सिंगर, आयझाक बाशेव्हिस : (१४ जुलै १९०४–२४ जुलै १९९१). पोलिश-अमेरिकन साहित्यिक. यिद्दिश भाषेत लेखन. जन्म पोलंडमधील राड्झिमीन येथे. तो ज्यू धर्मीय होता आणि त्याचे घराणे हेझिडिक ⇨ राब्बीं चे (ज्यू विद्वानांना, तसेच धार्मिक ग्रंथ व तत्त्वे शिकवणाऱ्यांना लावली जाणारी उपाधी ) होते. ज्यू धर्माचे शिक्षण त्याने ‘वॉर्सा राब्बिनिकल सेमिनरी ’ मध्ये घेतले तथापि राब्बी होण्यापेक्षा लेखक होणे त्याने पसंत केले. आरंभी पोलंडमध्ये विविध ठिकाणी त्याने पत्रकारी केली. १९३५ मध्ये तो अमेरिकेत आला. तेथे ज्यूइश डेली फॉरवर्ड ह्या यिद्दिश वृत्तपत्रात परराष्ट्र वार्ताहर म्हणून तो काम करु लागला. त्यात तो वार्शॉव्हस्की नावाने लेखन करीत असे.१९४३ मध्ये त्याला अमेरिकेचे नागरिकत्व प्राप्त झाले.
सिंगरचे लेखन त्याच्या इंग्रजी भाषांतरामुळे मोठ्या प्रमाणावर वाचले गेले. सिंगर मात्र यिद्दिशमध्येच लेखन करीत राहिला. आपल्या लेखनाच्या भाषांतराच्या गुणवत्तेकडे तो व्यक्तिशः लक्ष देत असे. त्याच्या कादंबऱ्या ( सर्व इं. भा.) अशा : सेटन इन गोरे (१९३५),द फॅमिली मॉस्कॅट (१९५०), द मॅजिशिअन ऑफ ल्यूबिन (१९६०), द स्लेव्ह (१९६२), द मॅनॉर (१९६७), द इस्टेट (१९६९), एनिमिज : ए लव्ह स्टोरी (१९७२), शोशा (१९७८) आणि द पेनिटंट (१९८३). त्याच्या लोकप्रिय कथासंग्रहांत ( सर्व इं. भा.) गिंपेल द फूल (१९५७), द स्पिनोझा ऑफ मार्केट स्ट्रीट (१९६१), शॉर्ट फ्रायडे (१९६७), द सॅन्स (१९६८), ए क्राउन ऑफ फेदर्स (१९७३), ओल्ड लव्ह (१९७९) आणि द इमेज अँड अदर स्टोरीज (१९८५) ह्यांचा समावेश होतो.
सिंगरच्या कथा-कांदबऱ्यांतून ज्यू समाजाच्या गतकाळाबद्दल एक प्रकारची वियोगाची भावना आहे. हिटलरच्या वंशद्वेषी धोरणातून ज्यूंना ज्या यातनाकांडाला तोंड द्यावे लागले, त्याचा आरंभ होण्यापूर्वीच्या पोलिश ज्यूंच्या समाजचित्राचे रंग त्याच्या लेखनातून जिवंत होतात आणि त्या समाजाच्या पूर्वस्मृती जागृत करतात. द मॅनॉर आणि द इस्टेट ह्या कांदबऱ्यांतून ज्यूंच्या अनेक पिढ्यांना व्यापणाऱ्या कित्येक व्यक्तिरेखा त्याने निर्माण केलेल्या आहेत. एकोणिसाव्या-विसाव्या शतकांत मोठमोठ्या ज्यू कुटुंबांतून जी परिवर्तने घडत गेली, त्यांतून त्या कुटुंबांचे जे विघटन यथावकाश घडून आले, ह्यांचे एक इतिवृत्तच वाचकांसमोर उभे राहते. द स्लेव्ह मध्ये सतराव्या शतकातील पोलंडचे चित्र दिसते. गुलामगिरीचे जिणे जगणाऱ्या एका संवेदनशील, धर्मपरायण ज्यू विद्वानाच्या नजरेतून पाशवी शक्तींच्या वृत्तिप्रवृत्तींचे दर्शन त्याने घडविले आहे. काही शतकांपूर्वीच्या पोलंडमधले हे चित्रण असले, तरी ते आधुनिक संवेदनशीलतेला भिडणारे आहे. द स्पिनोझा ऑफ मार्केट स्ट्रीटमधल्या अकरा कथांतून दुसऱ्या महायुद्घानंतरच्या काळातले पोलिश गेट्टो–पोलिश ज्यूंच्या वस्त्या – तो प्रभावीपणे शब्दचित्रांकित करतो. त्याच्या कथांतून ज्यू लोकविद्या, आख्यायिका, गूढवाद आणि मानवी स्वभावातला अंगभूत दुबळेपणा यांचे प्रभावी प्रत्यंतर येत राहते. ए डे ऑफ प्लेझर : स्टोरिज ऑफ ए बॉय गोइंग अप इन वॉर्सा ( इं. भा. १९६९) हे त्याने लहान मुलांसाठी लिहिलेले सर्वोत्तम पुस्तक. ह्या पुस्तकाला बालसा हत्यासाठी असलेला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला ( नॅशनल बुक अवॉर्ड ). त्याच्या एकूण जीवनाबद्दल त्याने इन माय फादर्स कोर्ट ( इं. भा. १९६६), लव्ह अँड एक्झाइल (१९८४) आणि मोअर स्टोरीज फ्रॉम माय फादर्स कोर्ट (२०००) ह्या आत्मचरित्रात्मक पुस्तकांत लिहिले आहे. १९७८ साली साहित्याचे नोबेल पारितोषिक त्याला देण्यात आले.
अमेरिकेच्या फ्लॉरिडा राज्यातील सर्फसाइड येथे तो निधन पावला.
संदर्भ : 1. Allentuck, Marcia, The Achievement of Isaac Bashevis Singer, Chicago, 1969.
2. Buchen, Irving H. Isaac Bashevis Singer and The Eternal Past, New York, 1968.
3. Malin,Irving, Ed. Critical Views of Isaac Bashevis Singer, New York 1969.
4. Telushkin, Dvorah, Master of Dreams, 1997.
कुलकर्णी, अ. र.