अंगग्रहरोधके : अरेखित (रेघा नसलेल्या) व इच्छेनुसार ज्यांची हालचाल होत नाही अशा स्नायूंचा (उदा., हृदय, आतडे यांच्या स्नायूंचा) ताण कमी करणाऱ्या औषधी द्रव्यांना अंगग्रहरोधके असे म्हणतात. ज्या कारणांमुळे स्नायूंवर ताण येतो त्या कारणांवर औषधांचा परिणाम होईलच असे नाही. त्यासाठी इतर औषधी द्रव्यांचा वापर करावा लागतो. अंगग्रहरोधकांमुळे स्नायूंचा ताण थांबतो किंवा कमी होतो.

अशा औषधांची क्रिया तीन प्रकारांनी होऊ शकते. (१) प्रत्यक्ष स्नायुतंतूंवर कार्य करून, (२) स्नायूंना प्रेरणा देणाऱ्या तंत्रिकातंतूमध्ये अडथळा उत्पन्न करून, किंवा (३) तंत्रिका व स्नायू यांच्या संधिस्थानी अडथळा उत्पन्न करून. 

      धोतरा व तत्सम ॲट्रोपीनयुक्त औषधे, बाष्पनशील तेले, अफूच्या अर्कातील पॅपॅव्हरीनसारखी अल्कलॉइडे अशा पदार्थांचा अंगग्रहरोधके म्हणून उपयोग केला जातो.

आंत्रशूल, ⇨ पचनज व्रणामुळे होणारा शूल (वेदना), पित्ताशय आणि वृक्क यांचे विरामी शूल (वारंवार होणाऱ्या वेदना) इ. विकारांत अंगग्रहरोधके उपयुक्त ठरतात.हृद्‍रोहिणीच्या संकोचामुळे होणाऱ्या हृरद्शूलात नायट्राइटांचा उपयोग होतो. दम्याच्या विकारात श्वासनलिकांच्या अतिसंकोचात ॲड्रेनॅलीन (वृक्कप्रवर्तक), ॲट्रोपीन व पॅपॅव्हरीन अशा औषधांचा उपयोग होतो. 

अंगग्रहरोधकांचा योग्य प्रमाणात वापर केला गेला नाही तर त्यापासून तीव्र स्वरूपाचे विषारी परिणाम होतात. तसेच त्यांचा वापर बराच काळ केल्यास चिरकारी (फार काळ टिकणाऱ्या) स्वरूपाचे विषारी परिणाम होतात.

ढमढेरे, वा. रा.