सिडनी – १ : ऑस्ट्रेलियातील सर्वांत मोठे महानगर, एक औद्योगिक शहर व नैसर्गिक बंदर. लोकसंख्या — महानगर विभाग ४६,२७,३४५ शहर १,५६,५७१ (२०१२). क्षेत्रफळ १२,४०७ चौ. किमी. ते ऑस्ट्रेलियाच्या आग्नेय किनाऱ्यावर वसले आहे. ते न्यू साउथ वेल्स परगण्याचे मुख्यालय होय. ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनाऱ्यावरील बॉटनी बे व पोर्ट जॅक्सन यांचा १७७० मध्ये कॅप्टन जेम्स कूक याने शोध लावला. त्यानंतर येथील मूळ वसाहत १७८८ मध्ये ब्रिटिश साम्राज्यातील शिक्षा झालेल्या हद्दपारीतील कैद्यांसाठी स्थापन झाली पण अल्पावधीतच तिचे व्यापारी दृष्ट्या महत्त्व वाढले. शहराचा विस्तार पूर्व-पश्चिम पॅसिफिक महासागर ते ब्ल्यू मौंटन्स व दक्षिणोत्तर बॉटनी बे ते लेक मॅक्वेरी असा असून मुख्य वस्ती बंदराच्या तिन्ही बाजूंस असलेल्या टेकड्यांच्या उतारावर आहे. शहराच्या मध्यवर्ती क्षेत्राचे प्रशासन सिडनी मंडळाद्वारे चालते. मध्यवर्ती शहर, उपनगरे आणि सभोवतीच्या वसाहती मिळून सिडनी स्टॅटिस्टिकल डिव्हिजन (बृहद् सिडनी) होते व त्यातील उपनगरांच्या नगरपालिकांद्वारे नागरी व्यवस्था केली जाते.
सिडनीचे हवामान आल्हाददायक समशीतोष्ण असून सरासरी १२० सेंमी. पाऊस पडतो पण त्याच्या अनियमिततेमुळे अनेकदा कोरडा दुष्काळ पडतो. त्यासाठी पाणलोट क्षेत्रातील पाणी आसमंतातील प्रॉस्पेक्ट (१८८८), कॅटरॅक्ट (१९०७), कॉरडेक्स (१९२६), एव्हॉन (१९२७), निपीअन (१९३५) इ. जलाशयांत व धरणांत पद्धतशीररीत्या अडवून शहराला पाणीपुरवठा केला जातो.
शहरात तेल शुद्धीकरण, जहाजबांधणी, लोकर उद्योग हे प्रमुख उद्योगधंदे असून अन्नप्रक्रिया, विद्युत् व इलेक्ट्रॉनीय वस्तू, कत्तलखाने, रेल्वे एंजिने व रुळ निर्मिती वगैरे अन्य व्यवसाय चालतात. येथून गहू, लोकर, मांस या पदार्थांची निर्यात होते. विसाव्या शतकात कारखान्यांतील कामगारवर्गाची संख्या घटली असून, कंपन्यांतून नोकरी करण्याकडे शिक्षितांचा ओढा अधिक आहे.
वसाहतकाळातील रोमन कॅथलिक कॅथीड्रल (१८६८) आणि अँग्लिकन कॅथीड्रल (१८८८) ही दोन प्रमुख चर्चे असून, स्टेट पार्लमेंट हाउस (१८११–१७) व गव्हर्नमेंट हाउस (१८३७–४५) या वास्तू वसाहतकालीन वास्तुशैलीचे नमुने होत. याशिवाय राष्ट्रीय कलावीथी (१८७१) व नगर सभागृह (१८८९) या भव्य वास्तू होत. येथील उत्तरेकडील उपनगरांना जोडणारा पोलादी कमानीवरील सिडनी हार्बर ब्रिज (१९३२) वैशिष्ट्यपूर्ण आहे, तर तरोंगा प्राणिसंग्रहालयात जगातील सर्व खंडांतील प्राण्यांचे नमुने पाहावयास मिळतात.
सिडनी हे जलक्रीडा आणि मनोरंजनाची साधने, तत्संबंधीच्या सोयी, सुविधा व संधी यांकरिता प्रसिद्घ आहे. बाँडी पुळणी व अन्य अनेक पुळण्यांत जलक्रीडा चालते. शिवाय येथील सांस्कृतिक जीवन समृद्घ आहे. जगप्रसिद्घ व ख्यातनाम सिडनी ऑपेरा हाउसची नोंद युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांत केली आहे (२००७). तिथे नृत्य, नाट्य, संगीत आदी कलांच्या निर्वर्तनाबरोबरच अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होतात, तसेच येथे सिंफनी ऑर्केस्ट्रॉ, ऑपेरा ऑस्ट्रेलिया आणि नृत्य व चित्रपट निर्मितीच्या अनेक संस्था आहेत. येथील ऑस्ट्रेलियन म्यूझियम (निसर्ग विज्ञाने), मत्स्यालय, वनस्पतिउद्यान आणि कलासंग्रहालय व कलावीथी प्रसिद्घ असून शिवाय तीन राष्ट्रीय उद्याने आहेत. उन्हाळी (समर) ऑलिंपिक क्रीडांसाठी (२०००) सिडनी ऑलिंपिक पार्क बांधण्यात आला. डार्लिंग हार्बर हा येथील खास करमणूक व मनोरंजन यांकरिता पुनर्विकसित केलेला भाग आहे.
सिडनीमध्ये दोन बंदरे व किंग्जफोर्ड स्मिथ हा प्रमुख विमानतळ असून, त्यांद्वारे प्रवाशांची वाहतूक होते, तसेच मालाची आयात-निर्यात होते. देशांतर्गत रेल्वे व रस्त्यांनी वाहतूक होते. उपनगरांचा विस्तार, वाहनांची वाढ (प्रत्येक दोन व्यक्ती मागे एक मोटार) व महामार्गांचा अभाव यांमुळे वाहनांच्या रहदारीस अटकाव होतो. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने फेरी बोट, भूमिगत रेल्वे, मोनोरेल वगैरेंची व्यवस्था केली आहे. शिवाय बस वाहतुकीत मोठ्या प्रमाणांवर गाड्या वाढविल्या आहेत. अलीकडे सिडनी बंदराखालून बोगदाही काढला आहे तथापि वाहतुकीत अल्प प्रमाणातच सुधारणा झाल्या आहेत.
निगडे, रेखा