सॉसेज वृक्ष : [ हिं. झाड फनुस इं. कुकंबर ट्री लॅ. किगेलिया पिनॅटा कुल-बिग्नोनिएसी ( टेटू ) ]. फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] हा मध्यम आकारमानाचा, सुंदर व जलद वाढणारा वृक्ष मूळचा आफ्रिकेच्या उष्ण भागातील ( मोझँबीक ) आहे. तो भारतात आणून उद्यानांत, रस्त्यांच्या दुतर्फा व इतरत्र लावला गेला आहे. विविध प्रकारच्या मांसांत ( गायीचे, डुकराचे, मेंढीचे इत्यादींच्या मांसांचे बारीक तुकडे करुन त्यात ) मीठ व मसाला घातल्यामुळे टिकून राहील अशा पद्घतीने ते आतड्याच्या एका स्वतंत्र व सुट्या तुकड्यात घालून बंद करतात व अशा वस्तूस ‘सॉसेज’ हे इंग्रजी नाव वापरतात. सॉसेज मोठ्या व जाड काकडीसारखी दिसते. ह्या वृक्षास त्याच्या फळाच्या मोठ्या स्वरुपावरुन ‘ सॉसेज ट्री ’ हे नाव दिले गेले. ‘मांस-कर्कटी वृक्ष’ हे मराठी नाव त्याला सुचविलेले आढळते व ते सार्थ दिसते.

सॉसेज वृक्षाच्या किगेलिया या शास्त्रीय प्रजातीत एकूण पिनॅटा, आफ्रिकानाइथिओपिका असे एकाच जातीचे तीन प्रकार असावेत अथवा तीन स्वतंत्र जाती असाव्यात, याबद्दल एकमत नाही कि. पिनॅटा ही एकच जाती ( विलिस सांतापाव व बेली यांच्या मते ) असल्याबद्दल बहुत दिसते. हा वृक्ष थंड ठिकाणी, तळ्याच्या काठाने खोल व सकस जमिनीत लवकर व चांगला वाढतो इतरत्र त्याची वाढ खुरटी असते. त्याची उंची ६–१५ मी. असते, त्याचे खोड एकंदरीने बुटके असून फांद्या वेड्यावाकड्या व पसरट असतात. साल तपकिरी व खरबरीत पाने एकाआड एक, संयुक्त व विषमदली दले ७ –९, जाड, चिवट, लंबगोल-आयत किंवा व्यस्त अंडाकृती बाजूची दले ४-५ X ९ सेंमी., देठाची, अखंड किंवा दातेरी किनारीची असून टोकाच्या दलाचा देठ बराच लांब असतो. फुले दुर्गंधीयुक्त, द्विलिंगी, मोठी, सु. ७·५ सेंमी. लांब, एकसमात्र व लालसर पिंगट असून ती तोंडाजवळ दोन ओठांप्रमाणे पसरट असतात ती रात्री उमलतात व सकाळी ९-१० च्या सुमारास गळून पडतात. फुलांचे ⇨ परागण विशेषतः पाकोळ्यांर्फत होते. फुलोरा [परिमंजिरी ⟶ पुष्पबंध] लोंबता व मार्च– जुलैमध्ये येतो. संवर्त घंटाकृती व संदले ३–५ पुष्पमुकुट काहीसा तसाच, परंतु पाच पाकळ्यांचा केसरदले ४ व दीर्घद्वयी ( दोन लहान व दोन मोठी ) ऊर्ध्वस्थ किंजपुटात दोन कप्पे व अनेक बीजके. फळे घनकवची ( जाड व कठीण सालीची ), मोठी, ३०–४५ सेंमी. लांब, न तडकणारी, काहीशी खरबरीत, टोकाशी गोलसर व ८–१२ सेंमी. व्यासाची असून सु. २ मी. लांब दोरीसारख्या फुलोऱ्याच्या दांड्यावर एकेकटी, जोडीने किंवा तीनच्या घोसात लोंबत राहतात ती मोठ्या काकडीसारखी दिसतात, त्यावरुन ‘कुकंबर ट्री ’ हे नाव पडलेले दिसते. फळातील पांढऱ्या मगजात अनेक धागे व बिया विखुरलेल्या असतात. याची इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ बिग्नोनिएसी कुलात वर्णन केल्याप्रमाणे असतात.

सॉसेज वृक्षाची लागवड बिया लावून करतात. कलमे लावूनही अभिवृद्घी करता येते. त्याकरिता जून व जाडजूड कलमे ( सु. २२ X १·२५ सेंमी.) बी-इंडॉल ॲसिटिक अम्लाच्या पाण्यातील विद्रावात १२ तास बुडवून ठेवून नंतर वापरतात. त्यामुळे मुळे चांगली फुटतात व वाढही चांगली होते. लागवड करताना १२–१५ मी. अंतरावर खड्डे करुन त्यांत ती कलमे लावतात. वर्षातून दोनदा त्याची पानगळ होते, तथापि वृक्षावर पानांचा पूर्ण अभाव क्वचितच दिसतो. झाड शक्यतो सरळ वाढून सुयोग्य आकार यावा याकरिता वारंवार छाटणी करावी लागते. या वृक्षाचे लाकूड कठीण व चांगले असले तरी त्याचे लांब तुकडे क्वचितच उपलब्ध होतात. सालीत टॅनिक अम्ल असते. सालीचा वापर संधिवात, आमांश आणि सांसर्गिक रोगांवर करतात. आफ्रिकेतील काही भागांत हा वृक्ष ( कदाचित दुसरी जाती किंवा प्रकार ) पवित्र मानला असून त्याचे फळ कापून व भाजून काही रोगांत बाहेरुन बांधतात. तसेच याची फळे जखमा, उपदंश व संधिवात यांवर वापरतात ती रेचकही असतात. सुकी फळे क्रियाशील कार्बन बनविण्यास वापरतात. ( चित्रपत्र ).

संदर्भ : 1. Bailey, L. H. The Standard Cyclopedia of Horticulture, Vol.II, New York, 1960.

2. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. V, New Delhi, 1959.

3. McCann, Charles, 100 Beautiful Trees of India, Bombay, 1959.

4. Santapaw, H. Henry, A. N. A Dictionary of The Flowering Plants in India, New Delhi, 1973.

देशपांडे, सुधाकर परांडेकर, शं. आ.

सॉसेज वृक्ष (किगेलिया पिनॅटा) : १. संयुक्त पान, २. फूल, ३. फळ.