सारस : करकोचा व करकरा यांच्याबरोबरच सारसाचा गुइडी या पक्षिकुलात समावेश केलेला आहे. याचे शास्त्रीय नाव ग्रुस अँटिगोन असे आहे. उत्तर व मध्य भारत, थायलंड, म्यानमार इ. प्रदेशांत हा आढळतो. मैदानी प्रदेशांत पाण्याच्या आसपास, तलाव व तळी यांच्या काठावर, दलदलीच्या जागी किंवा शेतात हा राहतो. या पक्ष्यांची जोडपी असतात कधीकधी एक-दोन पिले त्यांच्यासोबत असतात. ग्रुस या प्रजातीत दहा व इतर चार अशा एकूण १४ जाती आहेत. सायबेरियन क्रेन (ग्रुस ल्यूकोगेरॅनस) हे मध्य सायबेरियात आढळणारे पक्षी हिवाळ्यात भारतातील लडाख, अरुणाचल प्रदेशातील सांगती खोरे, भूतान, म्यानमार इ. ठिकाणी कळपाने येतात. ते वास्तव्यासाठी रुंद व प्रशस्त नद्यांची खोरी निवडतात.
सारस हा गिधाडापेक्षा मोठा असून १२०–१५२ सेंमी. उंच असतो. मान व पाय बरेच लांब डोके आणि मानेचा वरचा भाग लालभडक डोक्याचा माथा राखी मान पांढरी संपूर्ण शरीर निळसर-करड्या रंगाचे डोळे नारिंगी चोच टोकदार व हिरवट रंगाची पाय लाल व पिसेविरहित असतात. मादी नरापेक्षा लहान असते.
सारस पक्षी झाडावर बसत नाहीत. ते नेहमी जमिनीवरच भटकत असतात. झाडाझुडपांचे कोवळे धुमारे, वनस्पतिज पदार्थ, किडे, सरडे, गोगलगायी इ. यांचे भक्ष्य आहेत. या पक्ष्यांचा जोडा जन्मभर टिकतो. एकमेकांच्या सान्निध्यात राहूनच ते भक्ष्य टिपीत असतात व उडून दुसरीकडे जाताना देखील ते बरोबरच जातात.
सारस गुपचुप भक्ष्य टिपीत असतात, त्यांना कोणी त्रास दिला किंवा हुसकले, तर ते कर्ण्याच्या आवाजासारखा मोठा आवाज काढतात उडतानादेखील ते असाच आवाज करतात. उडत असताना मान पुढच्या बाजूला लांब, ताठ केलेली असते व पाय मागे लोंबत असतात. ते जमिनीपासून जास्त उंचीवरून उडू शकत नाहीत परंतु त्यांचा वेग जास्त असतो.
प्रजोत्पादनाच्या काळात या पक्ष्यांचे प्रणयनृत्य प्रेक्षणीय असते ते खाली मान वाकवून एकमेकांना अभिवादन करतात पंख अर्धवट उघडून उड्या मारतात किंवा ते पसरून ठुमकत चालतात एकमेकांभोवती फेऱ्याही घालतात. ते मोठ्याने तुतारीसारखा आवाज काढीत नाच करतात. जुलै–सप्टेंबर यांचा विणीचा हंगाम असतो. घरटे बरेच मोठे बोरू, वेत, लव्हाळी व गवत यांचे बनविलेले असते सामान्यतः ते दलदलीच्या जागेवर किंवा पाणी साठलेल्या भाताच्या खाचराच्या मध्यभागी असते. मादी फिकट हिरव्या किंवा गुलाबी-पांढऱ्या रंगाची दोन अंडी घालते कधीकधी त्यांच्यावर तपकिरी किंवा जांभळ्या रंगाचे ठिपके असतात. नर-मादी घरट्यातील अंड्यांचे अतिशय जागरूकतेने रानमांजर, मुंगूस व कुत्री यांपासून संरक्षण करीत असतात. पिलू अंड्यातून बाहेर पडल्यावर लगेचच हिंडू-फिरू लागते. ते नर-मादीच्या संरक्षणाखाली वाढते.
कर्वे, ज. नी.
क्रौंच पक्षी : हे पक्षी सारस पक्ष्यापेक्षा थोडे लहान, ९०– १०५ सेंमी. उंचीचे असतात. यांचा सर्वसाधारण रंग करडा असतो. डोक्याचा पुढील भाग काळसर अंजिरी असून बाकीचा भाग पांढऱ्या किंवा करड्या रंगाचा असतो. डोक्यावर तुऱ्यासारखी पिसे असतात. मानेच्या पुढील भागावर काळ्या रंगाची पिसे असून ती काळ्या रेघेसारखी दिसतात. छातीवरील पिसे पांढरी असतात. खांद्याशी पांढरा रंग असून उराशी दोन्ही बाजूंना काळसर रंगाचे चट्टे असतात. पंख कडांना बाहेरून काळसर व आतून करडे असून शेपटीकडे पांढरे असतात. शेपूट आखूड चोच टोकदार व चपटी असते. पाय काटकुळे, लांब व हिरवट पिवळ्या रंगाचे असून त्याची बोटे लांब असतात.
हे पक्षी चतुर, तरतरीत असून धान्य, गवताचे बी, अंकुर व किडे इ. खातात. भक्ष्य खाताना कळपातील एक दोघेजण टेहळणी करून इतरांना धोका उद्भवल्यास सावध करतात. हे पक्षी उडताना वाटोळ्या घिरट्या घालीत वरवर चढतात. ते कुर्रऽऽ-कुर्र असा आवाज काढतात. उडताना या पक्ष्याची मान इंग्रजी एस( S ) अक्षरासारखी दिसते. दूरवर उडताना थव्यातील हे पक्षी बाणाच्या फाळासारख्या– उलट्या इंग्रजी व्ही (L) अक्षरासाख्या–एकेठिकाणी मिळणाऱ्या दोन रांगा करतात. थव्याला एक प्रमुख असतो.
हे पक्षी आपले भक्ष्य संध्याकाळी किंवा सकाळी खातात. पाण्यात स्तब्ध उभे राहून भक्ष्य हेरल्यावर चोचीची अचूक झेप टाकून भक्ष्य पकडतात. विणीचा हंगाम मार्च–ऑगस्ट असतो. झाडावर काटक्यांची घरे करून मादी त्यात तीन अंडी घालते. यांचा आयुःकाल सु. ६० वर्षे असतो.
क्रौंच पक्षी हिवाळ्यात भारतीय उपखंडात येतात व उन्हाळ्यात मायदेशी परत जातात. ते दक्षिण यूरोप, उत्तर आफ्रिका, मंगोलियाचा पश्चिमेचा भाग, मध्य आशिया इ. ठिकाणी आढळतात.
कृष्णक्रौंच : (निलांग सारस). यांची मान काळी व शरीर राखाडी रंगाचे असते. हे पक्षी नेहमी रांगेत उभे राहतात म्हणून त्यांना ‘पंक्तिचर’ असे नाव आहे. राजस्थानातील विष्णोई समाजातील लोक या पक्ष्याला पवित्र मानतात व त्यांचे संरक्षण करतात.
रानडे, द. र.