सॉरेल, जॉर्ज : (२ नोव्हेंबर १८४७ – ३० ऑगस्ट १९२२). श्रमिक संघसत्तावादाची सैद्घांतिक व तात्त्विक भूमिका प्रतिपादन करणारा फ्रेंच तत्त्वचिंतक. त्याचा जन्म मध्यमवर्गीय कुटुंबात शेरबुर्ग (मॉश /परगणा ) येथे झाला. त्याने प्रारंभीचे शालेय शिक्षण जन्मगावी घेऊन स्थापत्य अभियांत्रिकीत प्रशिक्षण घेतले आणि शासकीय सेवेत स्थापत्य अभियंता म्हणून नोकरी केली. त्याने अल्पशा निवृत्तिवेतनावर १८९२ मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि उर्वरित जीवन पॅरिसच्या उपनगरात सामाजिक-आर्थिक प्रश्नांचा अभ्यास-चिंतन आणि लेखन यांत व्यतीत केले. त्याने १८९३ मध्ये मार्क्सवादात विशेष रस घेतला. तत्कालीन ⇨ ड्रायफस प्रकरणात (१८९४–१९०६) त्याने ड्रायफसची बाजू घेतली आणि या प्रकरणातील राजकीय पक्षांच्या स्वार्थी धोरणावर टीका केली. पुढे त्याने संविधानात्मक लोकशाहीचा पुरस्कार करणाऱ्या समाजवादी व सुधारणावादी ( रॅडिकल ) पक्षांवर दोषारोप ठेवला (१९०२) कारण त्याच्या मते समाजवादाकडे जाण्याचा तो एकमेव मार्ग होता. म्हणून त्याने क्रांतिकारक श्रमिक संघसत्तावादाची ( सिंडिकॅलिझम ) तत्त्वप्रणाली स्वीकारली. त्याच्यावर अराज्यवादी चळवळीचा प्रभाव होता. त्याने श्रमिक संघसत्तावादी चळवळीस तात्त्विक अधिष्ठान प्राप्त करुन दिले.

या चळवळीच्या पुष्ट्यर्थ त्याने ‘रिफ्लेक्शन्स ऑन व्हायलन्स’ ( इं. शी. १९०८) हा अत्यंत मौलिक ग्रंथ लिहिला आणि त्यात श्रमिक संघसत्तावादाची मूलभूत संकल्पना विशद केली. सॉरेलला तडजोडी करणारे पारंपरिक वाटाघाटीचे मार्ग आणि राजकीय सत्ता हस्तगत करण्याचे क्रांतिकारक हिंसक मार्ग हे दोन्हीही अमान्य होते. त्याच्या मते कामगारवर्ग हा उत्पादकवर्ग असून त्याचे सर्जनशील कार्य मानवी व्यक्तिमत्त्वाच्या विकासाचा श्रेष्ठ आविष्कार होय. कामगारवर्गच श्रमिक संघाच्या माध्यमातून समाजाची पुनर्रचना करु शकतो. म्हणून त्याला स्वातंत्र्य देऊन त्याच्या उत्पादनशक्तीचे संवर्धन-संरक्षण केले पाहिजे. मुक्त समाजात मुक्त काम, हा उद्देश फक्त कामगार संघटनाच विकसित करु शकतात. तात्पर्य, समाजाच्या नवनिर्मितीत श्रमिक व त्यांचे संघ यांची भूमिका परिणामकारक ठरेल. सॉरेलने भांडवलशाहीच्या उच्चाटनासाठी कामगारवर्गाच्या सार्वत्रिक व व्यापक संपाची आवश्यकता प्रतिपादन केली आहे. सामाजिक चळवळीत मिथकांची भूमिका महत्त्वाची असते, हेही तत्त्व त्याने मांडले कारण मिथक लोकांसमोर नव्या युगाचे स्वप्न रंगविते. त्यामुळे अनेक लोक चळवळीत सहभागी होतात आणि समाजात परिवर्तन घडते.

सॉरेलचा १९०९ नंतर श्रमिक संघसत्तावादी चळवळीविषयी भ्रमनिरास झाला. थोड्याशा वैचारिक चलबिचलीनंतर त्याने राजेशाही चळवळीला पाठिंबा दिला. पुढे रशियन राज्यक्रांतीनंतर (१९१७) त्याने बोल्शेव्हिकांना पाठिंबा दिला. ते मानवजातीचा उद्धार करतील, असा त्यास विश्वास वाटला. त्याने लेनिनच्या भूमिकेचे कौतुक केले. पुढे मृत्युपूर्वी काही आठवडे आधी त्याने इटलीतील बेनीतो मुसोलिनीविषयी स्तुतिपर विधाने केली. त्यामुळे मुसोलिनीची हुकूमशाही वृत्ती फोफावली.

सॉरेलने स्फुट व ग्रंथलेखन विपुल केले. त्याच्या ‘रिफ्लेक्शन्स ऑन व्हायलन्स’ या ग्रंथातील अनेक लेख पूर्वी प्रसिद्घ झाले होते. याशिवाय त्याने ‘द इलूझन्स ऑफ प्रोगेस’ ( इं. शी. १९०८) ‘द ड्रायफसर्ड रेव्हल्यूशन’ (इं. शी. १९०९) हे ग्रंथ लिहिले. शिवाय त्याने बायबल, ॲरिस्टॉटल आणि रोमन साम्राज्याचा ऱ्हास या विषयांवरही लिहिले होते. त्याचा ‘ रिफ्लेक्शन्स ऑन व्हायलन्स’ हा ग्रंथ अभिजात साहित्यकृती मानला जातो. श्रमिक संघसत्तावादाची सर्वांगीण चर्चा करणारा, मिथक आणि संघर्ष यांची सर्जनशील मांडणी करणारा तो मौलिक ग्रंथ होय.

संदर्भ : 1. Horowitz, Irving L. Radicalism and the Revolt Against Reason : The Social Theories of Georges Sorel, New York, 1961.

2. Humphrey, R. D. Georges Sorel : Prophet Without Honour, New York, 1951.

3. Meisel, James H. The Genesis of Georges Sorel, London, 1951.

देशपांडे, सु. र.