सिंगारेनी : सिंगरेनी सिंगरेणी. आंध्र प्रदेशातील एक प्रसिद्घ कोळसा क्षेत्र समाविष्ट खेडे. लोकसंख्या ४२,४१७ (२००१). ते खम्मम जिल्ह्यात येल्लंडू तालुक्यात येल्लंडू शहराच्या दक्षिणेस १६ किमी.वर वसले आहे. हा प्रदेश पूर्वी हैदराबाद (दक्षिण) या भूतपूर्व संस्थानच्या अखत्यारीत होता आणि तत्कालीन निजामाने या प्रदेशातील कोळसा, सोने व अभ्रक या खनिजांच्या उत्खननासाठी हैदराबाद कंपनी स्थापन केली (१८८६). या कंपनीने १८८९ मध्ये प्रथम कोळशाचा शोध लावला. त्याच कंपनीचा कार्यभार सिंगारेनी कॉल्यरीज कंपनी लिमिटेड या नव्याने स्थापन (१९२०) झालेल्या सार्वजनिक कंपनीने हाती घेतला. तिच्या कार्यक्षेत्रात प्रत्यक्ष कार्यरत असलेले व समन्वेषणयुक्त असे सिंगारेनी, येल्लंडू आणि कोठागुडम् येथील कोळसा क्षेत्र नियंत्रणाखाली आले. कंपनीचे सुरुवातीचे अधिकृत भाग भांडवल नऊ कोटी रु. आणि काही धनिकांनी विकत घेतलेले ५·५८ कोटी रुपये शेअर असे होते. स्वातंत्र्योत्तर काळात आंध्र प्रदेश शासन व केंद्र शासन यांनी अनुक्रमे ५९·०७ टक्के व ४०·११ टक्के एवढी भाग भांडवल गुंतवणूक केली. उर्वरित अत्यल्प भागधारक खासगी व्यक्ती आहेत. तंदूर आणि कनाल क्षेत्र, उत्तर व दक्षिण गोदावरी (रामगुंडम्), कोठागुडम् व सिंगारेनी येथील कोळसा क्षेत्र या कंपनीद्वारे विकसित करण्यात आले असून १९६७-६८ मध्ये या कंपनीत सु. ३२,००० कर्मचारी होते. कंपनीचे स्वतःचे विद्युत्शक्ती उत्पादन केंद्र कोठागुडम् येथे असून त्याद्वारे विद्युत् पुरवठा कोठागुडम् आणि येल्लंडू येथील कोळसा खाणींना होतो. या दोन्ही शहरांतील प्रत्येकी पाच कोळसा खाणी ही कंपनी पाहते. कोठागुडम् येथे कंपनीची प्रशासकीय कार्यालये असून येल्लंडू येथे कंपनीचे मूळ कार्यालय आहे. कंपनी दोन द्वैमासिके अनुक्रमे इंग्रजी सिंगारेनी न्यूज (स्था. १९५७) व तेलुगू सिंगारेनी वार्तालू काढते. कंपनीचे हॉस्पिटल (स्था. १९४८) कोठागुडम् येथे असून कंपनीद्वारे खाणकाम प्रशिक्षण विद्यालयही चालविण्यात येते.
सिंगारेनी कॉल्यरीज कंपनी लिमिटेड या कंपनीने २००६-०७ दरम्यान ३७·७१ द.ल. टन कोळसा उत्पादित केला. कोल इंडिया लिमिटेडच्या एकूण ४८७ खाण प्रकल्पांपैकी सिंगारेनी कॉल्यरीज कंपनी लिमिटेडकडे ९६ खनिज प्रकल्प सुपूर्त केले होते. त्यांपैकी ५४ प्रकल्प कंपनीने २००६ पर्यंत पूर्ण केले. खाणकामातील आधुनिक तंत्र, चढाओढ आणि सातत्य यांमुळे कोळशाची उपलब्धता ७०–८० टक्के झाली आहे. यांत सिंगारेनी कॉल्यरीज कंपनी आघाडीवर आहे. कोळशाच्या खाणींचे राष्ट्रीयीकरण झाल्यानंतर (१९७३) पुढे १९९३ मध्ये त्या कायद्यात दुरुस्त्या सुचविल्या गेल्या. त्यानुसार खाण कामगारांसाठी अनेक कल्याणकारी योजना कार्यान्वित झाल्या. त्यांत प्रामुख्याने पिण्याचे पाणी, औषधोपचार, शिक्षण, घरे आदींचा अंतर्भाव करण्यात आला आहे.
कुंभारगावकर, य. रा.