सुरक्षा गुणांक : एखाद्या बांधकामाच्या किंवा यंत्राच्या भागाचा अभिकल्प (आराखडा) तयार करताना त्या भागावर पडणारे निरनिराळे भार प्रथम निश्चित करतात. नंतर त्या भागाची मापे ठरविण्यासाठी त्या भागाच्या पदार्थाचे सुरक्षित (वा युक्त) प्रतिबल माहीत असणे आवश्यक असते. हे सुरक्षित प्रतिबल त्या भागाच्या अंतिम प्रतिबलास ज्या एका विशिष्ट अंकाने भागून काढतात, त्या अंकास सुरक्षा गुणांक म्हणतात. प्रबलित सिमेंट काँक्रीट बांधकामावरील अंतिम प्रतिबल व सुरक्षित प्रतिबल यांचे गुणोत्तर म्हणजे सुरक्षा गुणक होय. काँक्रीट ढासळविणाऱ्या भाराच्या काही अंशाने दिलेल्या भाराला युक्त प्रतिबल म्हणतात. ज्या ठराविक मर्यादेपर्यंत त्यातील प्रतिबल वाढविल्यास काँक्रीट ढासळते ती प्रतिबल मर्यादा म्हणजे अंतिम प्रतिबल होय. प्रमाणाबाहेर प्रतिविकृती निर्माण होऊ नये म्हणून काँक्रीटमधील प्रतिबले अंतिम प्रतिबलाच्या एकतृतीयांशापेक्षा जास्त ठेवीत नाहीत. या मर्यादेस युक्त प्रतिबल म्हणतात. याचाच अर्थ काँक्रीटचा सुरक्षा गुणांक तीन म्हणजे अंतिम प्रतिबल व युक्त प्रतिबल यांच्या गुणोत्तराएवढा धरतात.

वस्तूचा अभिकल्प तयार करताना तिच्या धातूतील निर्मितिदोष, वापराची परिस्थिती, अम्लीय व संक्षारक (रासायनिक झीज करणारे) वातावरण, वापरातील धोका (उदा., धातुरसाची किटली तुटणे किंवा खाणीतील पाळण्याचे तारदोर तुटणे) इ. कारणांमुळे केवळ सैद्घांतिक प्रतिबल मूल्य वापरता येत नाही. या व अशा अन्य कारणांसाठी प्रत्येकी एक गुणक मानतात. तसेच यांशिवाय अज्ञात दोषांसाठी आणखी एक गुणक मानतात. या सर्व गुणकांचा गुणाकार केला की सुरक्षा गुणांक मिळतो. सर्वसाधारणपणे पोलादाचे सुरक्षिक प्रतिबल त्याच्या शरण बलाच्या (अंतिम प्रतिबलाच्या) निम्म्याने धरतात, म्हणजे पोलादाचा सुरक्षा गुणांक दोन धरतात. अशाच प्रकारे अभिकल्पासाठी धरावयाचा अंतिम भार व प्रत्यक्ष येणारा भार यांच्या गुणोत्तराला भारांचा सुरक्षा गुणांक म्हणतात.

पहा : काँक्रीट धातूंचे यांत्रिक गुणधर्म बांधकाम : संरचना सिद्घांत व अभिकल्प.

खांडेकर, वि. वि.