सिराक्यूस – १ : इटलीतील एक इतिहासप्रसिद्घ प्राचीन नगरराज्य, बंदर व पर्यटनस्थळ. सिराक्यूसा या सिसिलियन प्रांताचे ते मुख्यालय असून त्याची लोकसंख्या १,२३,४०८ (२०११) होती. ते सिसिलीच्या पूर्व किनाऱ्यावर कातेन्याच्या दक्षिणेला सु. ५३ किमी. व पालेर्मोच्या आग्नेयीस सु. २०८ किमी.वर वसले आहे. लिटल हार्बर आणि ग्रेट हार्बर ही दोन बंदरे त्याच्या किनारपट्टीत असून त्यांचा शहराच्या अर्थकारणात मोठा वाटा आहे.
सिराक्यूस या नगराची स्थापना कॉरिंथियनांनी ऑर्किअसच्या नेतृत्वाखाली इ. स. पू. ७३४ मध्ये केली. अल्पावधीतच सिसिलीमधील ते एक महत्त्वाचे नगर झाले. तिथे अभिजनवर्गाने (गॅमोरॉई) स्वल्पतंत्र (ऑलिगार्की) राज्यपद्धती प्रस्थापिली. हिपॉक्राटीझने सिराक्यूसांचा पराभव करुन ही नगरी हस्तगत केली तथापि कॉर्फ्यू व कॉरिंथ या नगरराज्यांनी मध्यस्थी केल्यामुळे लोकशाही राज्यपद्धतीत बदल झाला नाही. त्यानंतर जीलॉन (इ. स. पू. ५४०— ४७८) हा सेनापती-हुकूमशाह सिराक्यूसचा सर्वेसर्वा झाला. त्याच्या कारकीर्दीत सिराक्यूस एक बलशाली नगरराज्य बनले. जीलॉनच्या लष्करात २०० युद्घनौका, २०,००० पायदळ आणि मोठे घोडदळ होते. त्याने नगराला तटबंदी केली. त्याच्यानंतर त्याचा भाऊ पहिला हाइरॉन (इ. स. पू. ४७८— ४६६) सत्ताधीश झाला. त्याच्या दरबारात सायमॉनिडीझ, पिंडर, एस्किलस वगैरे कवी-तत्त्वज्ञ होते. इ. स. पू. ४६६ मध्ये हाइरॉनच्या वारसाला क्रांतिकारकांनी पदच्युत करुन सिराक्यूसमध्ये घटनात्मक लोकशाही आणली पण त्यांना कार्थेजिनियनांच्या पुनरुत्थानास तोंड द्यावे लागले. शिवाय अंतर्गत कलह माजला होता. तेव्हा पहिला डायोनिशिअस (कार. इ. स. पू. ४०५— ३६७) या सेनाधिकाऱ्याने सत्ता हाती घेऊन हुकूमशाही आणली आणि सिराक्यूसला पूर्व वैभव प्राप्त झाले. त्याचा मुलगा दुसरा डायोनिशिअस (इ. स. पू. ३६७— ३४३) त्याच्यानंतर गादीवर आला. तो दुबळा व ऐशारामी होता. तेव्हा राज्याचे तुकडे पडले. त्याचा चुलता डॉयनने बंड केले आणि यादवी माजली. साम्राज्य मोडकळीस आले. या अनागोंदीतून कॉरिंथमधील मुत्सद्दी टिमोलिऑन (इ. स. पू. ३४३— ३३७) याने सिराक्यूसला वाचविले आणि लोकशाहीची पुनर्स्थापना झाली पण अल्पावधीतच ॲगाथोक्लिज या सेनापतीने ती बरखास्त करुन राजा हा किताब धारण केला. त्यानंतर सिराक्यूसमध्ये पुन्हा यादवी माजली. कार्थेजने त्यास वेढा दिला. यावेळी ईपायरसचा राजा पिऱ्हस (इ. स. पू. ३१९— २७२) याने सिराक्यूसचा बचाव केला. त्याच्या भाडोत्री सैन्याने मेसिनाला वेढा घातला. तेव्हा दुसरा हाइरॉन (इ. स. पू. ३०८— २१५) याने पिऱ्हसचा पराभव करुन सिराक्यूस हस्तगत केले. त्याने रोमशी समझोता करुन प्यूनिक युद्घात सहकार्य केले परंतु दुसऱ्या प्यूनिक युद्घात कार्थेजची बाजू घेतली. त्याचा बदला रोमने सिराक्यूस जिंकून घेतला आणि तिथे वसाहत केली. सिराक्यूसचे स्वातंत्र्य नष्ट झाले, तरी व्यापारी महत्त्व अबाधित होते. रोमच्या अधःपतनानंतर बायझंटिन (६६५— ६६८) व अरब (८७८) यांनी त्यावर आधिक्य गाजविले. १६९३ च्या भूकंपात नगराचे नुकसान झाले. दुसऱ्या महायुद्घात ब्रिटिशांनी १९४३ मध्ये ते उद्ध्वस्त केले तथापि युद्घोत्तर काळात तेथील अनेक ऐतिहासिक वास्तूंची पुनर्बांधणी झाली.
अनेक आक्रमणे, भूकंप यांत नगराचे नुकसान झाले असले, तरी अद्यापि अनेक पुरातत्त्वीय वास्तूंचे अवशेष येथे आढळतात. त्यांत दुसऱ्या हाइरॉनने बांधलेले ग्रीक थिएटर रोमन रंगमंडले (ॲम्फिथिएटर), वेदी (अल्टर) या उल्लेखनीय वास्तू होत. येथील अरेथुसानामक कारंजा तत्संबंधीच्या दंतकथांमुळे विशेष प्रसिद्घ आहे. ऑर्तिजीआमधील बरोक शैलीतील दर्शनी भाग असलेले कॅथीड्रल, अथेना देवतेच्या मंदिरातील डोरिक शैलीतील कलाकुसरयुक्त स्तंभ ही या नगराची काही कलात्मक वैशिष्ट्ये होत. येथील पुरातत्त्वीय संग्रहालयामध्ये अन्य वस्तूंसोबत काही रंगीत मृत्स्नाशिल्पे असून अपोलो देवतेच्या मंदिराचे अवशेष ठेवले आहेत. ऑलिम्पियन झ्यूस देवतेचे येथील अवशिष्ट मंदिर प्रसिद्घ आहे. ॲगोरा ही प्राचीन बाजारपेठ आणि बाराव्या शतकातील सॅन जोव्हान्नीचे चर्च व मध्ययुगीन अरुंद रस्त्याच्या बाजूस असणाऱ्या जीर्णशीर्ण वास्तू यांतून प्राचीन सिराक्यूसचे वैभव दृग्गोचर होते. येथे अनेक प्राचीन राजवाड्यांचे अवशेष आढळतात. त्यांपैकी मॉनताल्तो राजवाड्याचा आकर्षक दर्शनी भाग, बेल्लोमो व पॅरिशिओ प्रासाद हे तेराव्या-चौदाव्या शतकांतील गॉथिक शैलीतील उत्कृष्ट नमुने होत. याशिवाय जोव्हान्नी व्हर्मीक्सीओचा नागरी राजवाडा (१६२८) व ल्यूसिॲनो अलीचा बेनेव्हेन्टॅनो डेल बॉस्को राजवाडा (१७७५) हे तत्कालीन वास्तुशास्त्रीय प्रगतीचे खास आदर्श होत.
विद्यमान सिराक्यूस हे मच्छीमारीचे देशातील एक प्रमुख केंद्र असून कालव व मसल जातींच्या माशांसाठी ते विशेष प्रसिद्घ आहे. याशिवाय शहरात खाणीतील मीठ शुद्घीकरणाचे आणि वनस्पती तेलाच्या शुद्घीकरणाचे कारखाने आहेत. द्राक्षांपासून मद्यार्क (वाइन) निर्मितीचे हे एकप्रमुख शहर असून येथे सिमेंट, साबण, इलेक्ट्रीक उपकरणे वगैरेंच्या निर्मितीचे लहानमोठे कारखाने आहेत. कृषी उत्पादनाची मोठी बाजारपेठ येथे असून पर्यटन केंद्र म्हणून त्यास विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
देशपांडे, सु. र.