सिंग, जोगिंदर जसवंत : (१७ एप्रिल १९४५– ). भारताच्या भूदलाचे प्रमुख. त्यांचा जन्म लष्करी परंपरा असलेल्या कुटुंबात भावलपूर ( पाकिस्तान ) येथे झाला. त्यांचे वडील ले. क. जसवंत सिंग मारवाह हे लष्करात इलेक्ट्रिक अभियंता (१९४३– ७३) होते आणि दुसऱ्या महायुद्घातही ते सहभागी झाले होते. सुरुवातीचे शिक्षण जोगिंदर यांनी जन्मगावी घेऊन ‘ राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी ’ येथे लष्करी शिक्षण घेतले. त्यानंतर ते नवव्या मराठा लाइट इन्फन्ट्रीत रुजू झाले (१९६४). त्यांनी जम्मू आणि काश्मीर, नागालँड, अरुणाचल प्रदेश, उत्तरांचल प्रदेश वगैरे राज्यांमधून लष्करी सेवा केली. अरुणाचल प्रदेशातील त्यांच्या लष्करी कार्याचा उचित गौरव विशिष्ट सेवा पदक देऊन करण्यात आला आणि त्यांची कर्नलपदी पदोन्नती झाली. त्यानंतर त्यांची पाचव्या मराठा लाइट इन्फन्ट्रीच्या प्रमुखपदी (कमांडंट) हैदराबाद (दक्षिण) येथे नियुक्ती झाली. ते अगदी तरुण वयात स्टाफ कॉलेज आणि डिफेन्स कॉलेज यांमधून एक हुशार कर्तृत्वशाली विद्यार्थी म्हणून बाहेर पडले. ते पहिले संरक्षण परराष्ट्र वकील म्हणून अल्जीरियामध्ये कार्यरत होते (१९८७ – ९०). भारतात परतल्यानंतर त्यांची नियुक्ती ‘ बारमूल सेक्टर मध्ये एकोणऐंशीव्या माऊंटन ब्रिगेडचे कमांडर म्हणून झाली (१९९१-९२). यावेळी घुसखोरांच्या संघर्षात ते जखमी झाले. पुढे त्यांची उपसंचालक म्हणून संक्रियात्मक रसदशास्त्र विभागात, भूदलाच्या मुख्यालयात नेमणूक झाली (१९९३). नंतर त्यांना नवव्या पायदळ तुकडीच्या प्रमुखपदी नेमण्यात आले (१९९६–९८). पुढे त्यांच्याकडे भूदलाच्या मुख्यालयात लष्करी हालचालींच्या एकूण सर्व कारवायांची पाहणी करण्याचे काम सुपूर्त करण्यात आले व अतिरिक्त संचालक म्हणून त्यांची नियुक्ती केली. या पदावर असताना भारत-चीन सीमातंटा सोडविण्यासाठी त्यांनी बिजींगला (चीन) भेट दिली पाकिस्तान-भारत सीमेची पाहणी केली. कारगिल युद्घातील लष्कराच्या नियोजनात त्यांचा महत्त्वाचा भाग होता. तत्पूर्वी संरक्षण मंत्र्यांबरोबर त्यांनी सिएरा लिओनला जाऊन तेथील संयुक्त राष्ट्रसंघासाठी कार्यरत असलेल्या भारतीय फौजेची पाहणी केली. पश्चिम विभागाचे कमांडिंग इन चीफ ऑफिसर म्हणून त्यांची १ फेबुवारी २००४ रोजी नियुक्ती झाली. या पदाबरोबरच राष्ट्रपतींचा परिसहायक (एडीसी) हे पदही त्यांनी भूषविले. त्यांच्या बहुविध कार्यकर्तृत्वाचा व ज्येष्ठतेचा विचार करुन सिंग यांची १ फेबुवारी २००५ मध्ये भूदलाच्या प्रमुखपदी (चीफ ऑफ आर्मी स्टाफ) नियुक्ती झाली आणि ३० सप्टेंबर २००७ रोजी ते निवृत्त झाले. त्यानंतर त्यांची अरुणाचल प्रदेशाच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली (२००८).

त्यांना शौर्याबद्दलचे अनेक पुरस्कार लाभले. त्यांपैकी विशिष्ट सेवा पदक, वॉर वुंड मेडल (१९९२), परमविशिष्ट सेवा पदक (२००४) वगैरे महत्त्वाची होत.

जोगिंदर सिंग लष्करी सेवेतील एक अभ्यासू व चिकित्सक सेनाधिकारी होते. त्यांनी मर्यादा सांभाळून नियतकालिकांतून लेखन केले. त्यांचा ‘ सायनो इंडियन-बॉर्डर डिस्प्यूट ’ हा प्रबंध आणि स्ट्रॅटेजी टू बूस्ट डिफेन्स एक्स्पोर्ट हा ग्रंथ यांचे राजकीय वर्तुळात मोठे स्वागत झाले.

त्यांच्या पत्नीचे नाव अनुपमा असून त्यांना एक मुलगा व मुलगी आहे.

गायकवाड, कृ. म.