सायरन : उभयचर वर्गाच्या सायरनिडी कुलातील(युरोडेला गण) समाविष्ट प्राणी सायरन म्हणून ओळखले जातात. ह्या गटात जलीय ⇨ सॅलॅमँडरांच्या तीन जातींचा समावेश होतो व ते ⇨ ईल माशासारखे दिसतात. त्यांना ‘मड ईल’ या नावाने ओळखले जाते. त्यांचे शरीर लांब व सडपातळ असून सामान्यतः त्यांचा रंग तपकिरी, गर्द करडा किंवा हिरवट असतो. डोक्याजवळ जोडलेले पुढचे पाय बारीक असतात. श्रोणी व मागचे पाय नसतात. नवजात व प्रौढ प्राण्यांचे कल्ले पिसासारखे असतात. पुच्छास (शेपटीस) पुच्छपक्ष असतो.

 

सर्वसाधारणतः सायरन दलदलीच्या किंवा प्रवाहाच्या तळावरील चिखलात बिळे करतात, तसेच ते पाणवनस्पती अगर दगड यांमध्ये दडून बसतात परंतु कधीकधी अगदी अल्पकाळ शुष्क भूमीवर येण्याचे धाडस करतात. सायरन पाण्याबाहेर असताना उंदरासारखा चिंऽऽचिं आवाज किंवा कुत्र्याला वेदना होताना तो जसे विव्हळतो तसा आवाज काढतात. ते आपले अन्न रात्रीच्या वेळी मिळवितात. त्यांत कीटक व मासे यांचा समावेश होतो. त्यांचा समागम पाण्यातच होतो व पाणवनस्पतींच्या पानांवर ते एकेक किंवा गटागटाने अंडी घालतात. रूपांतरण न होताच पिलाचा विकास होऊन प्रौढ दशा प्राप्त होते. काही सायरन किमान २५ वर्षे तरी जगतात.

 

मोठा (ग्रेटर) सायरन (सायरन लॅसर्टिना) ५०–९० सेंमी. लांब असतो व अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावरील भागांत आढळतो. छोटा (लेसर) सायरन (सायरन इंटरमिडिया) १७–६० सेंमी. लांब असतो. तो द. कॅरोलिना ते टेक्सस, मिसिसिपी खोऱ्यात उत्तरेस इलिनॉय व इंडियाना राज्यांत आढळतो. लघू (ड्‌वार्फ) सायरन (स्यूडोब्रँकस स्ट्राएटस) १२–२१ सेंमी. लांब असतो. त्याच्या पाच प्रजाती फ्लॉरिडापासून दक्षिण कॅरोलिनापर्यंत आढळतात.

 

जमदाडे, ज. वि.