सूर्यानुगामी दर्पण यंत्र : हे खगोलशास्त्रीय उपकरण आहे. सूर्य आकाशात परिभ्रमण करीत असताना त्याच्याकडून येणारी प्रकाशशलाका या उपकरणाद्वारे एका स्थिर दिशेत परावर्तित होते, म्हणजे सूर्याची आभासी प्रतिमा एका स्थिर दूरदर्शकात पाहता येते. अशा रीतीने कायम स्थापित केलेल्या उपकरणाने सूर्य तसेच इतर तारे यांचा मागोवा घेता येतो. यामुळेच याला सूर्यानुगामी दर्पणयंत्र हे नाव पडले आहे. परंपरागत उपकरणात साधा सपाट व अंतर्गोल असे दोन आरसे असतात. विद्युत् चलित्राने साधा सपाट आरसा २४ तासांत एक फेरी पूर्ण होईल अशा गतीने परिभ्रमण करतो. त्यात मिळणारी सूर्याची आभासी प्रतिमा स्थिर दूरदर्शकाच्या केंद्रस्थानी परावर्तित होते अथवा अंतर्गोल आरशाद्वारे स्थिर दिशेत परावर्तित होते. अशा रीतीने दूरदर्शकात दिसणारी सूर्याची प्रतिमा स्थिर राहते. जेव्हा सौर प्रारणाचे अखंडपणे थेट मापन करणे गरजेचे असते, तेव्हा हे उपकरण सौर तापमापकाबरोबर वापरतात. सूर्यग्रहणांचे वेध घेण्यासाठी योजलेल्या मोहिमांमध्ये निरीक्षणासाठी सुवाह्य (सुटसुटीत) सूर्यानुगामी दर्पणयंत्र उपयुक्त असते. असे सर्वांत मोठे उपकरण अमेरिकेच्या ॲरिझोना राज्यातील किट पीक नॅशनल ऑब्झर्व्हेटरी या वेधशाळेत बसविले आहे.
पहा : सूर्य.
ठाकूर, अ. ना.