सिपिओ ॲफ्रिकेनस (धाकटा) : (इ. स. पू. ? – १२९). एक पराक्रमी रोमन सेनापती. त्याचे पूर्ण नाव पब्लिअस कॉर्नीलिअस सिपिओ इमिलिअस ॲफ्रिकेनस न्यूमन्‌नायनस. सिपिओचा जन्म लष्करी परंपरा असलेल्या घराण्यात झाला. ल्यूसिअस इमिलिअस पौलस मॅसेडोनिकस हे त्याचे वडील. त्यांचा हा दुसरा मुलगा. वडील हे मॅसेडोनियन युद्घातील पराक्रमी सेनानी होते. सिपिओच्या जन्मानंतर त्यांनी पॅपिरिया या पत्नीपासून घटस्फोट घेतला. तेव्हा तो थोरला पब्लिअस सिपिओ ॲफ्रिकेनस यास दत्तक गेला. त्यामुळे हॅनिबलचा पराभव करणारा थोरला सिपिओ आणि मॅसिडोनियाच्या पर्सिसचा विजेता अशा दोन रोमन सेनापतींचा वारसा त्याला मिळाला. त्याच्या जीवनावर तत्कालीन ग्रीक इतिहासकार ⇨ पॉलिबिअस याचा प्रभाव होता. दोघांची घनिष्ठ मैत्री झाली होती. त्याचा परिणाम म्हणजे सिपिओ उदार, नीतिमान व दयाशील बनला. अन्य सेनापतींप्रमाणे त्याने पराजित सैनिकांना हिंस्र श्वापदांपुढे कधीच टाकले नाही. त्याची क्वेस्टर म्हणून निवड झाली (इ. स. पू. १५२). या सुमारास स्पेनमध्ये रोमन सैन्याचा पराभव झाला होता आणि जे कॉन्सल या घटनेला जबाबदार होते, त्यांना ट्रिब्यूनने तात्पुरते तुरुंगात धाडले होते सिपिओला मॅसेडोनियात पाठविले होते. तिथून त्याने स्पेनमध्ये जाण्याची तयारी दर्शविली. प्रथम त्याला इ. स. पू. १५० मध्ये आफ्रिकेत न्युमिदियन राजा मॉसिनिसा (इ. स. पू. २३८— १४९) याच्याकडून काही हत्ती आणण्यासाठी पाठविले. त्यावेळी मॉसिनिसा व कार्थेज यांमध्ये संघर्ष सुरु होता. सिपिओने मध्यस्थी करावी आणि युद्घबंदी व्हावी, अशी अपेक्षा कार्थेजने केली पण वाटाघाटी फिसकटल्या. तेव्हा सिपिओने रोमन सैन्यासह पुन्हा आफ्रिकेत येऊन कार्थेजचा पराभव केला आणि मॉसिनिसाच्या मृत्यूनंतर त्याचे न्युमिदिया हे राज्य त्याच्या तीन मुलांत विभागून दिले. त्यामुळे एकत्रित न्युमिदियाचा धोका टळला परंतु कार्थेजने पुन्हा रोमला युद्घात ओढले (इ. स. पू. १४८). त्याचे नियत वय कमी होते तरीही त्याची कॉन्सल पदावर अपवादात्मक रीत्या निवड झाली (इ. स. पू. १४७) आणि त्याच्याकडे आफ्रिकेतील युद्घाचे संपूर्ण नेतृत्व (कमांड) देण्यात आले. त्याने जमिनीवरुन व समुद्रमार्गे नाकेबंदी केली आणि कार्थेजला वेढा घातला आणि सहा दिवसांच्या घनघोर युद्घानंतर कार्थेज उद्ध्वस्त करण्यात आले (इ. स. पू. १४६). नंतर कार्थेजियन भूक्षेत्राचे संघटन करुन नवीन रोमन प्रांताची स्थापना केली व रोमला तो परतला. यानंतर त्याला स्पेनमध्ये धाडले. याठिकाणी रोमनांना युद्घात नामुष्की पत्करावी लागली होती आणि त्यांचे सैन्य अनेक वर्षे युद्घात गुंतून राहिले. टायबेरियस गाकस या त्याच्या मेहुण्याने दोन्ही सैन्यात समझोता करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता पण सिपिओच्या मध्यस्थीमुळे त्याची नामुष्की वाचली.

सिपिओची पुन्हा कॉन्सलपदी नियुक्ती झाली (इ. स. पू. १३४). ती घटनाबाह्य होती, अशी चर्चा सुरु झाली तथापि त्याने स्पेनविरुद्घ मोहीम आखली. बरोबर पाचशे स्वयंसेवक व पाचशे मित्र अंगरक्षक म्हणून घेतले. सैन्यात शिस्त आणली. त्याचे पहिले उद्दिष्ट सेल्टिबेरियन राजधानी हे होते. ते नगर न्यूमॅन्शियमध्ये एका टेकडीवर वसले होते. या नगराची नाकेबंदी करुन त्याने रसद तोडली. नगराभोवती भिंत बांधून टेहळणीसाठी सात छावण्या बांधल्या आणि वेढा घातला. आठ महिन्यांनी आतील ४,००० सैनिक शरण आले. रोमनांनी नगर जाळले. रोमचे स्पेनवर वर्चस्व प्रस्थापित झाले आणि विजयश्री मिळवून सिपिओ रोमला शाही थाटात परतला (इ. स. पू. १३३). यामुळे त्याचा सिनेटमध्ये नावलौकिक झाला.

एक सेनापती म्हणून त्याने रोमन साम्राज्याची कीर्ती वाढविली, राज्यविस्तार केला तथापि त्याला टायबेरियस ग्राकससारखे अनेक राजकीय शत्रू होते. त्याचे राजकीय हेतू आणि आदर्श तत्कालीन सीनेट व ट्रिब्यून (लोकनेता) यांना अडचणीचे वाटत कारण रोमचा परंपरागत दर्जा टिकविण्याकडे त्याचा कल होता. मूलतः कलाभिज्ञ असलेल्या सिपिओचे गेयस लीलिअस, पॉलिबिअस, टेरेन्स (कवी), गेअसल्युसिलिअस, पनिशिअस वगैरे तत्कालीन विद्वान, तत्त्वज्ञ, कवी आदी मित्र होते. सिसरोच्या मते तो सुसंस्कृत, उदारमतवादी, आदर्श राजनीतिज्ञ होता. त्याने लॅटिन साहित्याच्या विकासासाठी, विशेषतः रोमन आणि ग्रीक विचारांच्या समन्वयासाठी प्रयत्न केले. ट्रिब्यून टायबेरियस ग्राकस याच्या राजकीय धोरणांना त्याचा विरोध होता. इटालियन प्रश्नावर तो सिनेटमध्ये भाषण देणार होता, त्याच्या आदल्या दिवशी तो शयनगृहात मृत अवस्थेत आढळला.

गायकवाड, कृ. म.