सॉल्व्हे, अर्नेस्ट : (१६ एप्रिल १८३८–२६ मे १९२२). बेल्जियन औद्योगिक रसायनशास्त्रज्ञ. सोडा ॲश ( निर्जल सोडियम कार्बोनेट ) तयार करण्यासाठी व्यापारी दृष्ट्या उपयुक्त असलेली अमोनिया-सोडा प्रक्रिया विकसित करणारे शास्त्रज्ञ. ही प्रक्रिया काच, कागद व साबण निर्मितीमध्ये व्यापकपणे वापरली जाते. [⟶ सोडा ॲश].
सॉल्व्हे यांचा जन्म ब्रूसेल्सजवळच्या रिबेक रॉग्नॉन येथे झाला.शालान्त शिक्षण घेतल्यानंतर ते वडिलांच्या मीठ बनविण्याच्या धंद्यात सहभागी झाले. एकविसाव्या वर्षापासून (१८५९) ते ब्रूसेल्सजवळच्या वायुनिर्मितीच्या कारखान्यात काकांबरोबर काम करु लागले. तेथे असतानाच त्यांनी सोडा ॲश तयार करण्याची अमोनिया-सोडा प्रक्रिया विकसित केली (१८६१) व तिला ‘सॉल्व्हे प्रक्रिया’ असे नाव पडले.
अमोनिया-सोडा प्रक्रिया १८११ पासून माहीत होती. या प्रकियेद्वारे ब्राइन ( सोडियम क्लोराइडाचा उद्गम ) आणि चुनखडी ( कॅल्शियम कार्बोनेटाचा उद्गम ) यांपासून सोडा ॲशचे उत्पादन करण्यात येत होते. मात्र तिच्याद्वारे मोठ्या प्रमाणावरील व्यापारी उत्पादनाचे सुयोग्य व स्वस्त उपाय औद्योगिक रसायनशास्त्रज्ञांना सापडले नव्हते. वस्तुतः अशी प्रक्रिया ५० वर्षांपासून माहीत असल्याची सॉल्व्हे यांना कल्पना नव्हती. सॉल्व्हे यांनी कार्बोनेटीकारक मनोऱ्याचा शोध लावून मोठ्या प्रमाणावरील उत्पादनामधील व्यावहारिक अडचणी सोडविल्या. या मनोऱ्यात अमोनिया लवणाचा विद्राव कार्बन डाय-ऑक्साइडाबरोबर मिसळता येऊ शकतो. १८६१ मध्ये सॉल्व्हे यांनी या शोधाचे एकस्व ( पेटंट ) घेतले. त्यांनी आपले बंधू आल्फ्रेद यांच्यासह स्वतःची कंपनी स्थापन केली व कारखाना उभारला (१८६३). तेथे १८६५ मध्ये उत्पादन सुरु झाले. त्यांनी १८९० पर्यंत अनेक देशांमध्ये कंपन्या स्थापन केल्या. यूरोप व अमेरिका येथील पुष्कळ भागांत सॉल्व्हे प्रक्रिया हळूहळू वापरात आली आणि एकोणिसाव्या शतकाअखेरीस तिने लब्लां प्रकियेची जागा घेतली. [⟶ लब्लां, नीकॉला ].
सदर यशामुळे सॉल्व्हे यांना अमाप संपत्ती मिळाली. ती त्यांनी विविध लोककल्याणकारी कामांसाठी वापरली. उदा., भौतिकी, रसायनशास्त्र व समाजशास्त्र या विषयांतील वैज्ञानिक संशोधनासाठी विविध आंतरराष्ट्रीय संस्था त्यांनी स्थापन केल्या. १९११ पासून भौतिकीसंबंधीच्या सॉल्व्हे परिषदा भरविण्यात येतात. पुंजयामिकी व आणवीय संरचना यांसंबंधीचे सिद्घांत विकसित होण्यामध्ये या परिषदांचे कार्य महत्त्वाचे ठरले आहे.
सॉल्व्हे ब्रूसेल्स ( बेल्जियम ) येथे मृत्यू पावले.
कानिटकर, बा. मो.