सूदान गवत : (सोर्घम सूदानेन्सिस ). याचे मूलस्थान आफ्रिका खंडातील सूदान भाग हे आहे. पंजाब व उत्तर प्रदेश राज्यांसाठी जास्त उत्पन्न देणारे आणि काटक वैरणीचे पीक म्हणून हे १९२० मध्ये भारतात आणले गेले. महाराष्ट्रासाठी उन्हाळ्यात भरपूर चारा देणारे याचे वाण शोधून काढण्याचे प्रयोग परभणी येथे सुरु करण्यात आले. सुधारक प्रकार सिर्सा I-१-५२ आणि I-१-५३ यांची पंजाब व उत्तर प्रदेश राज्यांमध्ये लागवड केली जाते. सूदान गवत इतर गवतांपेक्षा उन्हाळ्यात जास्त वाढते. दमट व थंड हवामानात त्याची वाढ चांगली होत नाही. ते ज्वारीच्या पिकाप्रमाणे कोणत्याही जमिनीत येते परंतु भरपूर उत्पन्नासाठी पाण्याचा निचरा चांगला असणारी जमीन घेणे योग्य असते.
जमीन १०–१५ सेंमी. खोल नांगरुन व कुळवून आणि हेक्टरी २०–२५ टन शेणखत घालून तयार करतात. बागायती पीक फेब्रुवारी-मार्चमध्ये व पावसाळी जिरायती पीक जून-जुलैमध्ये पाऊस पडल्यावर पेरतात. हेक्टरी २५–३० किग्रॅ. बी फोकून अगर फणात २२–३० सेंमी. अंतर असलेल्या पाभरीने पेरतात. फेबुवारी-मार्च मधील पिकापासून मे – ऑगस्टपर्यंत हिरवा चारा मिळतो. पीक झपाट्याने वाढून फूटही भरपूर फुटते. पेरल्यापासून ६०–७५ दिवसांत पीक संपूर्ण शेत झाकून टाकते, तेव्हा त्याची पहिली कापणी करतात. पाभरीने पेरलेले पीक १·५०–२·५० मी. उंच आणि बी फोकून पेरलेले पीक १–१·५० मी. उंच वाढते. ताटे करंगळीसारखी बारीक आणि खूप पालेदार असतात. ज्वारीप्रमाणे या ताटामध्ये हायड्रोसायनिक अम्ल हा विषारी पदार्थ ताट ४५– ५० सेंमी. उंचीचे होईपर्यंत जास्त प्रमाणात असतो. म्हणून पिकाला कणसे येऊन चाऱ्यातील हे अम्ल कमी होण्यापूर्वी ही वैरण गुरांना चारणे धोक्याचे असते.
पावसाळी हंगामात हे गवत जिरायती पीक म्हणून लावता येते परंतु बागायती पीक म्हणून साधारणत: ८–१० दिवसांच्या अंतराने पाणी दिल्यास या गवताची वाढ झपाट्याने होते. मार्चमध्ये पेरलेले पीक मे अखेरीस कापणीस येते. एका हेक्टरमधून २२,०००–२४,००० किग्रॅ. हिरवा चारा मिळतो. कापणीनंतर पिकास लगेच हेक्टरी ७५–१०० किग्रॅ. अमोनियम सल्फेट घालून भरपूर पाणी दिल्यास जून अखेरीस दुसरी कापणी आणि जुलै अखेरीस तिसरी कापणी घेता येते. या दोन्ही कापण्यांपासून एका हेक्टरमधून ३७,०००–४०,००० किग्रॅ. हिरवा चारा मिळतो. बी धरण्याकरिता पीक ऑगस्टनंतर न कापता वाढू देतात. पिकाच्या ताटांवर आलेल्या कणसात दाणे भरुन ते पक्व झाल्यावर ती कणसे खुडून घेतात. ती खळ्यावर मळून बी काढून घेतात. एका हेक्टरमधून साधारणतः ३८०– ५०० किग्रॅ. बी मिळते. ताटांचा उपयोग गुरांकरिता कडबा म्हणून करतात. सूदान गवताचा गोड सूदान म्हणून एक प्रकार आहे. त्याची वैरण फारच गोड असते परंतु त्याची वाढ अतिशय मंद गतीने होते.
साधारणपणे ज्वारीवर जे रोग व कीटक उपद्रव होतात, ते सूदान गवतावरही असू शकतात [→ ज्वारी].
चव्हाण, ई. गो.