सायलोटेलीझ : शरीरात वाहक घटक असून बीजे नसलेल्या वाहिनीवंत अबीजी वनस्पती विभागापैकी (टेरिडोफायटा) सर्वांत साध्या व प्रारंभिक वनस्पतींचा (वर्ग-सायलोफायटीनी विभाग-सायलोफायटा किंवा उपसंघ-सायलोप्सिडा) हा एक गण असून ⇨ सायलोफायटेलीझ हा दुसरा गण आहे. सायलोटेलीझ गणात सायलोटममेसिप्टेरिस ह्या दोन जिवंत प्रजातींचा समावेश होतो. सायलोटमाच्या दोन जाती उष्ण व उपोष्ण कटिबंधांत बऱ्याच मोठ्या प्रमाणात पसरल्या आहेत. मेसिप्टेरिसाची एकच जाती (मे. टॅनेन्सिस) ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड व पॅसिफिक महासागरातील काही लहान बेटे येथे आढळते. दोन्ही प्रजातींतील जाती बहुधा ⇨ अपिवनस्पतींप्रमाणे म्हणजे अन्य वनस्पतीचा फक्त आधार घेऊन जगतात तथापि त्या स्थलवासींप्रमाणे जमिनीत किंवा खडकांतही वाढतात. दोन्हींचे मूलहीन खोड अंशतः मूलक्षोड (जमिनीत वाढणारे जाडजूड खोड) व आ.१.सायलोटम : (१) मूलक्षोड, (२) वायवी शाखा, (३) बीजुककोश (त्रिकूट), (४) बीजुककोशाचा आडवा छेद, (५) गंतुकधारीचा आडवा छेद : (अ) रेतुकाशय, (आ) अंदुककलश.उरलेला भाग वायवी (हवेत वाढणाऱ्या) फांद्यांच्या रूपाने जमिनीवर वाढतो. दोन्ही भागांत द्विशाखाक्रम ⇨ खोड असून भूमिस्थित भागांवर मूलकल्प (मुळाचे फक्त कार्य करणारे केस) असतात शिवाय मूलक्षोडांच्या अनेक कोशिकांत (पेशींत) कवकतंतू [⟶ कवक] असतात. सायलोटमात वायवी फांद्यांवर खऱ्या पानांऐवजी लहान खवल्यांसारखी निर्गमने (आतून बाहेर वाढणारेराठ केस) असतात. मेसिप्टेरिसात सपाट, मोठी व पानासारखी, परंतु अनित्य उपांगे असतात. बीजुककोश (प्रजोत्पादक सूक्ष्म घटक निर्मिणारे व साठविणारे पिशवीसारखे घटक) प्रत्यक्ष फांद्यांवर किंवा पानांच्या तळाशी बगलेत असून त्यांच्या जोड्या वा त्रिकुटे असतात. बीजुके (प्रजोत्पादक सूक्ष्म एककोशिक घटक) एकाच प्रकारची व गंतुकधारी (प्रजोत्पादक लैंगिक घटक-कोशिका निर्माण करणारी अवस्था) हरितद्रव्यहीन व भूमिस्थित असून अंदुककलश (स्त्री-जनन कोशिका निर्मिणारे अवयव) व रेतुकाशये (पुं-जनन कोशिका निर्मिणारे अवयव) त्यात कमी-जास्त रुतलेली असतात. बीजुकधारी व आ.२. मेसिप्टेरिस : (१) बीजुककोशासह फांदी (२) पानाच्या बगलेतील बीजुककोश.गंतुकधारी ह्या दोन पिढ्यांचे एकांतरण (परस्परांची निर्मिती) असते [⟶ एकांतरण, पिढ्यांचे]. मूलक्षोडांत आदिरंभ (प्रकाष्ठाभोवती परिकाष्ठ)असून मधे ⇨ भेंड नसते परंतु भेंड वायवी फांद्यांत आढळते त्या संरचनेस नलिकारंभ ⇨ रंभ म्हणतात. गंतुकधारीचे स्वरूप काहीसे मूलक्षोडाप्रमाणे असून दोन्हीत संकवक असते.

सायलोटम फ्लोरिडा ही जाती बर्म्यूडा आणि हवाई बेटांमध्ये आढळते. खोड त्रिधारी किंवा सपाट असते. सा.ट्रायक्विट्रम ही सरळ व जमिनीवर वाढणारी जाती (किंवा अपिवनस्पती) भारतात आढळते. बीजुककोशाची त्रिकुटे पार्श्विक (बाजूस) परंतु सूक्ष्म खवल्यांच्या बगलेत असून फांद्या हिरव्या असतात. रेतुकाशय व अंदुककलश ⇨ शेवाळीप्रमाणे असून ती गंतुकधारीवर विखुरलेली आढळतात. हवाई बेटांमध्ये सा.ट्रायक्विट्रमाचा काढा मुलांचे तोंड आल्यास देतात तो रेचकही आहे. तान्ह्या मुलांना अतिसारात तिची तेलकट बीजुके देतात.

मेसिप्टेरिसाचे खोड फारच कमी विभागलेले व त्यावरची पाने खाली सापेक्षतः लहान खवल्यांसारखी परंतु वरच्या भागांवर क्रमाने मोठी व अधोगामी असून शेवटी दुभंगलेली व त्यांच्या तळाशी बगलेत बीजुककोशाची जोडी असते.

सायलोटेलीझ हा गण प्राचीन सायलोफायटेलीझपासून अवतरला असावा असे मानतात. ऱ्हास पावलेली पानांसारखी उपांगे, खऱ्या मुळांचा अभाव, खोडाचा ठळकपणा व त्यातील वाहक ऊतकांची मांडणी आणि बीजुककोशाची लक्षणे इत्यादींतील साम्यामुळे या अनुमानाला बळकटी येते.

पहा: वनस्पति, वाहिनीवंत अबीजी विभाग सायलोफायटेलीझ.

संदर्भ : 1. Eames, A. J. Morphology of Vascular Plants, Lower Groups, New York, 1936.

2. Smith, G. M. Cryptogamic Botany, Vol. II, Tokyo, 1955.

परांडेकर, शं. आ.