सावरा : भारतातील एक आदिम जमात. त्यांची वस्ती मुख्यत्वे ओरिसा (ओडिशा)  राज्यातील कोरापुट व संबळपूर जिल्ह्यांत आढळते. त्याखालोखाल त्यांची वस्ती आंध्र प्रदेश राज्यातील विजयानगर, विशाखापटनम् व गंजाम जिल्ह्यांत तसेच मध्य प्रदेश राज्यात असून पश्चिम बंगाल, बिहार व महाराष्ट्र या राज्यातूनही ती तुरळक प्रमाणात आढळते. त्यांची एकूण लोकसंख्या ५,५६,४९१ (१९८१) होती. प्रदेशपरत्वे त्यांना सौरा, सावोरा, सवरा, साओरा वगैरे भिन्न नावे असून त्यांच्या चालीरीतींत फरक आढळतात. ‘सावरा’ या शब्दाचा अर्थ पर्वतवासी वा रानटी असा आहे. ही जमात अत्यंत प्राचीन असून त्यांचा उल्लेख रामायण, महाभारत, ऐतरेय ब्राह्मण   वगैरे प्राचीन वाङ्‌मयांतून तसेच थोरला प्लिनी (इ. स. ?– २४ ऑगस्ट ७९) व टॉलेमी (इ. स. सु.९०–१६९) यांच्या 

सावरा वादक-कलाकारलेखनातही आढळतो. तिथे त्यांना अनुक्रमे ‘सुआर’ व ‘सबराई’ म्हटले आहे. याशिवाय पल्लव राजा नंदिवर्मा याच्या ताम्रपटात साबरांचा (सावरांचा) राजा उदय असा एक उल्लेख येतो. त्यावरून इ. स. पू. काळापासून बाराव्या शतकापर्यंत आग्नेय भारतात सावरा ही वास्तव्य करून राहिलेली एक प्राचीन आदिम जमात असावी, असे मानवशास्त्रज्ञांचे मत आहे. सावरांचे दोन प्रमुख गट ओडिशा व आंध्र प्रदेश यांत आढळतात. त्यांना अनुक्रमे लांजिया सावरा व कापू सावरा म्हणतात. त्यांच्यात डोंगरवासी व मैदानी (कापू) असेही भेद आहेत.

  

शेती हा सावरांचा प्रमुख धंदा असून ते फिरती शेती करीत पण अलीकडे स्थिर शेतीही करू लागले आहेत. अनेकजण शेतमजूर म्हणून काम करीत असून फार थोडे शिकार, मच्छीमारी, गुरे पाळणे आणि कंदमुळे गोळा करणे, हे व्यवसाय करतात. गंजाम जिल्ह्यातील काही सावरा जादू व मंत्रविद्येवर गुजराण करतात. कुंभारकाम, बुरूडकाम, पितळेचे काम हेही व्यवसाय त्यांच्यात आढळतात. प. बंगालमधील सावरा हे गारुड्याचा धंदा करतात. त्यांचे बसू साबर, लोधा साबर, महातो साबर आणि अखोती साबर असे विभाग असून इस्लाम धर्म स्वीकारलेले मुस्लिम साबर म्हणून प्रसिद्घ आहेत. सावरांची कुडाच्या भिंती असलेली घरे चौकोनी असून त्यांना सोपे असतात. भिंती शेणाने सारवतात. छप्पर गवताचे असते. एकच दालन असलेल्या झोपडीत तीन चतुर्थांश भाग सु. एक ते दीड मी. उंचीच्या माळ्याने व्यापलेला असतो. त्याखाली साठविलेले धान्य व चूल असते. छताला परड्या, भोपळे, तुंबे, कपड्याची गाठोडी, छत्री, भाले, धनुष्यबाण वगैरे टांगून ठेवतात. कुलचिन्हे असलेल्या वस्तू भिंतीवर टांगलेल्या असतात. या भिंती मूर्ती आणि चित्रांनी सजविलेल्या असतात, पितरांना संतुष्ट करण्याचा हा एक त्यांचा मार्ग आहे. सावरा हे मांसाहारी असून ते रानरेडे व डुकराचे मांस खातात पण गोमांस निषिद्घ मानतात. त्यांच्या नेहमीच्या आहारात भात व कंदमुळे यांना महत्त्व आहे, बहुतेक सावरा मद्यपान करतात.

पिंगट काळा वर्ण, मध्यम उंची, जाड ओठ, सपाट चेहरा, किंचित तिरळेपणा, रुंद नाक, गालाची वर आलेली हाडे आणि सुदृढ अंगकाठी ही त्यांची शारीरिक वैशिष्ट्ये असून स्त्रिया चुणचूणीत व बांधेसूद असतात. सावरांचा पोषाख अगदी साधा असतो. पुरुष हे साधे वस्त्र कमरेपासून खाली नेसतो. वरचा भाग उघडाच असतो मात्र सुती कापडांची फडकी आपल्या पागोट्याभोवती गुंडाळतात आणि पांढरी पिसे पागोट्यात खोवतात. स्त्रियाही पूर्वी फक्त कमरेखाली वस्त्र गुंडाळीत असत आणि वक्षःस्थळे उघडी ठेवीत पण आता ती पदराने झाकतात. बऱ्याच स्त्रिया आता चोळीही वापरू लागल्या आहेत. स्त्रियांत सर्वांगांवर गोंदून घेण्याची हौस असून गळ्यात बिडाच्या व धातूच्या अनेक माला घालतात, तसेच नाकात व कानांत वर्तुळाकार अलंकार-कर्णफुले घालतात. कोणताही धार्मिक विधी असला की, स्त्री-पुरुष दोघेही नृत्य करतात. त्यांची नृत्ये ओराओं व संथाळांप्रमाणेच असून पुरुष ढोल, मृदुंग, टाळ इ. वाद्ये वाजवितात. या प्रसंगी ते रंगीबेरंगी कापडे पागोट्यात खोवतात. स्त्रिया त्याच प्रकारची कापडे कमरेभोवती गुंडाळतात. त्या मोरपिसांचे तुरे हातात घेऊन नृत्य करतात. काही पुरुष छत्र्या, तलवारी, भाले, काठ्या घेऊन नाचतात. स्त्री-पुरुषांना काहीतरी सतत गुणगुणण्याची सवय असते. फुरसतीच्या वेळात, शेतात काम करताना ते गाणी म्हणतात.

ओडिशात सावरांच्या पंचवीस कुळी व्यवसायानुसार विभागल्या गेल्या आहेत. त्यांपैकी जाटी, अर्सी, जडू, किंडाल, जुआरी, कुरुंबा, कुम्बी, लांजिया, कांपो, सुधा वगैरे प्रमुख होत. कुळीला बिरिंदा म्हणतात. त्यांच्यात असगोत्रविवाहपद्घती रूढ आहे. मुलेमुली वयात आल्यानंतर दोन कुटुंबे एकत्र येऊन लग्न ठरवितात. नवरीला पळवून नेऊन लग्न करणे अशीही पद्घत आहे तथापि देज देऊन लग्न करतात. विवाहाचा प्रस्ताव प्रथम वरपक्षाकडून येतो. आते-मामे भावंडांतील विवाहास प्राधान्य दिले जाते. देज देण्याची ऐपत नसल्यास सेवा विवाहाची पद्घत रूढ आहे. त्यानुसार भावी जावई आपल्या सासरी (मुलीच्या घरी) काम करतो आणि पैसे कमविल्यावर पुढे काही वर्षांनी विधिवत लग्न करतो. हे चाकरीचे लग्न कधीकधी त्या दांपत्यास संतती झाल्यावरही होते. विवाहात ताली (मंगळसूत्र) बांधणे हा महत्त्वाचा विधी असतो. त्यानंतर नवदांपत्य स्वतंत्र झोपडीत राहते. त्यांच्यात बहुपत्नीकत्वाची चाल असून तीन पत्न्या करता येतात मात्र पाटील किंवा जमात प्रमुख (गोमांग) यास चार पत्न्या करण्याची सवलत आहे, तसेच गोमांगच्या मुलीचे लग्न गोमांगच्या मुलाशीच होते मात्र त्याच्या मुलाला सावरांतील अन्य कुठल्याही मुलीबरोबर विवाह करता येतो. विवाहपूर्व व विवाहोत्तर व्यभिचारास जमातीत दंड व फटके अशा दोन्ही सजा आहेत. पत्नीने व्यभिचार केल्यास पती तिला सोडचिठ्ठी देतो पण देज वसूल करतो. तेव्हाच तिला पुनर्विवाह करता येतो. घटस्फोटितेस तसेच विधवेस पुनर्विवाह करता येतो. कुटुंबात तीन दिवस जननाशौच पाळतात. नामकरणविधी आणि मुलीच्या ऋतुप्राप्तीच्या वेळचा विधी यांना विशेष महत्त्व आहे.


सावार आणि खैरवारी या दोन ऑस्ट्रो-आशियाई भाषासमूहातील भाषा त्यांच्या मातृभाषा आहेत पण नागरी जीवनाशी संपर्क आल्यामुळे ओडिशातील सावरा उडिया, पं. बंगालमधील बंगाली, आंध्र प्रदेशातील तेलुगू आणि मध्य प्रदेशातील छत्तीसगढी भाषा व्यवहारात वापरू लागले आहेत, तसेच या संपर्कामुळे त्यांच्या वस्त्यांतून-गावांतून विद्यालये स्थापन झाली असून साक्षरतेचा प्रसारही झाला आहे. सावरांची सामाजिक संघटना असून तिच्या ग्रामप्रमुखाला गोमांग म्हणतात. त्याच्या हाताखाली दोल-बेहेरा व मोंदालनामक दोन साहाय्यक अधिकारी असतात. हे तिघेजण गावातील सर्व तंटे-बखेडे, प्रशासन व सर्वसाधारण व्यवहार पाहतात, तर बुया नावाचा मांत्रिक-पुरोहित असतो, तो जमातीतील सर्व धार्मिक विधी आणि औषधोपचार करतो. ही पदे कुलपरंपरेने आलेली असून त्यांच्या कुळांना सावरांत विशेष मान व आदर असतो. सावरांचे अनेक सण व उत्सव हे प्रामुख्याने शेती व्यवसायाशी निगडित असून ते जंगल तोडून स्वच्छ केलेल्या जमिनीवर-फिरत्या शेतीच्या (डाही शेती) संदर्भात आढळतात. पहिल्या जंगलतोडीच्या विधीस ते ‘कुर्रूआलपूर’ म्हणतात. बियाणे बाहेर काढण्याच्या विधीस ते ‘जुम्मोलपूर’, तर पेरणीच्या वेळच्या विधीस ‘पूर’ म्हणतात. वन्य पशू व नैसर्गिक आपत्तींपासून संरक्षण मिळण्यासाठी ते ‘जत्रापूर’ व ‘लंबापूर’ नामक विधी करतात. धान्य पदरात पडताच मोहाच्या फुलांची दारू तयार करून, ते मद्यपान करून आनंदोत्सव साजरा करतात. त्याला ते ‘अब्बान्दार’ उत्सव म्हणतात. याशिवाय ते ‘कौंडेमांदूर’, ‘उदास्दुर’ वगैरे उत्सव ऋतुमानानुसार भात, आंबे वगैरेंचा आस्वाद घेऊन साजरा करतात.

बहुतेक सर्व सावरा १९६१ पूर्वी हिंदू धर्मीय होते आणि त्यांची जमात परंपरागत विधी सोडता हिंदू देवदेवतांना भजत असे पण त्यानंतर त्यांच्यातील काहींनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला असून प. बंगालमधील काही सावरा इस्लामधर्मी झाले आहेत तथापि एकूण सर्व सावरांना जादूटोण्याविषयी आकर्षण असून त्यांच्यात इतर देवदेवतांबरोबर पूर्वजपूजाही रूढ आहे. रोगनिवारण्यासाठी मांत्रिक क्रिया करतात. मृताला ते जाळतात. मृताशौच कुलपरंपरेनुसार पाळतात.

आंध्रमधील सावरांपैकी काहींनी १९६७–७५ दरम्यान नक्षलवादी चळवळीत सहभाग घेऊन जमीनदारांविरुद्घ आंदोलने केली. त्यानंतर शासनाने त्यांच्याविरुद्घ कडक धोरण अवलंबिले.

संदर्भ : 1. Misra, U. C. Tribal Paintings and Sculptures, Delhi, 1989.

    2. Panda, Santosh K. Indian Culture and Personality : Saora Highlanders of Eastern Ghats, Delhi. 1987.

    3. Parija, Gurupad, Acculturation of Saoras into Oriya Hindu Society, Cuttack, 1960.

   4. Singh, Bhupinder, The Saora Highlanders : Leadership and Development, Bombay, 1984.

   5. Thurston, Edgar, Castes and Tribes of Southern India, Vol. VI, Delhi, 1975.

देशपांडे, सु. र.