सिद्घटेक : महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील ⇨ अष्टविनायकांतील एक प्रसिद्घ स्वयंभू स्थान. ते श्रीगोंदे तालुक्यात भीमा नदीकाठी दौंडच्या उत्तरेस सु. १९ किमी. वर वसले आहे. पुणे-सोलापूर रेल्वेमार्गावरील बोरीवेल स्टेशनपासून ते सु. ११ किमी. वर आहे. चौंडी हे अहिल्यादेवी होळकरांचे जन्मस्थान या गावाजवळच आहे. लोकसंख्या १,६१९ (२०११). या गावाच्या नावाविषयी एक पौराणिक कथा प्रचलित आहे. मधू आणि कैटभ या दोन दैत्यांनी ब्रह्मदेवाच्या सृष्टिरचनेत व्यत्यय आणला. तेव्हा ब्रह्माने दैत्यांच्या नाशार्थ विष्णूकडे धाव घेतली. त्याने अनेक युद्घे करुनसुद्घा ते नष्ट झाले नाहीत, म्हणून विष्णूने शंकराची याचना केली. त्याने हे काम विनायक करेल असे म्हणून त्याला प्रसन्न करुन घेण्यासाठी षड्क्षरी मंत्र दिला. त्या मंत्राचे अनुष्ठान विष्णूने एका टेकडीवर केले. विनायक प्रसन्न झाला आणि दैत्यांचा संहार झाला. तेव्हा विष्णूने तिथे गंडकी शिळेची गजाननाची मूर्ती स्थापन केली. विष्णूला त्या टेकडीवर सिद्घी मिळाली म्हणून या क्षेत्राला ‘सिद्धक्षेत्र’ किंवा ‘सिद्धटेक’ व विनायकाला ‘सिद्धिविनायक’ ही नावे पडली. शिवाय देऊळवाडी या नावानेही ते प्रसिद्घ आहे.
येथील मंदिर उत्तराभिमुख असून वेशीपासून मंदिरापर्यंत हरिपंत फडके (१७२९— ७४) यांनी बांधलेला फरसबंदी मार्ग आहे. त्यांचा मंदिराजवळ वाडा आहे. खर्ड्याच्या लढाईनंतर त्यांचे देहावसान येथेच झाले. मंदिराचा चौरस गाभारा (४·५० मी. उंच व ९ चौ. मी.) अहिल्याबाई होळकरांनी (कार. १७६६— ९५) बांधला. गाभाऱ्यात शेजघर आहे. बाजूस शिवपंचायतन आहे. बाहेरच्या बाजूस सभामंडप असून महाद्वार व त्यावर नगारखाना आहे. तेथे त्रिकाळ चौघडा वाजतो. जवळच मारुती मंदिर व पश्चिमेस शिवाईदेवी व शंकर यांची छोटी मंदिरे आहेत. शिवाय नदीजवळ काळभैरवाचे देवस्थान आहे.
सिद्घिविनायकाची स्वयंभू पाषाणमूर्ती ९६ सेंमी. उंच व ७५ सेंमी. रुंद असून सोंड उजवीकडे झुकली आहे. गजानन ललित आसनात बसला असून त्याच्या मांडीवर ऋद्घि-सिद्घी बसल्या आहेत. सिद्घिविनायकाच्या भोवतीचे मखर पितळी असून उजव्या-डाव्या बाजूंस जय-विजयांच्या भव्य मूर्ती आहेत. सिंहासन दगडी आहे. देवस्थानची वहिवाट चिंचवडकर देव जहागीरदार हे पाहतात. चिंचवड संस्थानातून दरवर्षी सु. २,००० रु. खर्च करण्यात येत असे. न. वि. ऊर्फ काकासाहेब गाडगीळ यांनी आपल्या मातुःश्रींच्या स्मरणार्थ येथे एक धर्मशाळा बांधली आहे. भाद्रपद शुद्घ १ ते ५ व माघ शुद्घ १ ते ५ या तिथ्यांना वर्षातून दोन मुख्य उत्सव साजरे केले जातात. हे कडक दैवत मानले जाते. श्री मोरया गोसावी यांनी प्रथम येथेच उग्र तपश्चर्या केली होती व नंतर ते मोरगावी गेले. केडगावच्या नारायण महाराजांनीही सिद्घिविनायकाची सेवा केली.
संदर्भ : १. गोवंडे, श्रीकांत, श्री अष्टविनायक यात्रा, पुणे, २००१.
२. वेंगुर्लेकर, संजय नारायण, गणेश दर्शन, दोन खंड, मुंबई, १९९९.
सोसे, आतिश सुरेश
“