सिनो, एडमंड वेर : (५ फेबुवारी १८८८— ६ जानेवारी १९६८). अमेरिकन वनस्पतिविज्ञ. सर्व सजीवांत आढळणाऱ्या जीवद्रव्याच्या आयोजन सामर्थ्यामुळे त्यातील जनुके व तत्सम प्राकल घटक क्रियाशील बनतात आणि त्याचा दृश्य परिणाम म्हणजेच सजीवाची निर्मिती व त्याची होणारी शरीराकृती यासंबंधीच्या समस्या सोडविण्याकरिता सिनो यांनी बरेच संशोधन केले आहे. त्यांचा जन्म केंब्रिज (मॅसॅचूसेट्स, अ. सं. सं.) येथे झाला व शिक्षण ब्रिजवॉटर येथील सार्वजनिक शाळांत झाले. ते हार्व्हर्ड विद्यापीठातून १९०८ मध्ये बी. ए., १९१० मध्ये एम्. ए. व १९२३ मध्ये पीएच्. डी. झाले. त्यांना प्रथम १९१५ मध्ये त्या वेळच्या कनेक्टिकट कृषी महाविद्यालयात (आता कनेक्टिकट विद्यापीठ) वनस्पतिविज्ञान व आनुवंशिकी या विषयांचे प्राध्यापक आणि नंतर १९२८ मध्ये कोलंबिया विद्यापीठाच्या बर्नार्ड महाविद्यालयात वनस्पति-विज्ञानाचे प्राध्यापक म्हणून नेमण्यात आले. ते १९४० मध्ये येल विद्यापीठात स्टर्लिंग प्राध्यापक, १९४५ मध्ये तेथेच शेफील्ड सायंटिफिक स्कूलचे संचालक व १९६० मध्ये ग्रॅज्युएट स्कूलचे डीन झाले १९६६ मध्ये ते विद्यापीठीय कार्यातून निवृत्त झाले.

एडमंड वेर सिनो

एक आकार वैज्ञानिक म्हणून सिनो यांनी वनस्पतींच्या शरीराकृतीच्या संशोधनास सुरुवात केली. त्यांनी दक्षिण गोलार्धातील पोडोकार्पिनी या शंकुमंत लहान गटातील अनेक वनस्पतींच्या जीवनवृत्तांतासंबंधी संशोधन आणि वर्गीकरणातील त्यांचे स्थान निश्चित केले. याच्या आधारे वाहिनीवंत वनस्पतींतील तुलनात्मक शरीरविषयक बरीच माहिती त्यांनी उपलब्ध केली. उच्च दर्जाच्या वनस्पतींत खोडाच्या पेऱ्यांतील संरचना (विशेषतः वाहक वृंदांतील विवरांची संख्या) क्रमविकासात फार मंदगतीने बदलत आलेली असून वनस्पतींतील परस्परसंबंध समजून घेण्यास ती फार महत्त्वाची असल्याचा त्यांनी शोध लावला. तसेच आय्. डब्ल्यू. बेले यांच्या साहाय्याने त्यांनी असेही सिद्घ केले की, समशीतोष्ण हवामानाला अनुसरुन तेथील अल्पवर्धन कालाशी जमवून घेण्यास प्रारंभिक बीजी व काष्ठमय वृक्ष किंवा क्षुपे यापासून ओषधीय वनस्पतींचा क्रमविकास झाला असावा. कुकर्बिटेसी कुलातील कित्येकांच्या फळांचे आकार अभ्यासून त्यांचे अनुहरण मेंडेलियन पद्घतीने जनुकांच्या साहाय्याने होते हे सिद्घ केले त्यावेळी वनस्पतींच्या अवयवांच्या आकारासंबंधीचे जननिक विश्लेषण त्यांनीच सर्वांत अधिक केले होते. ए. एफ्. ब्लॅकेस्ली यांच्यासमवेत धोतऱ्याच्या फुलांच्या देठातील संरचनेवर विशिष्ट रंगसूत्रांचा कसा प्रभाव पडतो, यावरही त्यांनी संशोधन केले. सूक्ष्मशारीर, आनुवंशिकी व आकारजनन यांतील विचारांचा मेळ घालण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले.

सिनो यांची १९३६ मध्ये नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसवर निवड झाली. त्यांनी पुढील ग्रंथांचे लेखन केले : बॉटनी, प्रिन्सिपल्स अँड प्रॉब्लेम्स (१९२३) प्रिन्सिपल्स ऑफ जेनेटिक्स (१९२५) सेल अँड सायके (१९५०) प्लँट मॉर्फोजेनेसिस (१९६०) इत्यादी. यांशिवाय त्यांनी विविध ज्ञानपत्रिकांमधून नव्वदपेक्षा जास्त शोधनिबंध लिहिले.

सिनो यांचे न्यू हेवन (कनेक्टिकट, अ. सं. सं.) येथे निधन झाले.

परांडेकर, शं. आ.; कुलकर्णी, स. वि.