सावरकर, बाबाराव : (१३जून १८७९–१६ मार्च १९४५).महाराष्ट्रातील एक स्वातंत्र्यप्रेमी थोर क्रांतिकारक व हिंदुमहासभेचे निष्ठावान कार्यकर्ते. त्यांचा जन्म दामोदर व राधाबाई या सुशिक्षित दांपत्यापोटी भगूर (नासिक जिल्हा)या गावी सनातन वैदिक कुटुंबात झाला. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे ते ज्येष्ठ बंधू असून त्यांचे पूर्ण नाव गणेश दामोदर सावरकर होते पण ‘बाबाराव’ या नावानेच ते सुपरिचित होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण जन्मगावी झाले, तर मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण नासिक येथे झाले. आईच्या मृत्यूच्या वेळी (१८९२) ते तेरा वर्षांचे होते, तेव्हा दामोदरपंतांनी बाबांचे लग्न करण्याचे ठरविले आणि यशोदा या मुलीबरोबर ते विवाहबद्घ झाले (१८९६). वडिलांच्या मृत्यूनंतर (१८९९) घरची सर्व जबाबदारी त्यांच्यावर पडली. त्यामुळे त्यांच्या पुढील शिक्षणात खंड पडला. विनायकराव व नारायणराव या धाकट्या भावांचा त्यांनी सांभाळ केला आणि त्यांना उच्च शिक्षणही दिले. त्यांच्या देशकार्यातही त्यांनी तेवढाच सहभाग घेतला. नासिक येथे स्थापन झालेल्या ‘मित्रमेळा’ ह्या क्रांतिकारी व स्वातंत्र्यासाठी कार्यरत असलेल्या संस्थेचे ते कार्यवाह होते (१९००). सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार करणाऱ्या ‘अभिनव भारत’ या संस्थेतही त्यांनी हिरिरीने भाग घेतला. क्रांतिकारकांचे संघटन करण्यात ते कुशल होते. बाबारावांनी अबोलपणे अनेक क्रांतिकारकांशी संधान बांधून त्यांना प्रेरणा व उत्तेजन दिले. क्रांतिकारकांना स्फूर्ती देणारी कवितांची एक पुस्तिका प्रसिद्घ करून त्यांनी ब्रिटिशांविरुद्घ युद्घ पुकारले आहे, असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. ‘रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले?’ हा प्रश्न विचारणारी सुप्रसिद्घ कविता या पुस्तिकेत होती. त्यांना ८ जून १९०९ रोजी जन्मठेप व काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली. त्यांच्या नासिकमधील घराची झडती घेऊन सर्व मालमत्ता जप्त करण्यात आली. येरवड्याच्या (पुणे) तुरुंगात त्यांना ठेवण्यात आले. तिथे त्यांचा अमानुष छळ करण्यात आला. ते आजारी पडले. पुढे त्यांची रवानगी अंदमानातील तुरुंगात झाली, तिथे पुढे वि. दा. सावरकरांनाही ठेवण्यात आले होते पण दोघा बंधूंना कधीच एकत्र येऊ दिले नाही. बाबारावांच्या पत्नीने त्यांना हिंदुस्थानातील एखाद्या कारागृहात आणावे असा अर्जाद्वारे अयशस्वी प्रयत्न ९ फेब्रुवारी १९१५ रोजी केला. अखेर त्या समर्पित जीवन व्यतीत करून त्यांच्या सुटकेपूर्वीच कालवश झाल्या.

अंदमानच्या तुरुंगातून या बंधूद्वयांची १९२१ च्या मे महिन्यात सुटका झाली. बाबारावांना प्रथम विजापूरच्या तुरुंगात व नंतर साबरमती येथील तुरुंगात हलविण्यात आले. तिथे त्यांना भयंकर आजाराने पछाडल्यानंतर १९२२ च्या सप्टेंबरमध्ये त्यांची सशर्त सुटका करण्यात आली तथापि त्यांच्या गुप्तबैठका, विनायकरावांच्या कार्यास मदत इ. कार्य चालू होते. औषधोपचारासाठी बाबा बनारसला जात असत. बनारसच्या बाबारावांच्या मुक्कामात तेथील विद्यापीठातील गोळवलकर गुरुजी, भय्याजी दाणी, तात्या तेलंग वगैरे दिग्गज मंडळी भेटत असत. प्रकृती साथ देत नसतानाही त्यांची भ्रमंती चालू होती. त्यांनी महात्मा गांधींची १९३० मध्ये भेट घेऊन सुखदेव, भगतसिंग व राजगुरू या क्रांतिकारकांची फाशीची शिक्षा कमी करून घेण्यासाठी प्रयत्न करण्याविषयी विनंती केली होती. मुंबईला एंपायर चित्रपटगृहात बाँबस्फोट झाला. त्याच्याशी संबंध असल्याच्या आरोपावरून बाबारावांना अटक झाली (१० एप्रिल १९३३). या बाँबस्फोटाशी त्यांचा कसलाही संबंध नव्हता हे सिद्घ होऊनही त्यांना नासिक येथे स्थानबद्घ करण्यात आले. १८ मे १९३७ रोजी बाबांची बिनशर्त सुटका झाली पण व्याधिग्रस्त शरीरामुळे त्यांना अखेरपर्यंत वेदनांशी सामना करावा लागला. अखेर सांगली येथे कर्करोगाच्या प्रदीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले.

बाबारावांनी हिंदुराष्ट्रवाद, धर्माची आवश्यकता, शिवछत्रपतींनी आग्रा येथे जाण्याचा धोका का पत्करला, येशू ख्रिस्त हा जन्माने हिंदू होता वगैरे विषयांची चर्चा पुस्तकांद्वारे केली आहे. राष्ट्रमीमांसा व हिंदुस्थानचे राष्ट्रस्वरूप (१९३४), धर्म हवा कशाला (१९३८), हिंदुराष्ट्र पूर्वी-आता-पुढे (१९४२) हे त्यांचे काही ग्रंथ असून वीरा-रत्न मंजुषा (१९४४) या पुस्तकात त्यांनी शूर रजपूत रमणींच्या गौरवगाथा वर्णन केल्या आहेत. श्री शिवरायांची आग्ऱ्यावरील गरुडझेप (१९३९), ख्रिस्त परिचय अर्थात् ख्रिस्ताचे हिंदुत्व (१९४६) ही त्यांची पुस्तकेही प्रसिद्घ आहेत. त्यांच्या मते येशू ख्रिस्त हा जन्माने हिंदू होता. त्यांनी शिवाजींच्या आग्राभेटीची केलेली मीमांसा तत्कालीन ऐतिहासिक भेटीचा अन्वयार्थ विशद करणारी आहे. याशिवाय भाई परमानंदकृत वीर वैरागी या ग्रंथाचा त्यांनी मराठीत अनुवाद केला (१९२४).

‘राष्ट्राय स्वाहा राष्ट्राय इदं मम ’ असे समिधेसमान जीवन जगणाऱ्या बाबारावांचे बरेचसे आयुष्य कारावासात गेले. तसेच व्याधींनी ते जर्जर झाले होते. व्याधिग्रस्त शरीर असतानाही तिकडे दुर्लक्ष करून त्यांनी हिंदुराष्ट्र आणि स्वातंत्र्याचा सतत ध्यास घेतला. अखेरपर्यंत ‘स्वातंत्र्यलक्ष्मी की जय’ आणि ‘हिंदुस्थान हिंदूंचा’ या दोन रणघोषणा देश-बांधवांना देऊन स्वदेशाची सेवा केली. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी या ज्येष्ठ बंधूंबद्दल म्हटले आहे की, ‘माझ्या सर्वच सार्वजनिक कार्याचा अर्ध्याहून अधिक भार माझे ज्येष्ठ बंधू बाबाराव सावरकर यांचेवरच पडत असे. नाव नि श्रेय तेवढे माझ्या वाट्यास येई. कष्ट तेवढे त्यांच्या वाट्याला जात ’. या मूल्यमापनावरून बाबारावांच्या कार्याची महती लक्षात येते.

संदर्भ : १. गोखले, द. न. क्रांतिवीर बाबाराव सावरकर, पुणे, १९७९.

२. फडके, य. दि. शोध सावरकरांचा, पुणे, १९८४.

पोळ, मनीषा