सूचन आणि सूचनक्षमता : अन्य व्यक्तींच्या विचारांवर वा वर्तनावर प्रभाव टाकणाऱ्या शाब्दिक वा अन्य प्रकारच्या उद्दीपकाला—उदा., जाहिराती, फॅशन—सूचन म्हणतात आणि सूचन सहजपणे मान्य करण्याच्या प्रवृत्तीला सूचनक्षमता म्हटले जाते परंतु सूचन म्हणजे तर्कशुद्घ प्रतिपादन अथवा स्पष्टीकरण नव्हे, तसेच बौद्घिक पातळीवर सूचन आणि सूचनक्षमता विचारप्रदान करणे नव्हे. सूचन स्वीकारणारा सूचनक्षम मनुष्य, दुसऱ्याचे सूचन सहज स्वीकारतो. ब्रिटिश मानसशास्त्रज्ञ विल्यम मॅक्डूगल ह्याच्या मते ह्या सहजपणे केल्या जाणाऱ्या सूचनस्वीकृतीचे एक सर्वसाधारण कारण असे, की सूचन स्वीकारणारा मनुष्य सूचन करणाऱ्या व्यक्तीचे सामर्थ्य, प्रतिष्ठा, थोरवी, वर्चस्व, सत्ता, श्रीमंती, कीर्ती, अधिकार अथवा मोठेपणा ह्यांनी प्रभावित होतो. त्याच्या ठिकाणी शरणागतवृत्ती, लीनता, नम्रता जागृत होते आणि म्हणून तो सूचनक्षम बनतो.
सूचनक्षमता ही माणसाच्या मनःस्थितीवर व स्वभाववैशिष्ट्यांवर अवलंबून असते. अडाणी, अशिक्षित, भोळीभाबडी, श्रद्घाळू माणसे ही सहजसूचनक्षम असतात. व्यक्तीचे वयोमान, तिची शैक्षणिक-सामाजिक-सांस्कृतिक पातळी, तिच्या पिंडाची निरोगी अवस्था या गोष्टी ह्या संदर्भात महत्त्वाच्या ठरतात. ह्या बाबतींत कनिष्ठ पातळीवर असलेल्या व्यक्ती अधिक सूचनक्षम असतात. काही हुकूमशाही तसेच साम्यवादी राष्ट्रांत वापरले गेलेले ⇨ मेंदू प्रक्षाळणा चे (ब्रेन वॉशिंग) तंत्र सूचनप्रक्रियेच्या मानसशास्त्रावर आधारलेले आहे. माणसाचे शरीर, त्याची ज्ञानेंद्रिये विलक्षण तणावाखाली ठेवून त्याची मनोयंत्रणा मोडून टाकली, की त्याच्या विचारांत संबंधितांना हवे ते बदल घडवून आणता येतात.
सूचनस्वीकृतीची प्रक्रिया मुख्यत: अबोध मनाच्या पातळीवर घडून येते, म्हणून संमोहनात (हिप्नोसिस) सूचनप्रक्रियेला अतिशय महत्त्व असते. संमोहित अवस्थेत माणसाची होणारी मनःस्थिती आणि एरव्ही सूचनस्वीकृती करतेवेळी माणसाची होणारी मनःस्थिती ह्या दोहोंत पुष्कळ साम्य आहे. दोहोंमध्ये माणसाची चिकित्सक बुद्घी आणि सावधानवृत्ती लुप्त होते. त्याचे मन वा विचारशक्ती पूर्णपणे दुसऱ्याच्या कह्यात जाते.
सूचनाचे विविध प्रकार आहेत : (१) परसूचन, (२) स्वयंसूचन, (३) प्रत्यक्ष सूचन, (४) अप्रत्यक्ष सूचन, (५) सरळ सूचन आणि (६) विरुद्घार्थी सूचन.
परसूचन म्हणजे दुसऱ्याने केलेले सूचन. ह्यात वडीलधाऱ्या मंडळींनी नेत्यांनी वा तज्ज्ञांनी किंवा त्यांहून कोणी अन्यांनी केलेल्या सूचनांचा अंतर्भाव होतो. कधी कधी आपण स्वतःच स्वतःला सूचन करतो. ‘उद्या पहाटे पाच वाजता मला उठलेच पाहिजे’, असे जेव्हा आपण स्वतःशी म्हणतो किंवा मनातल्या मनात घोकतो, तेव्हा ते स्वयंसूचन असते.
प्रत्यक्ष सूचनात आपल्याला केल्या जाणाऱ्या सूचनाची पूर्ण कल्पना व्यक्तीला असते. तसेच सूचन करणाऱ्याचा उद्देश अथवा हेतू ऐकणाऱ्याला स्पष्ट दिसून येतो. पिता पुत्राला, वैद्य रोग्याला, नेता अनुयायांना, शिक्षक विद्यार्थ्यांना, अधिकारी हाताखालच्या कर्मचाऱ्यांना असे प्रत्यक्ष सूचन करतात. अप्रत्यक्ष सूचनात सांगणाऱ्याचा हेतू गर्भित अथवा प्रच्छन्न असतो. सतत अप्रत्यक्ष सूचन करुन एखाद्या व्यक्तीचे मन दुसऱ्या एखाद्या व्यक्तीबद्दल कलुषित करता येते. फॅशन हा अप्रत्यक्ष सूचनाचाच एक प्रकार आहे. एखादी फॅशन अनेक लोक करताना दिसले, की आपणही ती करावी असे सूचन अप्रत्यक्षपणे मिळते आणि आपण ती करतो.
सरळ सूचनात सूचकाचे सूचन तंतोतंत पाळले जाते परंतु विरुद्घार्थी सूचनात केलेल्या सूचनाच्या अगदी विरुद्घ वर्तन केले जाते. एखादी गोष्ट करु नको, उदा., एखाद्या वस्तूला हात लावू नको, असे लहान मुलास सांगितल्यास त्या वस्तूला हात लावण्याची ऊर्मी कधी कधी त्या मुलाला आवरता येत नाही आणि ते मूल केलेल्या सूचनाच्या विरुद्घ जाऊन त्या वस्तूस हात लावते.
माणसाच्या सामाजिक जीवनात सूचनप्रक्रियेला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. सूचनप्रक्रियेद्वारा परंपरागत कल्पना, समजुती, श्रद्घा, मूल्ये रुढी, समाजाचे नियम इ. गोष्टी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला प्राप्त होतात. ह्या प्रक्रियेमुळेच कुटुंब, जात, समाज, पंथ, राष्ट्र ह्यांच्यातील बहुसंख्य व्यक्तींचे विचार, मते, समजुती, आचार, वृत्ती ह्यांत समानता येते. अशा समानतेमुळे त्यांच्यात सामंजस्य, एकोपा व सहकार्य नांदते. सगळ्या शिक्षणाच्या, विद्यार्जनाच्या, ज्ञानप्रसाराच्या मुळाशी सूचनप्रक्रियाच असते. वक्त्याच्या शब्दांची मोहिनी आणि जादूगाराची किमया हीसुद्घा सूचनप्रक्रियेचीच उदाहरणे आहेत.
व्यक्तीच्या आचारविचारांवर जनमताचा जो जबरदस्त प्रभाव पडत असतो, तो सूचनप्रक्रियेद्वारेच पडत असतो. लोक काय म्हणतात, पुढारी काय सांगतात, वर्तानपत्रात काय छापून येते, नाटक-सिनेमांत काय दाखवले जाते, ह्या साऱ्यांचा व्यक्तिमनावर कळत-नकळत परिणाम होत असतो. राजकीय मतप्रचार असो किंवा व्यापारी जाहिरातबाजी असो, त्यात सूचनप्रक्रियेचाच चातुर्याने वापर केलेला असतो. ह्या प्रक्रियेच्या मदतीने व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व घडविता येते वा बदलून टाकता येते. सामाजिक संस्थांची उभारणी करता येते, त्यांची सुधारणा करता येते किंवा त्यांचा नाशही करता येतो. लोकशाही तारता येते, बळकट करता येते किंवा उद्ध्वस्तही करता येते. समाजाची प्रगती साधता येते, गती रोखता येते अथवा अधोगतीही घडवून आणता येते.
संदर्भ : 1. Bandonin, C. Suggestion and Auto-suggestion, London, 1921.
2. Hull, C. L. Hypnosis and Suggestibility, London, 1933.
3. Williams G. W. Suggestibility in Normal and Hypnotic State, London, 1931.
केळशीकर, शं. हि.