सुब्रह्मण्यम्, चिदंबरम : (३० जानेवारी १९१०– ७ नोव्हेंबर २०००). भारतातील एक अर्थतज्ज्ञ, कृषितज्ज्ञ व भारतरत्न या पुरस्काराचे मानकरी. त्यांचा जन्म सुशिक्षित मध्यमवर्गीय कुटुंबात चिदंबर गौंडर व वल्लियाम्मा या दांपत्यापोटी कोइमतूर जिल्ह्यातील (तमिळनाडू) पोल्लची गावी झाला. प्रारंभीचे शिक्षण जन्मगावी घेऊन त्यांनी मद्रास विद्यापीठातून बी.ए., बी.एल्. (१९३३) या पदव्या घेतल्या. या सुमारास महात्मा गांधीजींची असहकार चळवळ देशभर प्रसृत झाली होती. तीत ते सक्रिय सहभागी झाले व त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. या काळातच त्यांनी कोईमतूर येथे वकिली व्यवसाय सुरु केला तथापि स्वातंत्र्य चळवळीपासून ते अलिप्त राहू शकले नाहीत. महात्मा गांधी, राजगोपालाचारी व जवाहरलाल नेहरू यांच्या प्रभावाखाली त्यांनी छोडो भारत आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला (१९४२). त्यांना एक वर्षाची शिक्षा झाली. तत्पूर्वी त्यांचा विवाह शंकुतला या युवतीशी झाला. त्यांना एक मुलगा व दोन मुली आहेत.

भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी त्यांची घटना समितीवर एक सदस्य म्हणून नियुक्ती झाली (१९४६– ५१). स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत ते तत्कालीन मद्रास प्रांतात विधानसभेवर निवडून आले (१९५२). त्यांनी राज्य मंत्रिमंडळात अर्थ, शिक्षण व कायदा मंत्री म्हणून सु. दहा वर्षे (१९५२–६२) कार्यभार सांभाळला. एक कार्यक्षम, कुशल व शिस्तबद्घ प्रशासक म्हणून त्यांचे व्यक्तिमत्त्व प्रभावी ठरले आणि त्यांना राजगोपालाचारी, के. कामराज व भक्तवत्सलम् यांसारख्या दिग्गजांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी सर्वांसाठी प्राथमिक शिक्षण मोफत देण्याची योजना राबविली तसेच दारिद्र्यरेषेखालील मुलांना एकवेळ मोफत जेवणही देण्याची व्यवस्था केली. देशभर त्यांच्या या योजनेचे कौतुक झाले. त्यानंतर ते लोकसभेवर निवडून गेले (१९६२–६७ आणि १९७१–७९). या काळात त्यांनी विविध खात्यांचे मंत्रिपद भूषविले. विशेषतः लालबहादूर शास्त्रींच्या मंत्रिमंडळात ते कृषिमंत्री होते (१९६६). भारत हा कृषिप्रधान देश असून शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्याचा विकास महत्त्वाचा मानून सुब्रह्मण्यम् यांनी शेतीक्षेत्राचे नियोजन केले. याशिवाय त्यांनी विभागीय ग्रामीण बँकेची संकल्पना कृतीत आणून बँकेचे जाळे ग्रामीण भागात पसरवून शेतकऱ्यांना बँकिंग सेवा उपलब्ध करुन दिली. अन्नधान्याच्या बाबतीत देशाला स्वयंपूर्णतेकडे नेण्यासाठी त्यांनी विविध अभिनव योजना कार्यान्वित केल्या आणि शास्त्रीजींचा विश्वास संपादन केला. त्यांनी जगभरातून निवडक बियाण्यांची आयात करुन शेतकऱ्यांस ते वापरण्यास उद्युक्त केले आणि वाजवी दरात ते शासनातर्फे शेतकऱ्यांना पुरविण्याची योजना राबविली. त्यामुळे १९७२ मध्ये गव्हाचे मोठ्या प्रमाणावर पीक येऊन हरितक्रांतीची ती नांदी ठरली. या त्यांच्या कृषिविषयक नव्या धोरणामुळे सुब्रह्मण्यम् यांना ‘आधुनिक कृषी धोरणाचे शिल्पकार’ ही उपाधी प्राप्त झाली.

त्यांनी १९७७ मध्ये सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतली तथापि त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा विचार करुन केंद्र शासनाने त्यांची विविध समित्यांवर नियुक्ती केली. केंद्र शासनाच्या एरोनॉटिक्स उद्योग समितीचे अध्यक्ष (१९६७-६८), राष्ट्रीय कृषी आयोगाचे अध्यक्ष (१९६७– ७१), नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष (१९७१-७२), नॅशनल फौंडेशन फॉर इंडियाचे अध्यक्ष, अविनाशलिंगम् इन्स्टिट्यूट फॉर हायर लर्निंग फॉर वुमेन या संस्थेचे कुलगुरु वगैरे महत्त्वाची पदे त्यांनी भूषविली. केंद्र शासनाने त्यांची अखेरच्या दिवसात महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती केली (१९९०–९३). या पदावर असताना त्यांनी घटनात्मक पेच अत्यंत कौशल्याने हाताळले. त्यानंतर त्यांनी भारतीय विद्याभवन कार्यास वाहून घेतले.

अनेक उच्च्पदावरील जबाबदाऱ्या पार पाडतानाही त्यांचे लेखन-वाचन-चिंतन चालू होते. त्यांनी विपुल ग्रंथलेखन केले. ते बहुतेक इंग्रजीमध्ये असून त्यांच्या ग्रंथांपैकी ट्रॅव्हलॉग्‌ज इन तमिळ, सम कन्ट्रीज विच आय् व्हिजिटेड अराउंड द वर्ल्ड , इंडिया ऑफ माय ड्रीम्स्, वॉर ऑन पॉव्हर्टी, द न्यू स्ट्रॅटेजी इन इंडियन ग्रिकल्चर इ. महत्त्वाचे होत. यांतून त्यांच्या शेतकऱ्यांविषयीच्या समस्या व दारिद्र्य निर्मूलनविषयक प्रयत्नांची कल्पना येते.

शेतकऱ्यांचे कल्याण हा त्यांचा ध्यास होता. त्यामुळे त्यांच्या उद्घारासाठी ते जीवनभर निष्ठापूर्वक प्रामाणिकपणे झगडले. त्यांच्या या अनन्यसाधारण व अविस्मरणीय कार्याबद्दल भारत सरकारने त्यांना ‘भारतरत्न’ हा पुरस्कार देऊन सन्मानित केले (१९९८). त्यानंतर दोन वर्षांनी त्यांचे कोट्‌टुरपुरम् (चेन्नई) येथे वृद्घापकाळाने निधन झाले.

देशपांडे, सु. र.