सुईचे विणकाम : सूत, तंतू किंवा धागे विणून कापड तयार करण्याच्या कलेला विणकाम म्हणतात. उभे (ताणा)व आडवे (बाणा) धागे एकमेकांमध्ये पद्घतशीरपणे गुंतवून कापड विणले जाते. धागे एकमेकांत गुंतविण्याचे हे काम मागाच्या किंवा एका वा अनेक सुयांच्या मदतीने केले जाते. सुयांच्या मदतीने करण्यात येणाऱ्या विणकामात अखंड धाग्यामध्ये अंतर्बंधित फासांची मालिका तयार होत जाऊन कापड तयार होते. हे विणकाम हातांनी किंवा यंत्राने केले जाते. या फासांचे उभे स्तंभ म्हणजे वेल आणि फासांच्या आडव्या ओळी म्हणजे कोर्स होत. [⟶ विणकाम].
विणकामाच्या बहुतेक सुया १८–३५ सेंमी. लांब असतात. सुईचे एक टोक अणकुचीदार व फासे सुईवरून सरकून निघून जाऊ नये म्हणून दुसऱ्या टोकाला बोंड असते. पूर्वी सुईच्या एका टोकाला आकडा असून तो झाडाची डहाळी, हाडाचे तुकडे वा तांब्याच्या तारेचा असे. आता आधुनिक सुयांची टोके बोथट असतात आणि सर्वसाधारणपणे त्या ॲल्युमिनियम, पोलाद, लाकूड किंवा प्लॅस्टिक यांच्या असतात. कोणते कापड विणायचे त्याच्या स्वरूपानुसार सुयांची जाडी व धाग्याचे प्रकार ठरवितात. नाजुक कापडासाठी बारीक सुई व वजनाला हलका धागा निवडतात, तर भरड कापडासाठी जाड सुया व भरड धागा वापरतात. लोकरीचा धागा हा सुयांच्या विणकामाचा परंपरागत धागा आहे. मात्र कापसाचे सूत, रेशीम किंवा ॲक्रिलिकासारखे कृत्रिम तंतूही या विणकामासाठी वापरतात. तसेच अशा तंतूंचा संमिश्र धागाही वापरतात. सपाट कापड विणण्यासाठी दोन सुया तर मोजाचे नलिकाकार कापड विणण्यासाठी तीन वा चार सुया वापरतात. सुयांच्या विणकामाच्या ताणा पद्घत, बाणा पद्घत, गोल पद्घत व मिश्र पद्घत या प्रमुख पद्घती आहेत.
स्वेटर, मोजे, स्कार्फ, टोप्या, बनियन वा गंजीफ्रॉक इ. अनेक होजियरी कपडे सुयांच्या विणकामाने तयार करतात. हे कपडे ताणता येतात व ताण काढल्यावर ते सामान्यपणे मूळ आकाराचे होतात, म्हणून असे कपडे लोकप्रिय झाले आहेत. नाजुक झालरी (लेस) ते जाड रग यांसारखे कापडही सुयांनी विणतात. सजावटीच्या व सुशोभनाच्या कापडी वस्तूही सुयांच्या विणकामाद्वारे तयार केल्या जातात.
इतिहास : सुईचे विणकाम हे माणसाच्या लिखित इतिहासाच्या पुष्कळच आधीचे आहे. याचा प्रारंभ कधी झाला ते निश्चितपणे माहीत नाही. गवतापासून विणलेली मासेमारीची जाळी, चटया व टोपल्या यांच्या विणकामातून सुईचे विणकाम पुढे आले असावे. ईजिप्तमध्ये इ. स. पू. चवथ्या शतकात लोकरीचे मोजे वापरात होते. इ. स. पू. १००० वर्षांपासून अरब जमातीत एक किंवा दोन सुया वापरून कापड विणीत असत. नंतर ही कला विशेषतः फ्रान्स व इटली या यूरोपीय देशांत अधिक पसरली. मध्ययुगात स्पेन, ऑस्ट्रिया व जर्मनी येथे दोऱ्याच्या साहाय्याने गाठी मारलेली रंगीबेरंगी वस्त्रे व प्रावरणे हाताने विणून बनवीत. तर नेदर्लंड्समध्ये उलट्या टाक्याच्या विणीचा वापर करून कापडावर नैसर्गिक चित्रे काढीत. अशा प्रकारे हातांच्या साहाय्याने सुयांनी विणून कापड तयार करण्याची कला भारत व चीन येथेही प्रचलित होती.
मध्यपूर्वेतील लोकांकडून इ. स. ६००– ७०० च्या सुमारास ही कला यूरोपमध्ये आली. त्यानंतर संपूर्ण यूरोपात अशा विणकरांचे मजूर संघ तयार झाले. स्पॅनिश लोकांनी ही कला मध्य व दक्षिण अमेरिकेत नेली (सु. १५००–१६००). मात्र ही कला तेव्हा तेथील काही लोकांना आधीच अवगत असण्याची शक्यता आहे. कारण पेरू व अँडीज पर्वतराजी येथे अशा विणकामाने बनविलेल्या टोप्या वापरात होत्या. आयर्लंडमध्येही कोळी सुयांनी विणलेले स्वेटर वापरीत. स्पॅनिश अमेरिकन संस्कृतीत सुयांचे विणकाम हा शेतकऱ्यांचा लोकप्रिय व व्यावहारिक विरंगुळा होता. कारण शीत हवामानात उबदार कपडे बनविणे गरजेचे असे.
इ. स. १५८९ मध्ये विल्यम ली या इंग्रजी धर्मगुरुंनी सुयांच्या मदतीने कापड विणण्याचे लहान घरगुती यंत्र तयार केले. हे यंत्र म्हणजे उघडी चौकट होती. तिच्यावर पक्क्या बसविलेल्या आकड्यांची एक आणि तिला लंब दिशेने हलत्या आकड्यांची एक मालिका होती. सुयांच्या यांत्रिक विणकामाची ही सुरुवात म्हणता येईल. मात्र हातांनी सुयांचे विणकाम करणाऱ्यांनी याला दीर्घकाळ विरोध केला होता. १७५८ मध्ये जेडेडिया स्ट्रट या इंग्रज संशोधकाने चौकट बनविली. तिच्यावर अधिक प्रगत व गुंतागुंतीचा कटक (रिब) टाका तयार करता येऊ लागला. १८१६ मध्ये सर मार्क इझॅम्बार्ड ब्रूनेल (इंग्लंड) यांनी नलिकाकार कापड विणणारे वर्तुळाकार यंत्र बनविले. हे यंत्र बहुधा पायमोजे विणण्यासाठी वापरीत. १८३२ मध्ये प्रथम ईशान्य अमेरिकेत विजेवर चालणारे सुयांच्या विणकामाचे यंत्र तयार करण्यात आले. नंतर ते यूरोपात वापरायला सुरुवात झाली. १८४०–५० दरम्यान मॅथ्यू टाउनसेंड यांनी आकडा-खिटी (लॅच) सुई शोधून काढली. तिच्यामुळे सुईचे विणकाम अधिक सुलभ झाले आणि विणकामाची गतीही चांगलीच वाढली. १९९० सालापर्यंत सुयांच्या विणकामाच्या यंत्रांचा अभिकल्प (आराखडा) सतत सुधारला जाऊन परिपूर्ण बनला होता. याच सुमारास संगणक नियंत्रित सुयांच्या विणकामाची यंत्रे पुढे आली. यामुळे सुयांच्या विणकामाची विविधता व यंत्रांचे अभिकल्प यांमध्ये मोठी वाढ झाली.
पहा : कापड उद्योग गालिचे तंतु, कृत्रिम तंत्रविद्या रेशीम लोकर होजियरी.
संदर्भ : 1. Compton, Rae Complete Book of Traditional Knitting, 1963.
2. Kiewe, H. E. The Sacred History of Knitting, 1967.
3. Philips, Mary W. Creative Knitting, 1986.
4. Reader’s Digest, Complete Guide to Needle Work, 1979.
5. Thomas, D. G. D. An Introduction to Warp Knitting, 1976.
6. Wignall, H. Knitting, 1964.
ठाकूर, अ. ना.