सिॲटल : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी वॉशिंग्टन राज्यातील सर्वांत मोठे शहर व औद्योगिक महानगर. लोकसंख्या ६,२०,७७८ (२०१०). अलास्का व अतिपूर्वेकडील देशांकडून पॅसिफिक महासागर मार्गे होणाऱ्या जलवाहतूक मार्गाचे हे प्रवेशद्वार मानले जाते. प्यूजित साउंडचा पूर्व किनारा आणि वॉशिंग्टन सरोवर यांदरम्यान हे शहर सात टेकड्यांवर विस्तारलेले आहे. इलिनॉयमधील काही गोऱ्या वसाहतकऱ्यांनी येथील नैसर्गिक उत्तुंग वास्तूंचे एक दृश्य, सिॲटल.संपत्तीच्या–विशेषतः लाकडाच्या – उद्योगासाठी पहिली यूरोपीय वसाहत अल्की पॉइंट भागात स्थापन केली (१८५१). नंतर त्यांनी १८५३ मध्ये एलीट उपसागराच्या पूर्व किनाऱ्यालगत वसाहत स्थलांतरित केली. तेथे डुवामिश इंडियन जमातीचा प्रमुख सिल्थ याने त्यांच्याशी स्नेहपूर्ण संबंध प्रस्थापित करुन लाकूड उद्योगाच्या विकासात गोऱ्या वसाहतकऱ्यांना सहकार्य केले म्हणून या वसाहतीला सिॲटल हे नाव दिले. येथे सुरुवातीस गलबतांना आवश्यक ते लाकूड कापणे-विकणे असा व्यवसाय चाले. १८९३ मध्ये ग्रेट नॉर्दर्न लोहमार्गावरील हे अंतिम स्थानक बनल्यामुळे शहराचा झपाट्याने विकास झाला. येथून अलास्काशी सोन्याचा व्यापार वाढला आणि अतिपूर्वेकडील देशांशी संपर्क साधण्याच्या द्दष्टीने हे महत्त्वाचे बंदर झाले. कृत्रिम जलमार्ग तयार करण्यासाठी सभोवतालच्या काही टेकड्यांचे सपाटीकरण करण्यात आले व बंदराची क्षमता वाढविण्यात आली. १९०५ ते १९१० दरम्यान सभोवतालच्या परिसरातील दहा लहान-मोठी शहरे त्यात विलीन करण्यात आली. पुढे पनामा कालवा (१९१४) आणि एलीट उपसागराला जोडणारा लेक वॉशिंग्टन शिप कॅनल (१९१६) पूर्ण झाल्यानंतर सिॲटलच्या औद्योगिकीकरणास चालना मिळाली. दुसऱ्या महायुद्घकाळात (१९३९–४५) येथे विमान निर्मितिउद्योग आणि बोटी बांधण्याच्या कारखान्यांना गती मिळाली. सिॲटलच्या परिसरात अन्नप्रक्रिया, मोटारी व त्यांचे सुटेभाग, इलेक्ट्रॉनिक वस्तू, औषधे, फर्निचर, विविध यंत्रसामग्री, घरगुती वापराच्या वस्तू इत्यादींचे निर्मितिउद्योग विकसित झाले आहेत. विमान बनविणारी ‘ बोईंग एअरप्लेन कंपनी ’चे मुख्यालय या ठिकाणी आहे.

‘इंडस्ट्रियल वर्कर्स ऑफ द वर्ल्ड’ संघटनेच्या पुढाकाराने येथे मोठा संप झाला होता (१९१९). येथे ‘सेंचरी २१ एक्सपोझिशन’ हे जागतिक प्रदर्शन भरले होते (१९६२). येथे जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठ ( १८६१), सिॲटल पॅसिफिक विद्यापीठ (१८९१), सिॲटल विद्यापीठ (१८९२) ही मोठी विद्यापीठे असून चार कम्युनिटी महाविद्यालये आहेत. येथील चिल्ड्रन्स हॉस्पिटल प्रसिद्घ आहे. शहरात ऑपेरा हाउस व अन्य नाट्यगृहे, विज्ञानकेंद्रे व सांस्कृतिक केंद्रे असून वुडलँड पार्क व प्राणिसंग्रहालय, पायोनिअर चौक, व्हॉलंटिअर पार्क, अल्की पॉइंट, विविध कला संग्रहालये इ. प्रेक्षणीय स्थळे आहेत. वॉशिंग्टन सरोवर शहराच्या पूर्वभागात असून मोटरबोट आणि याट ( क्रीडानौका ) यांच्या शर्यतींसाठी ते प्रसिद्घ आहे.

देशपांडे, सु. र.