सैनिकी संघटना, भारतीय : देशाच्या शासनयंत्रणेत सैनिकी संघटना हा एक महत्त्वाचा घटक असून विद्यमान सैनिकी संघटनेला इंग्रजी अंमलातील संरक्षणव्यवस्थेची पार्श्वभूमी आहे. सतराव्या शतकापासून हळूहळू सैनिकी संघटनेत फेरबदल होऊन त्यास विद्यमान स्वरूप प्राप्त झाले आहे.

सतराव्या शतकाच्या सुरुवातीस ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी स्थापन झाली. ब्रिटिशांनी भारतात प्रवेश केल्यानंतर ⇨ सर टॉमस रो नावाचा आपला अधिकृत वकील मोगल बादशहा जहांगीर याच्या दरबारी राजदूत म्हणून पाठविला (१६१५). तत्पूर्वी विल्यम हॉकिंझ याच्या प्रयत्नाने बादशहा जहांगीर याच्याकडून कंपनीस सुरत येथे पहिली वखार स्थाप-ण्यास परवानगी मिळाली (१६१२). त्यानंतर इंग्रजांनी अहमदाबाद, पेटापोली, बऱ्हाणपूर, मच्छलीपटनम्, दाभोळ, कारवार इ. ठिकाणी व्यापारास सुरुवात केली.

 

मोगल सत्ता कमकुवत झाल्यानंतर एतद्देशीय सत्तांतील संघर्षात कंपनीने वखारीच्या संरक्षणार्थ नेमलेल्या अनेक शिपायांचे रूपांतर सैन्यात केले आणि १७६४ -१८५७ दरम्यानच्या काळात येथील राजांच्या सत्ता-संघर्षात प्रवेश करून आपली सैनिकी संघटना बळकट केली. त्यांना दुसऱ्या कर्नाटक युद्धाच्या वेळी व नंतर अशी कायमची खडी फौज ठेवणे आवश्यक वाटू लागले. अर्काटच्या वेढ्याच्या वेळी इंग्लंडमधून काही सैनिकी तुकड्या घेऊन मेजर स्ट्रिंगर लॉरेन्स हा ब्रिटिश अधिकारी आला. त्याच्याच नेतृत्वाखाली ईस्ट इंडिया कंपनीने कायमची खडी फौज उभी केली व तोच तिचा पहिला सेनापती झाला. अशा रीतीने आधुनिक भारतीय सैन्याचे जनकत्व स्ट्रिंगर लॉरेन्स या ब्रिटिश अधिकाऱ्यांकडे जाते. पुढे कंपनीने मुंबई, मद्रास (चेन्नई) व कलकत्ता (कोलकाता) या ठिकाणी वखारी व किल्ले यांच्या रक्षणाकरिता तीन स्वतंत्र सेना उभारल्या. ह्या तीन सेनांचे प्रमुख म्हणून तीन सेनापतींची नियुक्ती करण्यात आली पण सर्वांवर कमांडर इन चीफची (गव्हर्नर जनरल) हुकमत असे. पुढे सबंध हिंदुस्थान पादाक्रांत केल्यानंतर येथील सैन्यावर सरसेनापती नेमण्याची पद्धत सुरू झाली.

 

१८५७ च्या उठावानंतर भारतीय सैन्याची पुनर्घटना करण्यात आली. पूर्वीच्या मुंबई, मद्रास व कलकत्ता या सेनांखेरीज मध्यभारत आणि इतर ठिकाणी स्वतंत्र सेनाविभाग उभारण्यात आले. भारतातील सर्व सेनाविभाग ‘इंडियन आर्मी’ (भारतीय फौज) या नावाखाली एकत्रित करण्यात आले व आधुनिक एकसंध भारतीय फौजेचा जन्म झाला. प्रत्यक्ष ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या ताब्यात जशी भारतीय फौज होती, त्याच प्रकारची अनेक संस्थानिकांकडेही आपआपली संस्थानी पथके होती.

 

सुरुवातीस ⇨ फील्ड मार्शल किचेनरची भारताच्या सरसेनापती पदावर नेमणूक झाली (१९०२). किचेनरने भारतीय सैन्याचे पुनर्संघटन केले व संस्थानी सैन्यात सुधारणा घडवून आणल्या. पायदळ, घोडदळ व तोफखान्याच्या पलटणींना त्याने क्रमांक दिले. पुरवठाखात्याची पुनर्घटना केली. भारताचे सेनाविभाग पाडले.

 

पहिल्या महायुद्धात भारतीय फौजांना मध्यपूर्वेत व यूरोपात पाठविण्यात आले. दोन्ही ठिकाणी भारतीय फौजांनी आपल्या पराक्रमाने जगाचे लक्ष वेधले. फ्रान्समध्ये जर्मनीची आगेकूच रोखण्यात भारतीय फौजेचा फार मोठा भाग होता. मध्यपूर्वेतील विजय बहुतांशी भारतीय फौजांमुळेच मिळाला. युद्धातील अनुभव लक्षात घेऊन युद्धानंतर भारतीय सैन्याची पुनर्रचना करण्यात आली. पायदळ पलटणींच्या १९ रेजिमेंटस् बनविण्यात आल्या व त्यांना पंजाब, मराठा, गढवाल, राजपूत, जाट आदी नावे देण्यात आली. प्रत्येक रेजिमेंटमध्ये ५ ते ७ पलटणी ठेवण्यात आल्या. तसेच घोडदळ तुकड्यांचीही फेररचना करण्यात आली. सैन्यसामग्री पुरवठ्याचे काम कंत्राटदाराकडे असे ही पद्धत नंतर बंद करण्यात आली. पुढे अन्नपुरवठा, मोटारपथके, दारूगोळ्याची ने-आण करणे, पेट्रोल पुरवठा यांची व्यवस्था पाहण्याकरिता ‘रॉयल इंडियन आर्मी सप्लाय कोअर’ सुरू करण्यात आले. शस्त्रे, कपडे व इतर सामग्रीचा पुरवठा करण्याकरिता शस्त्रसंभार-भांडारखाते (आर्डनन्स डेपो) निर्माण करण्यात आले. सैन्यातील अभियांत्रिकी पथकांचे महत्त्व ओळखून स्वतंत्र अभियांत्रिकी पथक उभारण्यात आले. [ ⟶ सैनिकी अभियांत्रिकी].

 

पहिल्या महायुद्धात विमानांचे महत्त्व सिद्ध झाले होते. युद्धानंतर ब्रिटिश हवाई दलाच्या काही तुकड्या हिंदुस्थानात आणण्यात आल्या. सरहद्दीवरील टोळीवाल्यांशी होणाऱ्या चकमकीत त्यांची उपयुक्तता सिद्ध झाली, तेव्हा भारताचे स्वतंत्र हवाई दल असावे, असा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार दुसऱ्या महायुद्धकाळात भारतीय हवाई दलाची स्थापना करण्यात आली. [ ⟶ हवाई दल].

 

अव्वल इंग्रजी अंमलात भारताचे स्वतंत्र नौदल नव्हते. भारताच्या सागरी रक्षणाचे काम ब्रिटिश नौदल करीत असे. पुढे ब्रिटिश नौदलाचे काम फार वाढल्यामुळे भारताच्या किनाऱ्यांची रखवाली करण्याकरिता हिंदुस्थानी मरीन (इंडियन मरीन) नावाचे छोटे नौदल उभारण्यात आले पण काही महिन्यांनंतर ते बंद करण्यात आले. मात्र दुसऱ्या महायुद्धानंतर स्वतंत्र भारतीय नौदलाची उभारणी करण्यात आली. अशा रीतीने भारतीय संरक्षक दलात तीनही दले मिळून सैनिकी संघटना निर्माण झाली. १९४७ पर्यंत भारतीय संरक्षक दलांत वडिलकीचा मान भूदलालाच असे. भूदलाचाच सरसेनापती तीनही दलांचा सरसेनापती असे व त्यास कमांडर इन चीफ म्हणत.

 

भारतास स्वातंत्र्य मिळेपर्यंत भारतीय संरक्षक दले सरसेनापतीच्या नियंत्रणाखाली होती. त्यांना व्हाइसरॉयच्या आज्ञेत राहून काम करावे लागे. व्हाइसरॉयचे नियंत्रण भारतमंत्री करीत. भारतमंत्री ब्रिटिश मंत्रिमंडळाचा सदस्य असल्यामुळे भारतीय संरक्षक दले इंग्लंडमधील ब्रिटिश शासनाच्या नियंत्रणाखाली असत. ब्रिटिश शासनाच्या हुकमानुसार हिंदी सैन्य जगाच्या कोणत्याही भागात पाठविण्यात येत असे. भारतीय संरक्षक दले केवळ हिंदुस्थानाचेच रक्षण करण्याच्या कामाकरिता नव्हती, तर ब्रिटिश साम्राज्याच्या संरक्षणसामर्थ्याचाही ती एक भाग समजली जात. भारतीय फौजेमध्ये ब्रिटिश अधिकारी असत. सुमारे लाखभर ब्रिटिश सैनिक हिंदुस्थानात होते. या सर्वांचा मोबदला भारतीय तिजोरीतूनच दिला जाई.

भारताबाहेरील साम्राज्याच्या कामगिरीकरिता भारतीय संरक्षक दलाचा उपयोग करण्यात येत असे. ईजिप्त, सूदान, सोमालीलँड, पूर्व आफ्रिका, ब्रह्मदेश (म्यानमार), चीन व यूरोपांतही त्यांना पाठविण्यात येई. १९३३ पर्यंत ब्रह्मदेश हा भारताचाच एक प्रांत होता. पुढे तो वेगळा करण्यात आला परंतु भारतीय फौजेच्या काही तुकड्या ब्रह्मदेश, मलाया व हाँगकाँग येथे ठेवण्यात आल्या. ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या बदल्या भारतीय सैन्यात करण्यात येत व युद्धाचा निर्णय भारत सरकारऐवजी इंग्लंडमधील सरकार घेत असे. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी भारत सरकारने जर्मनी व जपान विरुद्ध ब्रिटिश सरकारच्या आज्ञेने युद्ध जाहीर केले आणि बंद केले.

 

भारतीय उपखंडाची फाळणी होऊन (१९४७) भारत व पाकिस्तान ही दोन स्वतंत्र राष्ट्रे निर्माण झाली. भारतीय सैन्यांत सर्व भागांतील व सर्व जातिजमातींचे सैनिक होते. म्हणून देशाच्या फाळणीबरोबर संरक्षक दलाचीही फाळणी करण्यात आली व तीनही दलांचे काही भाग (ज्यात पाकिस्तानी नागरिकांची अधिकतर भरती होती) पाकिस्तानला वाटणीत देण्यात आले. संरक्षणसंस्था व तिच्याशी निगडित सैनिकी संघटना आणि शासकीय यंत्रणा यांचे पुनर्घटन, संरक्षण मालमत्तेची विभागणी आदी कार्यांसाठी सशस्त्र सेनादल पुनर्घटना समिती स्थापण्यात आली. या समितीच्या शिफारशीनुसार भारतीय सेनेची दोन टप्प्यांत विभागणी करण्यात आली.

 

भारतीय संरक्षक दलांत ⇨ भूसेना, ⇨ नौसेना व ⇨ हवाई दल (वायुसेना) ही तीन सेनादले आहेत. या मूलभूत सैनिकी संघटना असून भारताची सर्व संरक्षणव्यवस्था त्यांच्याभोवती गुंफलेली आहे. पूर्वी या तीनही सेनादलांचा मिळून एकच सरसेनापती असे पण स्वातंत्र्यांनंतर संविधानानुसार भारताचे राष्ट्रपती हेच तीनही सेनादलांचे सरसेनापती असतात. प्रत्येक दलाचा स्वतंत्र दलप्रमुख असून त्यांना अनुक्रमे भूसेनाध्यक्ष (चीफ ऑफ दी आर्मी स्टाफ), हवाई दलप्रमुख (चीफ ऑफ दी एअर स्टाफ) व नौदलप्रमुख (चीफ ऑफ दी नेव्हल स्टाफ) अशी नावे आहेत. प्रत्यक्ष व्यवहारात मात्र संरक्षक दलाचे नियंत्रण शासनाकडे म्हणजे मंत्रिमंडळाकडे असते. भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळात संरक्षण खात्याची व्यवस्था पाहण्यासाठी एक संरक्षणमंत्री व एक राज्यमंत्री व उपमंत्री असतात. संरक्षक दलाचे दैनंदिन नियंत्रण व कारभार संरक्षणमंत्री पाहतो तथापि संरक्षणविषयक राष्ट्रीय धोरण मंत्रिमंडळ संयुक्त रीत्या ठरवीत असते म्हणून युद्ध, तह व सैन्यातील फेरबदल संपूर्ण मंत्रिमंडळच करीत असते. मात्र व्यवहारात व दैनंदिन कारभारात मंत्रिमंडळातील ३-४ मंत्र्यांची संरक्षण उपसमिती असते. दैनंदिन निर्णय संरक्षणमंत्री, थोडे अधिक महत्त्वाचे निर्णय संरक्षक उपसमिती व महत्त्वाचे आणि अंतिम निर्णय सर्व मंत्रिमंडळ म्हणजे सरकार घेते. ते घेताना तीनही सेनादलांच्या समितीचा सल्ला मंत्रिमंडळ घेते.

 

संरक्षणमंत्र्यांच्या नियंत्रणाखाली संरक्षण मंत्रालय असते. संरक्षण मंत्रालय व त्याच्या देखरेखीखाली तीनही दलांचा कारभार चालतो. या संरक्षण मंत्रालयात अनुभवी सचिव व उपसचिव नेमलेले असतात. त्यांच्याद्वारा तीनही दलांस आदेश दिले जातात.

चाफेकर, शं. गं.