सिज्विक, नेव्हिल व्हिन्सेंट : (८ मे १८७३– १५ मार्च १९५२). ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ. विशेषतः जटिल संयुगांमधील सहसंबद्घ बंध समजून घेण्याच्या दृष्टीने त्यांनी महत्त्वाचे कार्य केले.

सिज्विक यांचा जन्म इंग्लंडमधील ऑक्सफर्ड येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण घरीच आई सारा इझबेल टॉम्पसन यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. ते वयाच्या तेराव्या वर्षी रग्बी स्कूलमध्ये दाखल झाले. त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठाची रसायनशास्त्रातील पदवी (१८९५) व साहित्यातील पदवी (१८९७) प्रथम श्रेणीत मिळविल्या. सिज्विक यांनी ओस्टवाल्ड लॅबोरेटरी, लाइपसिक (जर्मनी) येथे जॉर्ज ब्रेडिक यांच्या मार्गदर्शनाखाली भौतिकीय रसायनशास्त्राचा व ट्युबिंगेन येथे हान्स फोन पचमन यांच्यासमवेत कार्बनी रसायनशास्त्राचा अभ्यास केला (१८९७–१९००). साज्विक यांनी १९०१ मध्ये ट्युबिंगेन विद्यापीठाची पीएच्.डी. पदवी संपादन केली.

साज्विक यांची १९०० मध्ये लिंकन कॉलेज (ऑक्सफर्ड) येथे फेलो म्हणून निवड झाली आणि तेथेच त्यांनी कार्बनी संयुगांवर संशोधन करण्यास प्रारंभ केला. १९१० मध्ये त्यांनी ऑर्‌गॅनिक केमिस्ट्री ऑफ नायट्रोजन हा शोधनिबंध प्रसिद्घ केला. ब्रिटिश ॲसोसिएशनच्या बैठकीसाठी ऑस्ट्रेलियाला जात असताना त्यांची ⇨ अर्नेस्ट रदरफर्ड यांच्याशी भेट झाली (१९१४). रदरफर्ड यांच्याशी झालेल्या विचारविनिमयातून त्यांना आणवीय संरचनेचा उपयोग करुन रासायनिक विक्रियांचे विश्लेषण करण्यासाठीचे संशोधन करण्याचे प्रोत्साहन मिळाले. या संशोधनातूनच त्यांनी सहसंबद्घ संयुजेची इलेक्ट्रॉनीय उपपत्ती मांडली (१९२७). या उपपत्तीमुळे गिल्बर्ट न्यूटन ल्यूइस आणि अर्विंग लाँगम्यूर यांनी अकार्बनी संयुगांसाठी मांडलेल्या संयुजा विषयीच्या संकल्पना विकसित होण्यास मदत झाली [ ⟶ संयुजा]. तसेच बोर-रदरफर्ड यांच्या अणूच्या अणुकेंद्रीय संरचनेची प्रतिकृती विशद करणे शक्य झाले.

सिज्विक यांनी १९२० पर्यंत १८ शोधनिबंध प्रकाशित केले. त्यांपैकी बहुतेक शोधनिबंध कार्बनी विक्रियांचे गतिविज्ञान, रासायनिक विक्रिया व विद्राव्यता (विरघळण्याची क्षमता) यांमधील संबंध इ. विषयांशी निगडित होते. १९२२ मध्ये त्यांची रॉयल सोसायटीचे फेलो म्हणून निवड झाली. त्यांनी १९२७ मध्ये भौतिकीसाठी लिहिलेल्या एका पुस्तकात सहसंबद्घ बंधाची (एका अणूधील किंवा मूलकामधील इलेक्ट्रॉनांची जोडी दुसऱ्या अणूत किंवा मूलकात विशिष्ट परिस्थितीत विभागून तयार होणाऱ्या बंधाची) संकल्पना मांडली आणि जटिल संयुगांधील बंधकांची जोडणी सहसंबद्घ बंधाने होते, असे प्रतिपादन केले. त्यांनी पुढील ग्रंथांचे लेखन केले : सम फिजिकल प्रॉपर्टीज् ऑफ द कोव्हॅलंट लिंक इन केमिस्ट्री (१९३३) आणि केमिकल एलेमेंट्स अँड देअर कम्पाऊंड्स (दोन खंड, १९५०).

साज्विक यांचे ऑक्सफर्ड (इंग्लंड) येथे निधन झाले.

दीक्षित, रा. ज्ञा.