अमरावती जिल्हा : महाराष्ट्राच्या विदर्भ भागातील जिल्हा. २० ३२’ ते ११ ४६’ उ. आणि ७६ ३८’ते ७८ २७’ पू. क्षेत्रफळ १२,१५० चौ.किमी. लोकसंख्या १५,४१,२०९. याच्या पश्चिमेस अकोला व बुलढाणाउत्तरेस मध्य प्रदेशातील निमाड, बेतूल व छिंदवाडा पूर्वेस वर्धा व नागपूर आणि दक्षिणेस यवतमाळ व अकोला हे जिल्हे आहेत. या जिल्ह्यात उत्तरेस मेळघाट, अचलपूर, मोर्शी आणि दक्षिणेस दर्यापूर, अमरावती व चांदूर असे सहा तालुके आहेत. जिल्ह्याची पूर्व-पश्चिम लांबी १९३ किमी. व दक्षिणोत्तर रुंदी १४५ किमी. आहे. महाराष्ट्राच्या ३.९७ टक्के क्षेत्रफळ व ३.०५ टक्के लोकसंख्या या जिल्ह्यात आहे.

 भूवर्णन : मेळघाट व पयानघाट असे या जिल्ह्याचे दोन स्वाभाविक विभाग असून मेळघाट गाविलगडच्या डोंगरांनी व्यापलेला आहे. (समुद्रसपाटीपासून सरासरी उंची १,०३६ मी.) या भागातील सर्वांत उंच बैराट शिखर (१,१७७ मी.) चिखलदऱ्याजवळ आहे. अमरावती-चांदूर रेल्वेफाट्याजवळच्या टेकड्या (४५७ मी.) सोडल्या तर पयानघाट सखल व सपाट आहे. याची समुद्रसपाटीपासून सरासरी उंची २५० मी. आहे.

मेळघाटातील बहुतेक पाणी कामदा, कापरा, गार्गा व सिपना या तापीच्या उपनद्यांतून वायव्य सीमेवरील तापी नदीत जाते. पूर्व सीमेवरून वर्धा नदी दक्षिणेकडे वाहते. चंडामनी, मातू, विदर्भा, बेवळा व खोलाट या तिच्या उपनद्या होत. मध्यभागातील प्रथम दक्षिणवाहिनी व नंतर पश्चिमवाहिनी पूर्णा ही जिल्ह्यातील प्रमुख नदी असून शहानूर, चंद्रभागा व पेंढी या तिच्या उपनद्यांमधला जमिनीचा पट्टा खाऱ्या पाण्याचा आहे.

पयानघाटाचा भाग समुद्रापासून दूर व सखल असल्याने हवामान विषम आहे उन्हाळ्यात सरासरी ४१से. तर हिवाळ्यात १६से. तपमान असते. उंचीमुळे मेळघाट भाग नऊ महिने थंड असतो. पण पावसाळ्यातील तीन महिने येथील हवामान रोगट असते. पावसाची वार्षिक सरासरी उत्तरेस ११०, पश्चिम भागात ७९.६, पूर्व भागात ८४.५ व दक्षिणेस ७७.८ सेंमी. असून १० टक्के पाऊस हिवाळ्यात पडतो.

एकूण क्षेत्रफळाच्या ३१ टक्के क्षेत्र जंगलव्याप्त असून त्यातील ८१ टक्के एकट्या मेळघाट तालुक्यात आहे. सागवान, तिवस, सलई, धावडा, नालडू, आवळा, तेंदू ही उपयोगी झाडे असून रोशा गवत व बांबू यांचेही उत्पादन होते. येथे वाघ, चित्ता, हरिण, सांबर, अस्वल वगैरे प्राणी आढळतात. पयानघाटात बाभळीची बने आहेत. 

आर्थिक स्थिती : जमीन लाव्हा रसाच्या दगडापासून बनलेली आहे. पयानघाटातील जमीन काळी, खोल व सुपीक, तर मेळघाटातील जमीन तांबडी व उथळ आहे. शेतीत ७९ टक्के लोक गुंतलेले आहेत. पेरणीचे निव्वळ क्षेत्र ५८.३ टक्के (१९७०-७१) असून दर्यापूर तालुक्यात ते ८९ टक्के तर मेळघाटात फक्त ७ टक्के आहे. जिल्ह्यातील ९२ टक्के पीक खरीप आहे. मात्र मेळघाटात २१ टक्के रब्बी पीक निघते. ज्वारी, कापूस, तूर, भूईमूग, गहू, हरभरा, जवस ही येथील मुख्य पिके. कापूस व तूर या पिकांसाठी हा जिल्हा प्रसिद्ध आहे. ओलित क्षेत्र २ टक्के (१९७०-७१) असून मुख्यतः मोर्शी, अमरावती व अचलपूर तालुक्यांत भाजीपाला, मिरची, संत्री, लिंबू, केळी, द्राक्षे ही बागायती पिके होतात. चिखलदरा उत्तम प्रतीच्या कॉफीसाठी व अंजनगाव-सुर्जी आणि अंजनगाव-बारी नागवेलीच्या पानांसाठी प्रसिद्ध आहे.

अंदाजे ६ टक्के (१९६१) कामगार ग्रामोद्योग व निर्मिति-उद्योगधंद्यांत असून बहुतेक सर्व उद्योगधंदे शेतीमालावर अववलंबून आहेत. मोठ्या कारखान्यांत अचलपूर व बडनेरा येथील कापडगिरण्या अमरावती, चांदूर, बडनेरा, अचलपूर, वरूड, अंजनगाव व धामणगाव येथील सरकी काढून गठ्ठे बांधण्याचे कारखानेअमरावती, बडनेरा, चांदूर व धामणगाव येथील तेल गाळण्याचे कारखाने अमरावती येथील सायकली तयार करण्याचे व प्लॅस्टिकपासून वीजधंद्यांत उपयोगी अशा वस्तू तयार करण्याचा उद्योग यांचा समावेश होतो. याशिवाय हातमाग, चामडे कमविणे व रंगविणे, तूरडाळ करणे, कुंकू तयार करणे इ. उद्योगधंदे या जिल्ह्यात आहेत.

मध्य रेल्वेचे १९५ किमी. लांबीचे मार्ग या जिल्ह्यात असून त्यांचे प्रमाण दर १०० चौ.किमी. ला १.६ किमी. पडते. मुंबई-कलकत्ता (रुंद-मापी),  खांडवा-हिंगोली (मीटर-मापी) व अचलपूर- मुर्तिजापूर (अरूंद- मापी) हे रेल्वेमार्ग ह्या जिल्ह्यातून जातात. मोर्शीखेरीज सर्व तालुक्यांस रेल्वे दळणवळण उपलब्ध आहे. अमरावती-बडनेरा या ९.६ किमी. लांबीच्या फाट्याने अमरावती मुंबई-कलकत्ता रेल्वेमार्गास जोडलेली आहे. अमरावती शहर मुंबई-कलकत्ता राष्ट्रीय हमरस्त्यावर असून ते तालुक्याच्या शहरांशी व शेजारील जिल्ह्यांशी सडकांनी जोडलेले आहे. एकूण १,१०३ किमी. लांबीच्या सडका असून त्यांपैकी ४३६ किमी. डांबरी आहेत. 

 लोक व समाजजीवन : १९६१-७१ या कालात लोकसंख्या २५-२६ टक्क्यांनी वाढली एकूण १३ शहरे व १,६०९ खेडी असून २७.४९ टक्के लोक शहरांत राहतात. प्रत्येक शहरात नगरपालिका आहे. ७६ टक्के मराठी, १० टक्के उर्दू, ७ टक्के हिंदी व ६ टक्के वन्य भाषा बोलतात. १९७१ मध्ये येथे ४२.०८ टक्के साक्षरता झाली असून स्त्रियांचे पुरुषांशी दर हजारी प्रमाण ९३२ आहे. लोकवस्ती दर चौ.किमी. ला १२६ असून अमरावती तालुक्यात हे प्रमाण जास्त तर मेळघाट तालुक्यात फारच कमी आहे. मेळघाटात ९० टक्के लोकसंख्या ð कोरकूंची आहे.

जिल्ह्यात १९६९ मध्ये १,४०२ प्राथमिक, १७९ माध्यमिक व ६६ मूलोद्योग-शाळा होत्या. कला, शास्त्र, वाणिज्य, आयुर्वेद, प्रशिक्षण, शारीरिक शिक्षण, कायदा, शेती इत्यादींची महाविद्यालये जिल्ह्यात आहेत. सरकारतर्फे ग्रंथालये उघडली असून पाच वृत्तपत्रे जिल्ह्यातून प्रसिद्ध होतात. सर्व तालुक्यांच्या व महत्त्वाच्या शहरी दवाखाने व आरोग्य-केंद्रांच्या सोयी असून जिल्ह्यातील कुष्ठरोगनिवारण-केंद्राचे कार्य प्रसिद्ध आहे. 

चिखलदरा हे १,११५ मी. उंचीचे थंड हवेचे ठिकाण असून त्याच्या जवळ गाविलगडचा १३२५ साली बांधलेला इतिहासप्रसिद्ध किल्ला व आमझरी बगीचा आहे. संत तुकडोजी महाराजांचा. प्रसिद्ध ‘गुरुकुंज आश्रम’ नागपूर मार्गावर, अमरावतीपासून ३४ किमी.वर मोझरी येथे आहे. मोर्शीहून आठ किमी.वर  सालबर्डी येथे लव-कुशांनी श्यामकर्ण घोडा अडविला, अशी लोककथा आहे. सालबर्डीसच ऊन व थंड पाण्याचे झरे आहेत त्यांत स्‍नान केल्याने त्वचारोग बरा होतो असा समज आहे. चांदूर तालुक्यातील वर्धेच्या काठावरील कौंडिण्यपूर ही विदर्भाची प्राचीन राजधानी आहे. महानुभाव पंथाचे काशीक्षेत्र समजले जाणारे मोर्शी तालुक्यातील रिथपूर येथे श्री गोविंद प्रभू यांची यात्रा चैत्री व आषाढी पौर्णिमेस भरते. अचलपूरपासून २२ किमी. उत्तरेस बहिरम हे यात्रेचे प्रसिद्ध ठिकाण आहे.

कुलकर्णी, गो. श्री.