सिल्हेट : बांगला देशाच्या ईशान्य भागातील एक औद्योगिक शहर व सिल्हेट विभागाचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या ४,६४,१९८ (२००८). सुरमा नदीखोऱ्यातील हे शहर या नदीच्या उजव्या काठावर वसलेले असून ते रस्त्याने व लोहमार्गाने वायव्येस चाटाक, नैर्ऋत्येस हाबिगंज तर हवाई मार्गाने डाक्का या बांगला देशातील मोठ्या शहराशी तसेच रस्त्याने भारतातील आसाम व मेघालय या राज्यांशी जोडलेले आहे.

सिल्हेट शहर पूर्वी ‘श्रीहट्ट’ या नावाने ओळखले जात होते. चौदाव्या शतकामध्ये गौर या हिंदू राज्याचा राजा गोविंद याची राजधानी येथे होती. या शतकाच्या अखेरीस मुसलमानांनी फकीर शाह जलाल याच्या मदतीने येथील हिंदू राजाला जिंकून या ठिकाणावर व प्रदेशावर आपला अंमल प्रस्थापित केला. १७७८ मध्ये लिंडसे या जिल्हाधिकाऱ्याने केलेल्या उल्लेखानुसार हे एक छोटे गाव होते याच्या परिसरातील टेकड्यांच्या उतारांवर स्थानिक रहिवाशांनी उत्कृष्ट पद्घतीने घरे बांधलेली होती. येथील जंगलवाढीमुळे ही घरे नष्ट झाली. १८९७ च्या भूकंपामध्ये या गावाचे अतोनात नुकसान झाले. त्यानंतर हे शहर पुन्हा वसविण्यात आले.

भरपूर पाऊस असला तरी थंड व आरोग्यवर्धक हवामानासाठी हे शहर प्रसिद्घ आहे. येथे १८७८ मध्ये नगरपालिकेची स्थापना करण्यात आली. शिंपल्याच्या बांगड्या, वेताच्या वस्तू, काडेपेट्या, वनस्पती तेल, शीतलपाटी चटया, सुती कपडे, चहा इ. निर्मिती-उद्योगांसाठी व अनेक हस्तव्यवसायांसाठी हे शहर प्रसिद्घ आहे. शहरात एक वैद्यक महाविद्यालय व अन्य काही शासकीय महाविद्यालये असून ती चितगाँग विद्यापीठाशी संलग्न आहेत. येथील शाह जलाल मशीद व अनेक मुसलमान संतांच्या कबरी प्रसिद्घ आहेत. शहरात सर्व जिल्हा शासकीय कार्यालये आहेत.

चौंडे, मा. ल.