सायनोजेन संयुगे : कार्बन व नायट्रोजन यांच्यापासून बनलेला सायनोजेन गट (मूलक) असलेल्या कार्बनी संयुगांना सायनोजेन संयुगे म्हणतात. सायनोजेन गट(–CN) हे संयुगातील मूलकाचे इतिहासात आढळलेले पहिले उदाहरण आहे. अनेक पदार्थांच्या रासायनिक संघटनांत काही अणुगट अभेद्य असल्याप्रमाणे अस्तित्वात राहतात. अशा अणुगटाला मूलक म्हणतात. मूलक हा रासायनिक विक्रियांमध्ये एका अणूप्रमाणे भाग घेऊ शकतो. अशा प्रकारे मूलक स्थिर राहत असला, तरी त्याला स्वतंत्र अस्तित्व नसते [⟶ मूलके]. सायनोजेन (C2N2 ) व क्लोरीन(Cl2) या वायूंमध्ये, हायड्रोसायनिक (HCN) व हायड्रोक्लोरिक (HCl) या अम्लांमध्ये आणि सोडियम सायनाइड (NaCN) व सोडियम क्लोराइड ( NaCl) या लवणांमध्ये स्वाभाविक सदृश्यता आढळते. अशा प्रकारे सायनोजेन हे नमुनेदार छद्महॅलोजन आहे. औद्योगिक व लष्करी दृष्टीने उपयुक्त अशी काही सायनोजेन संयुगे पुढीलप्रमाणे आहेत: सायनोजेन वायू ( C2N2 ), सायनामाइड ( NHCNH), हायड्रोसायनिकअम्ल(HCN), सायनिक अम्ल (HCNO), सायनुरिक अम्ल{[HOC(NCOH)2N ].2H2O} वगैरे.

सायनोजेन वायू : (C2N2). प्रूसिक अम्लाचे संशोधन करीत असताना ⇨ झोझेफ ल्वी गे-ल्युसॅक यांनी सायनोजेन हे मूलक असल्याचे दाखविले. मर्क्युरिक सायनाइड तापवून त्यांनीच सायनोजेन वायू बनविला (१८१५), याला डायसायनोजेन असेही म्हणतात. अमोनियम ऑक्झॅलेटाचे किंवा ऑक्झॅमाइडाचे फॉस्फरस पेंटॉक्साइडाबरोबर निर्जलीकरण करून आणि अल्कली सायनाइडांची मोरचुदाच्या (कॉपर सल्फेटाच्या) विद्रावाबरोबर विक्रिया करूनही हा वायू मिळू शकतो. हा रंगहीन, तिखट चवीचा व झोंबणारा वायू अतिशय विषारी आहे. जळताना या वायूच्या ज्योतीचा वैशिष्ट्यपूर्ण रंग सप्ताळूच्या फुलांच्या रंगासारखा लालसर दिसतो. याचे सहजपणे संघनन होऊन द्रव तयार होतो. या द्रवाचा उकळबिंदू (एक वातावरणीय दाबाला) −२०·७° से. असतो. याच्या पाण्यातील विद्रावाचे जलीय विच्छेदन सहजपणे होऊन हायड्रोजन सायनाइड व सायनिक अम्ल तयार होतात. सायनोजेन वायूपासून ऑक्झॅइड, यूरिया तसेच अमोनियम फॉर्मेट, अमोनियम ऑक्झॅलेट, अमोनियम सायनेट इ. पदार्थही तयार होतात. काही काळानंतर गडद उदी रंगाचे ॲझुल्मिक अम्ल वेगळे होते. सायनोजेन दाहक (कॉस्टिक) सोड्यात विरघळून सोडियमाचे सायनाइड व सायनेट मिळतात.

C2N2 + 2NaOH⟶NaCN + NaCNO + H2O

ही विक्रिया दाहक सोड्यावरील क्लोरिनाच्या विक्रियेसारखी आहे. कीटकनाशके म्हणून वापरण्यात येणारी जटिल थायोसायनेटे तयार करताना सायनोजेनाचा प्रारंभीचे द्रव्य म्हणून उपयोग होतो.

हॅलोजनसंयुगे :सायनोजेन क्लोराइड : (CNCl). हा विषारी व अश्रुकारी द्रव वा वायू असून धातवीय सायनाइडांवर किंवा सजल हायड्रोजन सायनाइडावर क्लोरिनाची क्रिया करून मिळतो. या रंगहीन द्रवाचा उकळबिंदू (एक वातावरणीय दाबाला) १२·७° से. असतो. पाण्यात विरघळणारे हे संयुग कार्बनी संयुगांच्या संश्लेषणात वापरतात.

सायनोजेन ब्रोमाइड : (CNBr). हे अश्रुकारी व विषारी संयुग असून याचे पांढरे स्फटिक ५२° से. ला वितळतात व ६१·३° से. ला त्याची वाफ होते. याच्या वाफेचा तंत्रिका (मज्जा) केंद्रावर परिणाम होतो. याचाही कार्बनी संयुगाच्या संश्लेषणात व धूम्रकारी पदार्थ म्हणून उपयोग होतो.

सायनोजेन फ्ल्युओराइड : (CNF). हा रंगहीन व विषारी वायू अश्रुधूर म्हणून वापरतात. सायनुरिक फ्ल्युओराइड तापविले असता हा वायू तयार होतो.

सायनोजेन आयोडाइड : (आयोडीन सायनाइड ICN ). हे विषारी, तीव्र अश्रुकारी, रंगहीन, तिखट व अम्लीय चवीचे संयुग आहे. याचे स्फटिक सुईसारखे असून हे १४७° से. ला वितळते. पाणी, अल्कोहॉल व ईथर यांच्यात विरघळणारे हे संयुग प्राण्यांचे चर्मपूरण नमुने तयार करताना परिरक्षक म्हणून वापरतात.

हायड्रोसायनिक अम्ल (प्रूसिकअम्ल) : (HCN). हे प्रूसियन ब्ल्यू नावाच्या निळ्या रंगद्रव्यापासून कार्ल व्हिल्हेल्म शेले (शील) यांनी १७८३ मध्ये तयार केल्यामुळे याला प्रूसिक अम्ल म्हणतात. हे वायुरूप संयुग मुक्त रूपात कधीच आढळत नाही. मात्र याची संयुगे ग्लायकोसाइडांच्या रूपांत वनस्पतींमध्ये विस्तृतपणे आढळतात. ही ग्लायकोसाइडे ⇨ एंझाइमांच्या जलविच्छेद्य क्रियेने अपघटित (विघटित) झाल्याने हायड्रोजन सायनाइड, एक शर्करा व आल्डिहाइड वा कीटोन तयार होतात. याचा व याच्या विद्रावांचा वैशिष्ट्यदर्शक व झोंबणारा वास बदामाच्या तेलासारखा कडू असतो. हायड्रोसायनिक अम्ल एक सर्वाधिक विषारी द्रव्य असून याची मानवाच्या शरीराच्या १ किग्रॅ. मागे १ मिग्रॅ. एवढी मात्रा घातक ठरते. याची शरीरावर अतिजलद क्रिया होते, कारण जैव प्रकियांसाठी लागणारा ऑक्सिजन ऑक्सिहीमोग्लोबिनाकडून ज्यायंत्रणेद्वारे उपलब्ध होतो, त्या यंत्रणेला या अम्लाने प्रतिबंध निर्माण होतो.

सौम्य अम्लांची अल्कली सायनाइडांवर किंवा फेरोसायनाइडांवर क्रिया करून हायड्रोसायनिक अम्ल प्रयोगशाळेत तयार करतात. मळीपासून अमोनिया व कार्बन मोनॉक्साइड, एथिलीन वा मिथेन यांच्यापासून अथवा नायट्रोजन व विविध हायड्रोकार्बने यांच्यापासून हा वायू मिळवितात. पीडकांच्या नियंत्रणासाठी याची धुरी देतात तसेच विषारी वायू म्हणून याचा अन्य प्रकारे उपयोग करतात. सायनाइड लवणे, ॲकिलोनायट्राइल व रंगद्रव्ये यांच्या उत्पादनासाठी हे वापरतात. कृषीमध्ये धूम्रकारी पदार्थ म्हणून याचा उपयोग होतो.

गुणधर्म : शुद्घ हायड्रोसायनिक अम्ल−१३·४°से. ला वितळते आणि रंगहीन अतिशय बाष्पनशील द्रव बनतो. याचे वि. गु. १५° से.ला ०·६९५ असून याचा उकळबिंदू (एक वातावरणीय दाबाला) २७·६° से. असतो. याचा विद्युत् अपारक स्थिरांक[⟶ विद्युत् अपारक पदार्थ] अतिशय उच्च असतो (०° से.ला १५८·१) आणि याच्या द्रवात अनेक संयुगे विरघळून त्यापासून उच्च विद्युत् संवाहक विद्राव बनवितात. लेशमात्र पाण्याने किंवा अल्कधर्मी अशुद्घींमुळे याच्या अपघटनास चालना मिळून पॅरासायनोजेन हे काळे बहुवारिक तयार होते. हा वायू अल्कोहॉल, ईथर व पाणी यांमध्ये सर्व प्रमाणात मिसळतो. याचा पाण्यातील विद्राव हे एक सर्वांत दुर्बल अम्ल असून त्याच्यामुळे लिटमस कागद किंचितच लालसर होतो. याच्या ⇨उदासिनीकरणाने सायनाइडे ही लवणे तयार होतात.

अभिज्ञान : हायड्रोसायनिक अम्लाचा विद्राव किंवा कोणतेही पाण्यात विरघळणारे सायनाइड पुढील रीतीने ओळखता येते. सिल्व्हर नायट्रेटाबरोबर हायड्रोसायनिक अम्लापासून उकळत्या नायट्रिक अम्लात विरघळणारा सिल्व्हरसायनाइडाचा पांढरा अवक्षेप (साका) मिळतो. हा विद्राव तीव्र अल्कधर्मी करून, फेरस वा फेरिक लवणाबरोबर उकळून व अखेरीस अम्लीय केल्यास वैशिष्ट्यसूचक प्रूसियन निळ्या रंगाचा अवक्षेप मिळतो.


हायड्रोसायनिक अम्ल ओळखण्याची सर्वोत्कृष्ट चाचणी पुढीलआहे: परीक्ष्य विद्रावात अमोनिया व अमोनियम सल्फाइड घालून जवळजवळ कोरडे होईपर्यंत बाष्पीभवन करून मागे उरलेला अवक्षेप हायड्रोक्लोरिक अम्लाने अम्लीय करतात. परीक्ष्य विद्रावात हायड्रोसायनिक अम्ल असल्यास अमोनियम थायोसायनेट तयार होते व त्यात फेरिक लवण टाकल्यास त्याला रक्तासारखा लाल रंग येतो.

सायनुरिकअम्ल : {[ HOC(NCOH)2N ].2H2O}. सायनुरिक अम्लाचे रंगहीन व एकनताक्ष स्फटिक पाण्यात किंचित विरघळतात. हायड्रोसायनिक अम्ल या रंगहीन व विषारी द्रवाच्या ⇨बहुवारिकीकरणाने सायनुरिक अम्ल तयार होते.

सायनाइडे : हायड्रोसायनिक अम्लाच्या लवणांची विरघळण्याची क्षमता क्लोराइडांसारखी असते व त्यांच्यात सायनोजेन गट( –CN) असतो. ही सर्व सायनाइडे अतिशय विषारी असतात.

सोडियम सायनाइड : (NaCN). ही पाण्यात विरघळणारी विषारी व पांढरी पूड सु.५६३° से. ला वितळते. तसेच हवेत उघडे ठेवल्यास याचे जलदपणे अपघटन होते. अमोनिया वायू सोडियम धातूवरून ३००°–४००° से. ला पाठवून तयार होणारे सोडामाइड लोणारी कोळशाच्या तप्त निखाऱ्यावरून जाऊ दिल्यास सोडियमसायनाइड तयार होते. कच्च्या कोलगॅसपासून व सायनामाइडापासून निष्कर्षित केलेल्या हायड्रोसायनिक अम्लाच्या मिठाशी किंवा सोडियमकार्बोनेटाशी संयोग करूनही सोडियमसायनाइड तयार करतात. धातुकांपासून (कच्च्या रूपातील धातूंपासून) सोने व चांदी यांच्या निष्कर्षणासाठी (मिळविण्यासाठी) सोडियमसायनाइडाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. रंगद्रव्यनिर्मिती, धातूंचे उष्णता संस्करण (उदा., पोलादाचे पृष्ठ कठिनीकरण), विद्युत विलेपन इत्यादींसाठी सोडियमसायनाइड वापरतात. व्हर्मिनांचा (सूक्ष्म प्राण्यांचा) नाश करण्यासाठी सोडियमसायनाइडापासून बनविलेले हायड्रोसायनिक अम्ल वापरतात.

पोटॅशियम सायनाइड : ( KCN ). हे सोडियमसायनाइडासारखे असून पोटॅशियम कार्बोनेट व कार्बन यांच्या सायुज्जित (वितळलेल्या) मिश्रणावर अमोनियाची क्रिया करून तयार करतात. हे विषारी असून याच्या पांढऱ्या चिघळणाऱ्या स्फटिकांना कडू बदामासारखी चव असते. हे पाणी, अल्कोहॉल व ग्लिसरॉल यांच्यात विरघळते. धातुनिष्कर्षण व पोलादाचे उष्णता संस्करण करण्यासाठी तसेच वैश्लेषिक विक्रियाकारक व कीटकनाशक म्हणून पोटॅशियम सायनाइड वापरतात.

मर्क्युरिक व सिल्व्हर सायनाइड : [Hg(CN)2 वAgCN]. मर्क्युरिक सायनाइड व सिल्व्हर सायनाइड ही संयुगे मर्क्युरिक क्लोराइड किंवा सिल्व्हर नायट्रेट यांचा विद्राव पोटॅशियम सायनाइडाबरोबर मिसळून तयार करतात. ही सायनाइडे तापविल्यास सायनोजेन वायू बाहेर पडतो. मर्क्युरिक सायनाइड विषारी असून याचे रंगहीन व पारदर्शक स्फटिक प्रकाशात काळवंडतात. पाणी व अल्कोहॉल यांत हे विरघळते. तापविल्यास याचे अपघटन होते. सिल्व्हर सायनाइडाचे विषारी, पांढरे प्रकाशसंवेदी चूर्ण अल्कली व अम्ले यांत विरघळते, मात्र पाण्यात विरघळत नाही. याचे ३२०° से. तापमानाला अपघटन होते. छायाचित्रण, औषधे व जंतुनाशक साबण यांमध्ये तसेच चांदीचा लेप देण्यासाठी हे वापरतात.

क्युप्रिक (कॉपर) सायनाइड : [ Cu(CN)2 ]. कॉपर सल्फेट व पोटॅशियम सायनाइड यांचे विद्राव मिसळले असता क्युप्रिक सायनाइड तयार होते. हे अस्थिर संयुग असून यातून सायनोजेन वायू बाहेर पडून क्युप्रस सायनाइड (CuCN) मागे राहते. क्युप्रिक सायनाइड हिरवे चूर्ण असून पाण्यात विरघळत नाही. लोखंडावर तांब्याचा मुलामा देण्यासाठी हे विद्युत् विलेपनात वापरतात.

फेरोसायनाइडे आणि फेरिसायनाइडे : पोटॅशियम फेरोसायनाइड : हायड्रोसायनिक अम्लापासून अनेक जटिल सायनाइडे बनतात. नायट्रोजनयुक्त गाळाचा कोळसा करून मिळालेला पुंज पोटॅश व लोखंडाचा चुरा यांच्याबरोबर भाजल्यास जो पदार्थ मिळतो त्याच्यापासून पाण्याद्वारे पोटॅशियम फेरोसायनाइडाचे [K4Fe(CN)6 . 3H2O] निष्कर्षण करता येते. याचे खारट चवीचे, पिवळे स्फटिक पाण्यात विरघळतात, मात्र अल्कोहॉलात विरघळत नाहीत. यातील पाणी ६०° से. ला निघून जाते. हे औषधे, शुष्क रंग व स्फोटके यांमध्ये आणि वैश्लेषिक विक्रियाकारक म्हणून वापरतात.

पोटॅशियम फेरिसायनाइड : [ K3Fe(CN)6 ]. विषारी व पाण्यात विरघळणारे असून याचे लहान स्फटिक भडक तांबडे असतात. तापविल्यास याचे अपघटन होते. कॅलिको छपाईत व लोकर रंगविण्यासाठी याचा वापर करतात.

सोडियम फेरोसायनाइड : [ Na4Fe(CN)6. 10H2O]. पोटॅशियम फेरोसायनाइडाप्रमाणे हे तयार करतात. याचे स्फटिक अर्धपारदर्शक असून पाण्यात विरघळतात, परंतु अल्कोहॉलात विरघळत नाहीत. छायाचित्रण, रंगद्रव्ये, कातडी कमावणे व नीलप्रत कागद यांसाठी हे वापरतात.

सोडियम फेरिसायनाइड : [Na3Fe(CN)6.H2O]. विषारी, चिघळणारे तांबडे चूर्ण पाण्यात विरघळते, मात्र अल्कोहॉलात विरघळत नाही. छपाईमध्ये व रंगद्रव्ये तयार करण्यासाठी हे वापरतात.

थायोसायनेटे : (सल्फोसायनेटे). ही थायोसायनिक अम्लाची (HCNS) लवणे असून लेड थायोसायनेटावर गंधकीकृत हायड्रोजनाची क्रिया करून किंवा थायोसायनेटांचे सल्फ्यूरिक अम्लाबरोबर ऊर्ध्वपातन करून ती तयार करतात.

सजल पोटॅशियम सायनाइडाचे जादा गंधकाबरोबर पाचन करून पोटॅशियम थायोसायनेट(KCNS) तयार करतात. याचे शुष्क घटक सायुज्जित करून किंवा पोटॅशियम कार्बोनेट, गंधक व पोटॅशियम फेरोसायनाइड यांचे मिश्रण तापवूनही हे तयार करतात. याचे स्फटिक पृष्ठावर रेघा असलेले, लांब प्रचिन, दिसायला नायटरच्या स्फटिकांसारखे असतात. थायोसायनेट निर्जल असले, तरी अतिशय चिघळणारे आणि पाण्यात व अल्कोहॉलात अतिशय विरघळणारे असून सहजपणे वितळून रंगहीन द्रव तयार होतो. हे रंगहीन, गंधहीन, आर्द्रताशोषक असून याचे स्फटिक खारट चवीचे असतात. याचे सु. ५००° से. तापमानाला अपघटन होते. थायोसायनेटे रासायनिक विश्लेषणात विक्रियाकारक म्हणून, गोठण मिश्रणे, रसायनांची निर्मिती, कापड छपाई, कापड रंगविणे व छायाचित्रण यांमध्ये वापरतात.

अमोनियम व सोडियम थायोसायनेटांचे रासायनिक वर्तन सारखे असते. अमोनियम थायोसायनेटाचे (NH4SCN) स्फटिक रंगहीन व चिघळणारे असून ते १४९.६° से. तापमानाला वितळतात. पाणी, अल्कोहॉल, ॲसिटोन व अमोनिया यांत हे विरघळते. वैश्लेषिक रसायनशास्त्र, गोठण विद्राव, कापड रंगविणे, विद्युत् विलेपन, छायाचित्रण इत्यादींत हे वापरतात.

सोडियम थायोसायनेट (NaSCN) हे विषारी, पांढरे चूर्ण असून पाण्यात व अल्कोहॉलात विरघळते. याचा वितळबिंदू २८७° से. आहे. विद्रावक, विक्रियाकारक व रासायनिक मध्यस्थ पदार्थ म्हणून, तसेच रबरावरील संस्करण, कापडाची छपाई इत्यादींत हे वापरतात.

फेरिक थायोसायनेट चमकदार तांबडे संयुग असून हे लेशमात्र लोखंडाच्या चाचणीसाठी व वर्णापनाद्वारे लोखंडाचे प्रमाण निश्चित करण्यासाठी वापरतात. हे ईथरमध्ये विरघळत असल्याने इतर अनेक मूलद्रव्यांपासून लोखंड अलग करण्यासाठी उपयुक्त आहे.

मर्क्युरिक थायोसायनेट [Hg(SCN)2] हे विषारी व पांढरे चूर्ण असून अल्कोहॉलात विरघळते व पाण्यात थोडेच विरघळते. तापविल्यास याचे अपघटन होते. पोटॅशियम थायोसायनेटाच्या विद्रावात मर्क्युरिक क्लोराइड घालून हे तयार करतात. हे चूर्ण सुकवून पेटविल्यास प्रचंड प्रमाणात फुगते, म्हणून ⇨ शोभेच्या दारुकामातील नागाच्या गोळीत हा मुख्य घटक असतो. याचा वापर छायाचित्रणातही करतात.

सायनामाइड : (NHCNH). याचे रंगहीन स्फटिक ४३°-४४° से. ला वितळतात. धातूच्या सायनाइडांचे हे मूळ आहे. कॅल्शियम कार्बाइडावर नायट्रोजनाची सु. १,१००° से. ला क्रिया करून कॅल्शियम सायनामाइड (CaCN2) बनवितात. शुद्घ रूपात याचे रंगहीन समांतर षट्फलकीय स्फटिक असतात. याचा व्यापारी प्रकार करड्या रंगाचा असून त्यात हे संयुग ५५–७० टक्के असते. खत आणि तणनाशक म्हणून हे वापरतात. पोलादाच्या पृष्ठकठिनीकरणासाठीही याचा वापर करतात.

पहा :प्लॅस्टिक व उच्च्बहुवारिके रबर.

ठाकूर, अ. ना.