सिरिड : (कडवा सिरिड, करवाई क. बोग्गी, हिरेमरा लॅ. हायमेनोडिक्टिऑन ओबोव्हॅटम कुल-रुबिएसी). सुमारे १५ मी. उंचीच्या ह्या मोठ्या पानझडी वृक्षाचा प्रसार कोकण व उ. कारवारच्या दाट जंगलांत असून प. द्वीपकल्पात मुंबई ते त्रावणकोरपर्यंत (कोचीन) तो आढळतो. साल जाड, मऊ व करडी असून तिचे लहानमोठे खवले निघतात. पाने व्यस्त अंडाकृती, टोकास निमुळती व दोन्ही बाजूंनी गुळगुळीत असतात. फुले लहान, हिरवट पांढरी असतात. फुलोरा (परिमंजरीय कणिश प्रकारचा) ऑगस्ट-सप्टेंबरात येतो. बोंड लांबट गोल व खरखरीत बोंडांच्या लक्षणांवरुन त्याचे दोन प्रकार ओळखता येतात. अंतर्साल कडू व स्तंभक असून क्विनिनाऐवजी वापरतात. लाकूड भुरकट करडे, मऊ व हलके असून भोरसळाप्रमाणे उपयुक्त असते.

पहा : भोरसळ रुबिएसी.

जमदाडे, ज. वि.