दृष्टींनी एकाच कुटुंबातल्या नसून त्यांच्यात भाषिक दृष्टीने जवळजवळ सर्व प्रकार आढळतात. तुलनात्मक व्याकरणाच्या सिद्धांतानुसार काही विद्वानांनी त्यांचा अभ्यास चालवला असून त्यामुळे त्यांतील कोणत्या भाषा एकमूलक असाव्यात आणि त्यांचे व्याप्तिक्षेत्र कुठपर्यंत असावे, हे ठरविणे शक्य झाले आहे. तसेच भाषिक संपर्काच्या प्रश्नावर त्यामुळे काही प्रकाश पडू शकतो.

या सर्व भाषांचे मूळ एकच आहे किंवा आज मान्य करण्यात आलेल्या वेगवेगळ्या अमेरिंड भाषाकुटुंबांचा एकमेकांशी काही संबंध नाही, याबद्दल निश्चित विधान करणे उपलब्ध साधनांच्या आधारे अजून शक्य झालेले नाही. सपीर व रीव्ह हे एकमूलकत्व सिद्ध करता येईल असे मानणाऱ्या आशावाद्यांपैकी असून हॅरी हॉयर यांचा उत्साह या बाबतीत जास्त संयमित आहे.

सोळाव्या शतकाच्या प्रारंभाला या भाषांची संख्या ९०० पर्यंत असावी आणि त्या बोलणार्‍या लोकांची संख्या दोन कोटींच्या आसपास असावी, असा अंदाज आहे. त्यांची वाटणी जवळजवळ शंभर वेगवेगळ्या कुटुंबांत करता येते. यूरोप किंवा आशियामधल्या भाषिक परिस्थितीशी तुलना करता ही संख्या फार मोठी वाटते. पण या गोलार्धातील लोक एकमेकांपासून शतकानुशतके वेगळे राहिलेले होते आणि सुधारणेच्या दृष्टीनेही फार पुढे गेलेले नव्हते, हे लक्षात घेतले म्हणजे आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. त्यामुळे प्रतिष्ठा असणार्‍या सांस्कृतिक भाषा निर्माण होऊन इतर प्रदेशांत पसरण्याची आणि भाषिक वर्चस्व स्थापन करण्याची शक्यता नव्हाती. पेरूमध्ये क्वेच्वा आणि मेक्सिकोत नाहुआत्ल यांनी अशा प्रकारचे वर्चस्व मिळवायला सुरुवात केली होती पण त्याच सुमाराला सुरू झालेल्या यूरोपीय आक्रमकांच्या सामर्थ्यापुढे त्यांचा निभाव लागू शकला नाही.

इतर अमेरिंड भाषांच्या मानाने उत्तर अमेरिकेतील अमेरिंड भाषांचा अभ्यास बराच पुढे गेला आहे. इतरत्र तो अजून मागे आहे. काही भाषा त्यांचा अभ्यास होण्यापूर्वीच नष्ट झाल्या आहेत. तुलनात्मक अभ्यासाचे पाऊल मात्र, मंद गतीने का होईना, पुढे पडत आहे.

या भाषांच्या प्रचंड संख्येमुळे आणि त्यांच्यातील विविधतेमुळे त्यांतील प्रत्येकीचे वर्णन देणे शक्य नाही. पण भौगोलिक वाटणीनुसार त्यांची नावे देऊन काही महत्त्वाच्या वैशिष्ट्यांचा उल्लेख करणे सोयीचे ठरेल. 

भाषांचा अगदी निश्चित आकडा आणि भाषिकांची संख्या देता येणार नाही. यूरोपीय लोकांबरोबर झालेल्या संघर्षात आणि त्यांच्या राजकीय व सांस्कृतिक वर्चस्वामुळे अनेक भाषा नष्ट झाल्या अनेक नष्ट होण्याचा मार्गावर आहेत. ज्या टिकून आहेत त्यांचे शब्दभांडार किंवा त्या स्वतः, इंग्रजी, स्पॅनिश व पोर्तुगीज यांतील शब्दांच्या अखंड उसनवारीमुळे किंवा या भाषांचा व्यवहारभाषा म्हणून उपयोग करू लागल्यामुळे, धोक्यात आहेत. या यूरोपीय भाषांनीही अर्थात अमेरिंड भाषांतून कमी-अधिक प्रमाणात उसनवारी केलेली आहे. अशा शब्दांची संख्या मेक्सिको व पेरूतील स्पॅनिश भाषेत अधिक आहे.

उत्तर अमेरिकेत अगदी उत्तरेकडचा व नैर्ऋत्येकडच्या भाग सोडल्यास उरलेल्या अमेरिंड-भाषिकांना इंग्रजीही येत असते, त्यामुळे त्यांच्या भाषांचे महत्त्व घटत चालले आहे. ही गोष्ट फ्रेंच, पोर्तुगीज किंवा स्पॅनिश या भाषिकांच्या निकट सहवासात असलेल्या अमेरिंड भाषांनाही लागू आहे.

दक्षिण अमेरिकेत मात्र दक्षिण मेक्सिको, ग्वातेमाला, पेरू व बोलिव्हियाचा डोंगराळ भाग आणि पॅराग्वाय या प्रदेशांत अमेरिंड-भाषिकांची संख्या मोठी आहे. काही जमातींत तर ती वाढत आहे.

या भाषा पूर्णपणे नष्ट होण्याची शक्यता निदान नजीकच्या भविष्यकाळात तरी नाही. काही ठिकाणी अशा जमातींना केवळ स्थानिक महत्त्वच आहे, तर पेरूतील क्वेच्वा, बोलिव्हियातील आयमारा, पॅराग्वायमधील ग्वारानी या राष्ट्रीय महत्त्वाच्या जमाती आहेत.

या भाषिक विविधतेमुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या. मायभूमी सोडून बाहेर पडणाऱ्या इंडियनांना त्यांना तोंड द्यावे लागले. प्‍वेब्‍लोसारख्या काहींनी आपल्या भाषेव्यतिरिक्त इतर भाषा शिकून घेतल्या आणि ते बहुभाषिक बनले, तर नव्हाहोसारख्या जमातींनी इतर कोणतीही भाषा शिकण्याकडे लक्ष दिले नाही.

पेरूत इंका संस्कृतीच्या सरकारने क्वेच्वाच्या प्रसाराला पाठिंबा दिला आणि त्यासाठी परभाषिकांना जरूर तर स्थलांतर करायला लावले. मेक्सिकोत तॉल्तेकांच्या मागून आलेल्या ॲझटेकांनी नाहुआत्लला सांस्कृतिक भाषा बनविण्याचा प्रयत्‍न केला.

ब्राझीलमध्ये तुपीच्या एका पोटभाषेवर संस्कार करून धर्मप्रसारकांनी तिचा आपल्या कार्यासाठी उपयोग केला. या कृत्रिम भाषेमुळे श्वेतवर्णीय व इंडियन यांच्यातले दळणवळण सुलभ व्हायला मदत झाली. पण पोर्तुगीजच्या वाढत्या वर्चस्वामुळे तिचा टिकाव लागेल असे वाटत नाही. चॉक्टॉ, चिनूक यांसारख्या भाषा सामान्य भाषा म्हणून त्या त्या प्रदेशांत वापरल्या जात.

प्रगतीच्या विशिष्ट मर्यादेनंतर केवळ बोलण्याव्यतिरिक्त इतर एखादे साधन आशयभिव्यक्तीसाठी लागते आणि ते दृश्य असते. खाचा पाडलेल्या काठ्या व गाठ मारलेल्या दोऱ्या पूर्व व पश्चिम गोलार्धांत विशिष्ट अर्थसूचक म्हणून वापरण्यात येत. पण पेरू व बोलिव्हिया या देशांत ही पद्धत जास्त पुढे गेली होती. निरनिराळ्या रंगांच्या दोऱ्यांना विशिष्ट ठिकाणी एक किंवा अनेक गाठी मारून या संकेताचा उपयोग हिशेब ठेवण्याकडे किंवा गणित करण्याकडे केला जाई.

उत्तर अमेरिकेत चित्रलेखन बरेच होते. त्याचा उपयोग गतगोष्टींच्या स्मरणार्थ व प्राचीन साहित्याच्या पाठांतराला मदत करण्यासाठी होत असे. या चित्रलेखनाची प्रगती मेक्सिकोच्या दक्षिण भागात बरीच झालेली होती आणि तिथे त्यासाठी एक प्रकारचा कागद किंवा हरिणाचे कात़डे वापरण्यात येत असे.

ॲझटेक साम्राज्याच्या प्रदेशात सापडलेली हस्तलिखिते धर्मविधीसंबंधी आहेत. त्यांत कित्येकदा खंडण्यांचे हिशेब (त्यांच्या अनुषंगाने संख्यादर्शक चिन्हे) आणि ऐतिहासिक माहितीही आढळते.

माया [ →माया भाषासमूह] लोकांची तीन हस्तलिखिते व काही कोरीव लेखनही उपलब्ध आहे. त्यांचे वाचन अंशतःच करता आलेले आहे. त्यांत वापरलेली पद्धत कल्पनालेखनाची, क्वचित अवयवलेखनाची आहे.

स्पॅनिश लोकांच्या वर्चस्वाखाली असलेल्या मेक्सिकोत रोमन वर्णलेखनाचा प्रवेश झाल्यामुळे चित्रलेखन व कल्पनालेखन मागे पडले. चित्रलिपीचा उपयोग काही धर्मोपदेशकांनी प्रार्थनांची सूचक चिन्हे म्हणून केला. काही अभ्यासकांनी अवयवलेखनाचाही उपयोग केला आहे. अशा लोकांत जॉर्ज गेस, जेम्स एव्हान्झ, मेसन व मॉरिस ही नावे प्रमुख आहेत. या भाषांचा अभ्यास करणाऱ्या भाषाशास्त्रज्ञांनी मात्र ध्वनिलेखनाचा उपयोग केला आहे.

या भाषांत साहित्यनिर्मिती करण्याचे श्रेय ख्रिस्ती धर्मोपदेशकांना जाते. ही निर्मिती बायबलच्या भाषांतरांची आहे. मात्र याशिवाय नव्या लेखनपद्धतीचा उपयोग करून तेथील लोकांनी स्वतःच्या दंतकथा, पूर्वजांच्या गोष्टी, रूढी-समजुती इ. विषयीचे साहित्य निर्माण केले आहे. प्राचीन इतिहासाबद्दल मिळणाऱ्या माहितीचा उगम अशा लेखनात आहे.


भाषांची भौगोलिक वाटणी : यूरोपीय लोकांशी प्रथम संबंध आला त्या काळी अमेरिंड भाषांचे जे भौगोलिक चित्र मिळते ते आता बदलले आहे. हा संबंध सर्वत्र एकाच वेळी आलेला नाही. मधल्या काळात काही भाषांनी स्थलांतर केले, तर काही पूर्णपणे नष्ट झाल्या, ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. भाषांचे वर्गीकरण सर्वांनी एकाच प्रकारे केले आहे, असे नाही. ते वांशिक व भाषिक असे दोन्ही प्रकारचे आहे. त्याचा विस्तार व निश्चित भौगोलिक क्षेत्र नकाशावरूनच समजू शकेल. या लेखात कोएन व मेये यांनी आपल्या जगातल्या भाषांवरील ग्रंथात स्वीकारलेले वर्गीकरण दिले आहे. नावांचे उच्चार फारसे बिनचूक नाहीत.

  उत्तर अमेरिका : यात प्रथम समूहाचे नाव व कंसात पोटसमूहांची नाव दिली आहेत.

अल्गाँक्वियन-वाकाश (अल्गाँक्वियन, बेओथुक, रित्वान, चिमाकुम, वाकाश, कुतेनाई, सालिश).

 

एस्किमो-ॲल्यूट (एस्किमो, ॲल्यूट).

 

होका-सिउ (युकी, केरेस, तुनिका, कादो, इरोक्वाय, युची, मुस्कोगी, सिउ).

ना-देने (आथाबास्कन, एयाक, त्लिनगित, हाइदा).

 

पेनुशियन (कॅलिफोर्नियाची पेनुशिया, चिनूक, कालापुया, ताकेल्मा, याकोना, कूस, साहाप्तिन, त्सिमशिअन). 

 

उतो-ॲझटेक-तानो (उतो-ॲझटेक, तानो, किओवा, झून्यी).

 

अल्गाँक्वियन भाषासमूह पूर्व किनाऱ्यावरील कॅरोलायनापासून उत्तरेकडे लॅब्रॅडॉरपर्यंत पसरलेला आहे. इंग्रजी व फ्रेंच वसाहतवाल्यांचा पहिला संबंध या समूहाशी आला. या दोन यूरोपीय भाषांत सापडणाऱ्या बऱ्याचशा अमेरिंड शब्दांचा उगम इथे आहे. अनेक स्थलनामांच्या अर्थाचा उलगडाही त्यामुळे होतो. उदा., ‘मिसिसिपी’ हे नदीचे नाव मिसि ‘पुष्कळ’ व सिपिय ‘पाणी’ यावरून आलेले आहे.

या समूहातली मॅसॅचूसेट्स हीभाषा लहान असली तरी एलियटने केलेल्या बायबलच्या अनुवादामुळे प्रसिद्ध आहे. 

 मेक्सिको व मध्य अमेरिका : यात प्रथम समूहाचे नाव व कंसात पोटसमूहांची नावे व भाषांची संख्या दिली आहे. 

क्वित्लातेक (क्वित्लातेक १). 

 

लेन्का (लेन्का १). 

 

माया-सोक (माया-किचे ३३, मिक्स-सोक ९, सिन्का २, तोतोनाक ५).

मिस्कितो-मातागाल्पा (१३)

 

 आतोमाङ (ओतोमी-पाम ६, मिस्तेकत्रिक ४, पोपोलोका-माझातेक ६, चिनान्तेक १, सापोतेक ५, चोरोतेगा ४).

  पाया (पाया १).

 

 तारास्क (तारास्क १).

 

 खिकाक (खिकाक १).

 

वाव्ह (वाव्ह १).

 

मृत व अवर्गीकृत (११).

 * होका (६).

 

युतो आस्तेक (* काहीता ताराहुमार १, * पिमा-तेपेवान ६, कोराआस्तेक २७, * चिबचा १३, * दोरास्क-ग्वायमी ११). [*= माहिती अपुरी.]

दक्षिण अमेरिका व अँटिलीस बेट-समूह : या प्रदेशातील भाषाकुटुंबांची संख्या १०८ आहे. अँटिलीस बेट-समूहात आरावाक व कॅरिब ही कुटुंबे आहेत. पण ती या १०८ कुटुंबांतच येतात. ही कुटुंबे पुढीलप्रमाणे : आकोनिपा, आलाकालुफ, आम्निआपे, आमुएशा, आन्दोक, आराउकान, आरावाक, आरिकेम, X आताकामा, X आतालान, आउआके, आउइशिरी, आयमारा, आयमोरे, बोरोरो, चापाकुरा. चार्रुआ, Xचेचेहेत, चिबचा, चिकितो, चिरिनो, चोन, X कोरोआदो, X दिआगित, X एस्मेराल्दा, फुलनिओ, X गामेल्ला,X गोर्गोतोकी, ग्वाहिबो, X ग्वामो, ग्वाराउनो, ग्वातो, ग्वायकुरू, हुआरी, X हुआर्पे, X हमाग्वाका इतोनामा, काहुआपाना, काइनयान, कालिआना, कामाकान, कामसा, X कान्यारी, कानिचाना, कापिशाना, काराया, कॅरिब, X कारिरी, काताविशी, कातुकिना, कायुवावा, किचुआ, X कोपालेन, X कुकुरा, कुली, लेको, X लुले, माकु, माकुराप, माशाकाली, मास्कोइ, माशुबी, माताकोमाका, मातानावी, X मायना, मोबिमा, मोझेतेन, X मुचिक, मुनिचे, मुरा, नाम्बिक्वारा, नातु, X ओपाइए, ओती, ओतोमाक, पानकारुरु, पानो, पाताशो, पुएलचे, पुइनावे, पुरुबोरा, Xपुरुहा, शालिबा, सामुकु, शिरिआना, शोको, स्साबेला, स्सिमाकु, X शुकुरु, Xताराइरिरु, तारुमा, तिमोते, तिनिग्वा, त्रुमाइ, तुकानो, तुपी-ग्वारानी, तुशा, X विलेला, वितोतो, खिबारो, खिराखारा, याबुती, याहगान, यारुरो, युराकारे, युरी, झापारो, इये. (यांतील मृतभाषा X चिन्हाने दर्शविल्या आहेत.)

अमेरिंड भाषा बोलणाऱ्यांची संख्या या प्रदेशात जास्त आहे. ग्वारानी ही पॅराग्वाय आणि नैर्ऋत्य ब्राझीलमध्ये बोलली जाते. इंका साम्राज्याची भाषा क्वेच्वा बोलणारे लोक कित्येक दशलक्ष आहेत. आयमारा हीही एक महत्त्वाची भाषा असून ती दक्षिण पेरू व बोलिव्हियात बोलली जाते.

संदर्भ : Boas, Franz, Ed. The Handbook of American Indian Languages-Part I, II, Washington, 1911, 1922 Part III and IV, New York, 1933–39and 1941. 

कालेलकर, ना. गो.