सॉल्ट लेक सिटी : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी उटा राज्यातील एक औद्योगिक शहर, मॉर्मन धर्मपंथीयांचे प्रमुख स्थान, सांस्कृतिक केंद्र आणि उटा राज्याची राजधानी. ते ग्रेट सॉल्ट लेक सरोवराच्या किनाऱ्यापासून आग्नेयीस सु. २४ किमी., बॉसॅक पर्वताच्या पायथ्याशी, जॉर्डन नदीकाठी वसले आहे. १८६८ पर्यंत हे नगर ग्रेट सॉल्ट लेक सिटी या नावाने ओळखले जाई. लोकसंख्या १,८९,८९९ (२०११).
ब्रिगम यंग आणि त्यांच्या १४८ मॉर्मन अनुयायांनी धर्मच्छल असह्य झाल्याने ग्रेट सॉल्ट लेकजवळच्या ओसाड खोऱ्याचा २४ जुलै १८४७ रोजी आश्रय घेतला आणि तेथे वस्ती केली. ग्वादालूपे ईदाल्गोच्या तहानुसार (१८४८) उटा राज्य अमेरिकेच्या संघराज्यात समाविष्ट झाले आणि पुढे १८५६ मध्ये या नगराला त्या राज्याच्या राजधानीचा (मुख्यालय) दर्जा प्राप्त झाला. यंगने जोसेफ स्मिथ या वास्तुतज्ज्ञाच्या देखरेखीखाली नगराचा आराखडा तयार केला. अमेरिकन शासनाने उटाचा पहिला गव्हर्नर म्हणून यंगची (कार. १८४९–५७) नियुक्ती केली. यंगने या ओसाड व रुक्ष खोऱ्यात सु. ४ हेक्टर क्षेत्रात ४० मीटर रुंद काटकोनात छेदणारे रस्ते बांधून घरांची रचना केली. नगराच्या मध्यभागी स्थानिक संगमरवरी पाषाणात सहा शिखरांचे भव्य मॉर्मन प्रार्थना मंदिर बांधले. त्याच्या हुकूमशाही वृत्तीमुळे नगरात मॉर्मनांचे वर्चस्व वाढले. अन्य प्रदेशातील मॉर्मन पंथीयांनी येथे स्थलांतर केले आणि त्यास ‘न्यू जेरुसलेम’चे (सिटी ऑफ द सेंट्स) महत्त्व प्राप्त झाले. सॉल्ट लेक सिटी ही मॉर्मनांची जागतिक राजधानी मानली जाते. मॉर्मनांचा प्रभाव उटा व लगतच्या राज्यांतील लोकांच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय व सांस्कृतिक जीवनावर झालेला आढळतो. राजधानीचा दर्जा मिळाल्यानंतर अमेरिकन शासकीय अधिकारी आणि मॉर्मन यांत संघर्ष उद्भवला. त्याचा उल्लेख १८५७-५८ मधील तथाकथित उटा युद्घ असा करतात. मॉर्मन व मॉर्मनेतर यांच्यातील सामाजिक व धार्मिक संघर्ष दीर्घकाळपर्यंत राहिला. त्याचा परिणाम नगरातील लोकजीवनावर झाला. १८६० या दशकाच्या पूर्वार्धात खाणकाम उद्योगास प्रारंभ झाला आणि रेल्वेमार्गाची परिपूर्तता १८७०) झाली. यामुळे शहराचा औद्योगिक विकास झाला. मिठागरांचा आणखी एक धंदा होताच. शहराच्या परिसरातील तांबे, कोळसा, जस्त, चांदी, लोह या खनिजांच्या साठ्यांमुळे खाणकाम उद्योगाला गती मिळाली. त्याचबरोबर विसाव्या शतकात विद्युत् उपकरणे, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, संगणक, कापड, औषधे, खनिज तेल, छपाई व प्रकाशन आदी उद्योग शहरात फोफावले. येथील कृषिउत्पन्न बाजारपेठही मोठी आहे. व्यापार, वाहतूक व सेवा व्यवसायाचे हे प्रमुख प्रादेशिक केंद्र आहे. उटा विद्यापीठ (१८५०), वेस्टमिन्स्टर कॉलेज (१८७५) व सॉल्ट लेक कम्युनिटी कॉलेज (१९४८) ह्या प्रमुख शैक्षणिक संस्था येथे आहेत. तसेच वंशावळ संशोधनाचे जागतिक केंद्र येथे आहे. येथील फॅमिली सर्च सेंटर आणि फॅमिली हिस्टरी लायब्ररी या केंद्रांमध्ये सु. दोन अब्ज नावांची नोंद आहे. येथे स्त्री-पुरुषांचे व्यावसायिक बास्केटबॉल संघ आहेत. २००२ मधील ऑलिंपिक हिवाळी खेळाचे यजमानपद सॉल्ट लेक सिटीकडे होते.
धार्मिक उद्देशाने उभारलेल्या या शहरात अनेक प्रेक्षणीय वास्तू आहेत. मॉर्मन प्रार्थना मंदिराच्या परिसरात नगर सभागृह, वस्तुसंग्रहालय आणि मॉर्मन टॅबर्नॅ्कल् (१८६३–७५), सॉल्ट लेक मंदिर (१८५३–९३), सीगल स्मारक (१९१३) वगैरे वास्तू आहेत. याशिवाय येथील मधुमक्षिकागृह, लायन हाउसेस, यंग कुटुंबाचे निवासस्थान व ब्रिगम यंगचे स्मारक या वास्तू लक्षवेधक आहेत. टॅबर्नॅ्कल् (प्रार्थना मंदिर) गायनसमूहासाठी प्रसिद्घ आहे. उटा राज्याची स्टेट कॅपिटोल (राजभवन) ही इमारत ग्रॅनाइट व संगमरवर पाषाणात कॉरिंथियन शैलीत बांधली आहे (१९१६). तिथे कलावीथी, प्रशस्त सभागृह आहे. यांशिवाय हॅन्सेन कृत्रिम तारामंडळ, सिंफनी हॉल, मेणाच्या कलाकृतींचे संग्रहालय वगैरे अन्य वास्तू आहेत. येथील पर्यटन व्यवसायही मोठा आहे.
देशपांडे, सु. र.