पीअर्सन, लेस्टर बोल्झ : (२३ एप्रिल १८९७ – २७ डिसेंबर १९७२). कॅनडाचा एक राजकीय मुत्सद्दी, पंतप्रधान आणि शांततेच्या नोबेल पारितोषिकाचा मानकरी. त्याचा जन्म टोराँटो आँटॅरिओ येथे सधन घराण्यात झाला. प्राथमिक शिक्षणानंतर त्याच्या पुढील शिक्षणात पहिल्या महायुद्धामुळे अनेक अडथळे आले. त्याला युध्दकाळातील आणीबाणीमुळे शस्त्रास्त्रांच्या कंपनीत नोकरी करावी लागली. तरीही अखेर १९१९ मध्ये तो टोराँटो विद्यापीठातून पदवीधर झाला. शिवाय ऑक्सफर्ड विद्यापीठातूनही त्याने बी. ए. आणि एम्. ए. या पदव्या संपादन केल्या. टोराँटो विद्यापीठात तो इतिहासाचा अधिव्याख्याता होता (१९२४–२८). त्यानंतर तो परराष्ट्रीय कचेरीत ओटावा येथे नोकरीस लागला (१९२९). ओटावा येथे सु. सहा वर्षे काम केल्यावर त्याची लंडनला पहिला सचिव म्हणून कॅनडियन उच्च आयोगाच्या कार्यालयात नियुक्ती झाली (१९३५). या पदावर त्याने सहा वर्षे काम केले. त्यानंतर तो परराष्ट्र मंत्रालयात अवर सचिव म्हणून आला (१९४१) व पुढे वॉशिंग्टनला कॅनडाचा राजकीय प्रतिनिधी म्हणून गेला. १९४५ च्या सॅन फ्रॅन्सिको परिषदेत त्याने सल्लागाराचे काम केले. त्यानंतर तो परराष्ट्र वकिलातीत एक ज्येष्ठ अधिकारी झाला आणि अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत राजदूत म्हणून त्याने काम केले (१९४५ -४६).

त्याने १९४८ मध्ये राजकारणात प्रत्यक्ष भाग घेतला आणि लिबरल पक्षाचे सदसत्व स्वीकारले. तो संसदेवर निवडून आला. कॅनडाचा परराष्ट्रमंत्री म्हणून त्याने लोकप्रियता मिळविली. नाटो या संघटनेच्या स्थापनेत त्याने पुढाकार घेतला व त्यातील कॅनडियन अनुच्छेदाचे लेखन केले. तो नॉर्थ अटलांटिक कौन्सिलचा १९५१-५२ मध्ये अध्यक्ष होता. पुढे संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेचा एक वर्षांसाठी अध्यक्ष म्हणून त्याची निवड झाली (१९५२). सुएझ प्रश्नाच्या वेळी १९५६ मध्ये त्याने घेतलेली भूमिका अत्यंत प्रशंसनीय ठरली. त्याने अमेरिकेत जाऊन संयुक्त राष्ट्रे या संघटनेचे एक आणीबाणी संरक्षण पथक तयार केले. त्याच्या मध्यस्थीने इंग्लंड-फ्रान्स या देशांच्या युध्दपिपासू वृत्तीला आळा बसला आणि तत्काळ शांतता प्रस्थापित झाली व होऊ घातलेले एक मोठे युध्द टळले. त्याबद्दल त्याला १९५७ चे नोबेल शांतता पारितोषिक देण्यात आले.

आंतरराष्ट्रीय लोकप्रियतेवर तो लिबरल पक्षाचा नेता झाला (१९५८). या वेळी पक्षाची संघटना कोलम़डली होती आणि विरोधी पक्ष म्हणून संसदेत त्यास स्थान होते. पीअर्सनने सर्वतोपरी प्रयत्न करुन पक्षाची संघटना पुन्हा बांधली आणि १९६२ च्या सार्वत्रिक निवडणुकीत त्या पक्षाला २६५ पैकी ९८ जागा मिळाल्या. तथापि शासन बनविण्याची संधी त्याला लाभली नाही पण १९६३ मध्ये जॉन डीफेनबेकरचे सरकार अविश्वासात येऊन पुन्हा निवडणुका झाल्या आणि पीअर्सनला अधिक जागा मिळून तो पंतप्रधान झाला व त्याचा पक्ष सत्तारुढ झाला. सु. पाच वर्षे त्याच्या पक्षाला अतिशय खडतर गेली. पहिला अर्थसंकल्प लक्षवेधी टीकेमुळे त्याला मागे घ्यावा लागला. क्वीबेकचा प्रश्न गुंतागुंतीचा झाला डीफेनबेकर आणि पीअर्सनमध्ये अनेक वेळा खडाजंगी उडे तथापि पीअर्सनने सर्व प्रश्न अत्यंत शांततेने व विचारपूर्वक हाताळले. क्वीबेकची भूमिका त्याने सहानुभूतिपूर्वक ऐकली आणि सत्तावादाच्या संघीय सहकार्याचे एक सूत्र ठरविले. द्वैभाषिकत्व आणि द्विसंस्कृती यांकरिता अभ्यास करण्यासाठी एक रॉयल आयोग नेमला. सरकारने समाजकल्याण योजना वाढविल्या. वैशिष्ट्यपूर्ण असा राष्ट्रीय ध्वज संमत करण्यात आला आणि अमेरिकेबरोबरचे परराष्ट्रीय संबंध अधिक दृढतर करण्यात आले.

पीअर्सनने १९६५ मध्ये सार्वत्रिक निवडणुका जाहीर केल्या. त्याच्या अल्पमतातील शासनाला बहुमत हवे होते परंतु जनतेने म्हणावा तसा प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे पुन्हा अल्पमतातील सरकार सत्तारूढ झाले. अखेर पीअर्सनने स्वेच्छेने राजकारणातून निवृत्ती घेतली (१९६८) पण त्याची थोड्याच दिवसांत जागतिक बँकेच्या परकीय मदतीचा अभ्यास करणाऱ्या समितीवर नियुक्ती झाली.  पंतप्रधान असताना आंतरराष्ट्रीय शांततेसाठी मध्यस्थ म्हणून त्याने १९६३–६८ दरम्यान महत्त्वाची कामगिरी केली. कार्लटन विद्यापीठाचा कुलपती (१९६९) व सन्माननीय अधिछात्र (ऑक्सफर्ड विद्यापीठात) हे मानही त्यास मिळाले. अनेक विद्यापीठांनी सन्माननीय पदव्या त्याला दिल्या आणि फॅमिली ऑफ मॅन अवार्डही (१९६५) मिळाले.

पीअर्सनला लेखन-वाचनाचा छंद होता. प्रत्यक्ष राजकारणात असतानाही त्याने स्फुट व ग्रंथरूपाने विपुल लेखन केले. त्याचे डेमॉक्रसी इन वर्ल्ड पॉलिटिक्स (१९५५), द फोर फेसिस ऑफ पीस (१९६४) वगैरे पुस्तके लोकप्रिय झाली. यांशिवाय त्याने डिप्लोमसी इन द न्यूक्लीअर एज (१९५९), पीस इन द फॅमिली ऑफ मॅन (१९६८). द क्रायसिस ऑफ डिव्हेलपमेन्ट (१९७०) ही आणखी काही पुस्तके लिहिली.

संदर्भ : 1.  Beal, J. R. Pearson of Canada, New York, 1964.

     2.  New man, P. C. The Distemper of Our Times Canadian Politics in Transition 1963–68, Toronto, 1968.

     3. Robertson, Terence Crisis : the Inside Story of Suez Conspiracy, New York, 1965.

देशपांडे, सु. र.