साराभाई, मृणालिनी : (११मे १९२८– ). प्रख्यात भारतीय नर्तकी. भरतनाट्यम् नृत्यशैलीसाठी विशेष प्रसिद्घ. त्यांचा जन्म एका उच्च, सधन व सुशिक्षित ब्राह्मण घराण्यात मद्रास (चेन्नई) येथे झाला.⇨ विक्रम साराभाई यांच्या त्या पत्नी होत. मृणालिनी यांनी वयाच्या पाचव्या वर्षापासूनच भरतनाट्यम् शिकायला सुरुवात केली. नृत्यगुरू मुत्तुकुमार पिळ्ळै यांनी त्यांना नृत्याचे सुरुवातीचे धडे दिले. पुढे त्या उच्च शिक्षणासाठी स्वित्झर्लंडला गेल्या. तेथे त्यांनी रशियन बॅले व ग्रीक नृत्ये यांचे अध्ययन केले. भारतात परतल्यानंतर त्यांनी शांतिनिकेतनमध्ये राहून तीन वर्षे नृत्यशिक्षण घेतले. नंतर त्यांनी रवींद्रनाथ टागोर ह्यांच्या पथकाबरोबर सर्व भारतभर नृत्यजागृती व नृत्यप्रसार करण्यासाठी दौरे केले. त्या पथकाने सादर केलेल्या नाटकांतून व नृत्यनाट्यांतून त्या प्रमुख नायिकेच्या भूमिका करीत असत. ह्याच सुमारास जावा येथे जावानीज नृत्यांचेही अध्ययन त्यांनी केले. तेथे राजकुमार टेडजोकोसोएमो हे त्यांचे नृत्यगुरू होते. त्यानंतर बंगलोरमध्ये त्या राम गोपाल ह्यांच्या नृत्यपथकात सामील झाल्या व राम गोपाल ह्यांच्या समवेत प्रमुख सहनर्तकी म्हणून भारतभर व यूरोपमध्ये त्यांनी दौरे केले. बंगलोर येथे असतानाच त्यांनी एल्लप्पा पिळ्ळै, चोकलिंगम् पिळ्ळै व मीनाक्षीसुंदरम् पिळ्ळै ह्या नृत्यगुरूंकडे भरतनाट्यम्चे शास्त्रशुद्घ शिक्षण घेतले. गुरू कुंचू कुरूप यांच्याकडे त्यांनी कथकळी नृत्याचेही पद्घतशीर अध्ययन केले. भरतनाट्यम्प्रमाणेच कथकळी नृत्यातही त्यांनी असामान्य प्रभुत्व संपादन केले. कथकळी नृत्यातील नैपुण्याबद्दल ‘वीर शृंखला’ पुरस्कार मिळविणाऱ्या त्या पहिल्या स्त्री कलाकार होत. १९४८ मध्ये त्यांनी अहमदाबाद येथे ‘दर्पण ॲकॅडमी फॉर पर्फॉर्मिंग आर्ट्स’ ह्या स्वतःच्या नृत्यसंस्थेची स्थापना केली. आपल्या नृत्यपथकासह त्यांनी वारंवार यूरोप, रशिया, जपान, द. अमेरिका, प. आशिया इ. ठिकाणी दौरे केले. १९६३ मध्ये त्यांनी न्यूयॉर्क येथे द व्हीजन ऑफ वासवदत्ता हे अभिजात संस्कृत नाटकावर आधारलेले नृत्यनाट्य दिग्दर्शित केले. ह्या नृत्यनाट्यातील सर्व स्त्री-पुरुष भूमिका त्यांच्या अमेरिकन शिष्यांनी साकारल्या होत्या.
मृणालिनी ह्या गेल्या पिढीतील बुद्घिमान व सुशिक्षित अशा एकमेव नर्तकी होत. पारंपरिक शुद्घ, शास्त्रोक्त नृत्याची चौकट न मोडता त्यांनी आपल्या सर्जनशील कल्पकतेच्या साहाय्याने ह्या पारंपरिक नृत्यप्रकारांना नवीन आकर्षक व आधुनिक स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. आपल्या पारंपरिक नृत्यांच्या अध्ययनाला वेगवेगळ्या देशांतील नृत्यांच्या व्यासंगाची जोड देऊन त्यांनी आपली कला अधिकाधिक नावीन्यपूर्ण रूपात सादर केली. नर्तकी व नृत्यलेखिका (कॉरिओग्राफर) म्हणून त्यांनी उत्तुंग यश व कीर्ती संपादन केली. नृत्यनाट्ये दिग्दर्शित करताना भरतनाट्यम्, कथकळी इ. अभिजात नृत्यशैलींबरोबरच विविध लोकनृत्यशैलींचेही कल्पक व सर्जनशील कलात्मकउ पयोजन त्यांनी केले. वैयक्तिक तसेच सांघिक नृत्याविष्कारांतही त्यांचे हे वैशिष्ट्य जाणवते. किरातार्जुन, वसंतविजयम्, अभिसारिका, वासवदत्ता, गीतगोविंद, सीताकल्याणम् इ. त्यांची नृत्यनाट्ये या दृष्टीने उल्लेखनीय आहेत. त्यांच्या ‘दर्पण’ ह्या संस्थेत नृत्य, नाटक व संगीत यांचे शास्त्रोक्त व पद्घतशीर शिक्षण दिले जाते. विशेषतः भरतनाट्यम्, कथकळी आणि कूचिपूडी या अभिजात नृत्यशैलींचे प्रशिक्षण दिले जाते. आपल्या प्रदीर्घ व्यासंगाचा व अनुभवाचा लाभ त्या आपल्या शिष्यांना तेथील शिक्षणाद्वारे देतात. इंडियन डान्सिंग (१९६७), धिस अलोन इज ट्रू (१९७७), अंडरस्टँडिंग भरतनाट्यम् (१९८१), द व्हॉइस ऑफ द हार्ट : ॲनऑटोबायॉग्रफी (२००४), द एट नायिकाज इ. त्यांची पुस्तके उल्लेखनीय आहेत. त्यांना अनेक मानसन्मान लाभले : मद्रासमध्ये (चेन्नई) ‘नाट्यकला शिखामणी’ हे मानाभिधान ‘फ्रेंच आर्काईव्ह्ज इंटरनॅशनेल दी ला डान्स’ या संस्थेचे पदक व पदविका भारत सरकारतर्फे पद्मश्री (१९६५) मेक्सिकन सरकारतर्फे सुवर्णपदक (१९६८) नृत्यनैपुण्याबद्दल गुजरात राज्यशासनाचे पारितोषिक (१९६९) इत्यादी.
मृणालिनी यांना कार्तिकेय व मल्लिका ही दोन मुले असून मल्लिका या विख्यात नृत्यांगना आहेत. आझाद हिंद फौजेतील पहिल्या महिला कॅप्टन ⇨ लक्ष्मी सेहगल या मृणालिनी यांच्या ज्येष्ठ भगिनी होत.
वडगावकर, सुरेंद्र
“