‘अंचल’ रामेश्वर शुक्ल : (१ मे १९१५—). एक आधुनिक हिंदी कवी, उपन्यासकार (कादंबरीकार), काहनीलेखक (कथाकार) व निबंधकार. त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातील किशनपूर (जि. फत्तेपूर) येथे झाला. त्यांचे शिक्षण लखनौ व नागपूर विद्यापीठांतून एम. ए. पर्यंत झाले. हिंदीतील ‘छायावादी’ (स्वच्छंदतावादी) काव्याचा बहर ओसरू लागण्याच्या सुमारास ‘अंचल’ यांनी काव्यरचनेस सुरूवात केली. छायावादाच्या प्रभावाखाली असलेली त्यांची सुरुवातीची कविता पुढे स्वतंत्र झाली आणि ते प्रेम आणि सौंदर्याचे पूजक बनले. नंतर मात्र मार्क्सवादी विचारांचा प्रभाव पडून मानवाचे कल्याण, सामाजिक विषमता, बंड क्रांती इ. त्याचे काव्यविषयक बनले. या दृष्टीने किरण वेला (१९४१) आणि करील (१९४२) हे त्यांचे काव्यसंग्रह उल्लेखनीय होत. पुढे अरविंदबाबू घोष यांच्या आध्यात्मिक विचारांचा प्रभाव पडून ते तत्त्वचिंतनपर कविता लिहू लागले. त्यांच्या विचारांत आणि तदनुरोधाने काव्यात सतत परिवर्तन झालेले आढळते. मधूलिका (१९३८), अपराजिता (१९३९), लाल चूनर (१९४२), वर्षोंतक के बादल (१९५४) आणि विरामचिन्हे (१९५७) हे त्यांचे काव्यसंग्रह होत.
काव्याव्यतिरिक्त त्यांनी कहानी (तारे-१९३७ आणि ये वे बहुतेरे-१९४१) उपन्यास (चढती धूप-१९४५, नयी इमारत-१९४६,उल्का-१९४७ आणि मरुप्रदीप-१९५१), निबंध (समाज और साहित्य-१९४४ आणि रेखा लेखा-१९५७) समीक्षा (हिंदी साहित्येअनुशीलन—१९५२) इ. वाङ्मयप्रकारही हाताळले आहेत. तथापि ते कवी म्हणूनच विशेष प्रसिद्ध आहेत.
बांदिवडेकर, चंद्रकांत