सिसरो, मार्कस टलिअस : (इ. स. पू. ३ जानेवारी १०६—७ डिसेंबर ४३). प्राचीन रोममधील एक प्रसिद्घ मुत्सद्दी, विधिज्ञ आणि प्रभावी वक्ता. त्याचा जन्म आर्पायनम, लँटिअम— आता आर्पीनो, इटली – येथे एका सधन कुटुंबात झाला. त्याचे शिक्षण रोम आणि अथेन्समध्ये झाले. इ. स. पू. ८९ मध्ये तो लष्करी सेवेत गेला तथापि पुढे उत्तम विधिज्ञ म्हणून त्याने लौकिक मिळविला. इ. स. पू. ८१ मध्ये तो विधिज्ञ म्हणून पहिल्यांदा न्यायालयात उभा राहिला. इ. स. पू. ८० मध्ये वा ७९ च्या आरंभी सेक्स्टस रॉशिअस ह्याच्यावर ठेवलेल्या खुनाच्या खोट्या आरोपातून सिसरोने त्याला मुक्त करविले. तेव्हापासून कुशल विधिज्ञ म्हणून त्याची ख्याती झाली. इ. स. पू. ७५ मध्ये प. सिसिलीचा क्वेस्टर (कोषागारावरचा अधिकारी) म्हणून निवडला गेल्यानंतर त्याच्या सार्वजनिक जीवनास आरंभ झाला. त्यानंतर इ. स. पू. ६६ मध्ये प्रेटर (हाती बरीच सत्ता असलेला न्यायाधिकारी) आणि कॉन्सल (सर्वोत्कृष्ट राजकीय अधिकारी) म्हणून तो निवडला गेला (इ. स. पू. ६३). रोमन राजकारणी कॅटिलिन ह्याने रोममध्ये सशस्त्र उठाव करण्याचा प्रयत्न केला होता. तो सिसरोने हाणून पाडला. कॅटिलिन पळून गेला पण त्याच्या पाच साथीदारांना देहान्त शासन देण्यात आले. ह्या शासनाचे सिसरोने समर्थन केले होते आणि सीझरने विरोध केला होता. इ. स. पू. ६०— ४९ ह्या कालखंडात पॉम्पी, ⇨ ज्यूलिअस सीझर आणि क्रॅसस ह्या तिघांनी संयुक्तपणे रोमचा राज्यकारभार केला. ही शासक त्रयी (ट्रायमव्हिरेट) कायदेशीरपणे अधिकारावर आलेली नाही, अशा भूमिकेतून सिसरोचा त्याला विरोध होता. सिसरोने ह्या सत्तावंतांच्या जवळ यावे, म्हणून सीझरने प्रयत्न केला होता, परंतु सिसरोने त्यास नकार दिला. इ. स. पू. ५८ मध्ये सिसरोचा कट्टर शत्रू पब्लिअस क्लॉडिअस हा ट्रिब्यून (लोकांच्या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी लोकांकडून निवडून गेलेला अधिकारी) म्हणून निवडला गेला. कॅटिलिनच्या साथीदारांना शिक्षा देताना कायद्याचे योग्य प्रकारे पालन झाले नाही, असा आरोप करुन ज्यांनी हे कृत्य केले त्यांना परागंदा करावे असे विधेयक त्याने आणले. ह्याचा रोख अर्थातच सिसरोवर होता. ह्या प्रसंगी सीझर क्लॉडिअसच्या मागे उभा राहिला. सिसरोने पॉम्पीला निष्ठा दिलेली होती पण त्यानेही सिसरोला मदत केली नाही. परिणामतः सिसरो रोममधून पळाला (इ. स. पू. ५८). त्यानंतर त्याची मालमत्ता जप्त करण्यात आली. त्याच्या घराचाही नाश करण्यात आला. तथापि पुढे पॉम्पीची अनुकूलता प्राप्त झाल्यामुळे त्याला पुन्हा रोमला बोलावण्यात आले.
इ. स. पू. ५७-५६ मध्ये सिसरोने पॉम्पीला सीझरपासून दूर करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. त्यावेळी शासक त्रयीमध्ये राजकीय ताण निर्माण झाले होते आणि शासक त्रयी टिकवण्याच्या दृष्टीने इटलीतील ल्यूका ह्या शहरात हे तिघे एकत्र आले होते. पॉम्पीने सिसरोचा सल्ला धुडकावून देवाणघेवाणीच्या पायावर आधारलेला सलोखा केला. पॉम्पीच्या दबावामुळे सिसरोला हे मान्य करावे लागले. त्यानंतर जवळपास ४ वर्षे तो राजकारणाबाहेर होता. हा काळ त्याने मुख्यतः लेखनासाठी व्यतीत केला. इ. स. पू. ५१ मध्ये सिसरोला एका वर्षासाठी सायलीशियाचे प्रशासकपद (गव्हर्नर) देण्यात आले. इ. स. पू. ५० मध्ये तो रोमला परत आला परंतु त्यावेळी पॉम्पी आणि सीझर ह्यांच्यात यादवी युद्घ पेटले होते. ते थांबविणे आता त्याला शक्य नव्हते पण तो पॉम्पीच्या बाजूला होता. ह्या यादवी युद्घात सीझर विजयी झाला पण सर्वंकष सत्ता हाती येऊनही त्याने सिसरोला क्षमा केली. पुढे सीझरचा खून झाला. ह्या खुनाच्या कटात सिसरो सहभागी नव्हता पण त्याने त्या कृत्याची प्रशंसा केली. त्यानंतर अथेन्सला जाऊन आपल्या मुलाकडे राहण्याचा त्याचा इरादा होता तथापि तसे होण्याऐवजी त्याने रोममध्ये जाऊन अँटनीविरुद्घ १४ भाषणे दिली. फिलिपिक ओरेशन्स ह्या नावाने ती प्रसिद्घ आहेत. विख्यात अथेनियन वक्ता आणि मुत्सद्दी डिमॉस्थिनीझ ह्याने मॅसिडोनियाचा दुसरा फिलिप ह्याच्या विरुद्घ व्याख्याने दिली होती. फिलिपिक ओरेशन्स ह्या नावाला ह्या इतिहासाचा संदर्भ आहे. अँटनी, ऑक्टेव्हिअन आणि लेपिडियस ह्या तिघांची संयुक्त सत्ता रोमवर आल्यानंतर (सेकंड ट्रायमव्हिरेट) सिसरोचे जीवित धोक्यात आले. केईटा (आता गॉएटा) येथे त्याला पकडून ठार करण्यात आले. त्याचे डोके आणि हात ह्यांचे सार्वजनिक प्रदर्शन करण्यात आले.
रोमचे प्रजासत्ताक जपायला हवे, अशी सिसरोची इच्छा होती परंतु रोमन प्रजासत्ताकाच्या प्रशासनातल्या अंतर्गत दुबळ्या जागांचे भान त्याने फारसे ठेवले नव्हते. उत्तम विधिज्ञ आणि वक्ता म्हणून कीर्ती मिळवलेला सिसरो बहुधा बचाव पक्षाच्या वतीनेच न्यायालयात उभा राही मात्र तो लढवीत असलेल्या खटल्यांत त्याची बाजू नेहमीच भक्कम नैतिकतेची होती, असे नाही. आपले उत्कृष्ट वक्तृत्व विकसित करण्यासाठी अनेक वक्त्यांच्या वक्तृत्वशैलीत जे जे उत्तम ते ते त्याने आत्मसात केले. साहित्याचे उत्तम ज्ञान, तत्त्वज्ञानाचा सखोल पाया, कायद्याचे सूक्ष्म ज्ञान, ऐतिहासिक तपशिलांचे त्वरित संदर्भ देण्याची कुशलता, क्रोध, करुणा अशा भावना उद्दीपित करणे असे गुण त्याच्या वक्तृत्वात होते. त्याच्या भाषणांपैकी आज सु. ५७ भाषणे उपलब्ध आहेत त्यांतील काही त्रुटित स्वरुपात आहेत.
त्याच्या लेखनात ४ पत्रसंग्रह, तसेच तत्त्वज्ञान, वक्तृत्वशास्त्र ह्यांसारख्या विषयांवरील सु. २० ग्रंथांचा समावेश होतो. त्याच्या पत्रसंग्रहात एकूण ८६४ पत्रे असून त्यांतील ७७४ त्याने लिहिलेली, तर ९० त्याला इतरांकडून आलेली आहेत. त्याची बरीचशी पत्रे त्याच्या आयुष्याच्या अखेरच्या पर्वातील आहेत पण ती मनमोकळी आहेत. राजकारणाप्रमाणेच तत्त्वज्ञान आणि साहित्य हे त्याच्या आस्थेचे आणि अभ्यासाचे विषयही ह्या पत्रांतून येतात. त्याच्या ग्रंथांत रोमन वक्तृत्वाचा इतिहास त्याने लिहिला अनेक रोमन वक्त्यांचा परामर्श घेतला. वक्तृत्वशास्त्रविषयक ग्रंथांत—ब्रूटस, ऑरेटरमध्ये—त्याने वेगवेगळ्या वक्तृत्वशैलींची आणि वक्तृत्वाच्या तांत्रिक अंगांची चर्चा केली. सिसरोने ⇨ आरेटस ह्या ग्रीक ग्रंथकाराच्या फैनोमेना ह्या ग्रंथाचा लॅटिन अनुवाद केला होता. तसेच त्याच्या लेखनात ग्रीक महाकवी ⇨ होमर च्या महाकाव्यातील काही भागांची, तसेच ग्रीक नाटककारांच्या नाटकांतील काही परिच्छेदांची त्याने केलेली भाषांतरे अंतर्भूत आहेत. त्याने काव्यरचनाही केली. त्याच्या उपलब्ध कविता त्रुटित स्वरुपात आहेत.
संदर्भ : 1. Cowell, Frank R. Cicero and the Roman Republic, 5th Ed., Middlesex (Eng.), 1973.
2. Dorey, T. A. Ed. Cicero, London, 1965.
3. Frisch, Hartvig, Cicero’s Fight for the Republic, Copenhagen, 1946.
4. Peterson, Torsten, Cicero : A Biography, 1920.
5. Smith, R. E. Cicero the Statesman, 1966.
6. Stockton, David, Cicero : A Political Biography, 1971.
कुलकर्णी, अ. र.
“