डोंगर

साना : येमेन प्रजासत्ताकाची राजधानी व एक ऐतिहासिक शहर. लोकसंख्या १७,४७,६२७ (२०१०). ते देशाच्या पश्चिम भागात मौंट नुकूमच्या पश्चिम पायथ्याशी सस. पासून सु. २,३५० मी. उंचीवर वसले आहे. त्याचा आकार इंग्रजी आठ अक्षराप्रमाणे असून जुन्या शहराला ६ ते ९ मी. उंचीची भक्कम तटबंदी आहे. तिला अनेक दरवाजे असून त्यांपैकी वास्तुशिल्पदृष्ट्या उल्लेखनीय असलेले बाब अल्-यामन (येमेनद्वार) हे ‘स्वातंत्र्यद्वार’ म्हणून १९६२ मध्ये जाहीर करण्यात आले आहे. अनेक शतकांपासून साना हे येमेनच्या उच्च प्रदेशातील प्रमुख आर्थिक, राजकीय व धार्मिक केंद्र म्हणून ओळखले जाते.

सानामधील ‘घुदान’ किल्ल इस्लामपूर्व काळातील पहिल्या शतकातील आहे. पुढे इस्लाम धर्माच्या स्थापनेपूर्वी यावर हिम्यराइट राजघराण्याची सत्ता होती. ख्रिस्ती इथिओपियन आक्रमकांनी इ. स. ५२५ मध्ये हे जिंकले. पुढे इराणी आक्रमकांनी त्यांना हुसकावून लावले (५७५). महंमद पैगंबरांचे जावई व चौथा खलीफा अली याने ६३२ मध्ये साना काबीज करून सानाचे इस्लामीकरण केले. सुन्नी आणि शिया पंथांच्या राजकीय संघर्षात येथे अनागोंदी माजली. येमेनमध्ये नवव्या शतकात इमाम पीठाची स्थापना याह्या अल्-हदी हलाल हक्क या झैदी राज्यकत्याने केली. बाराव्या ते पंधराव्या शतकांत सत्ताधाऱ्यांनी राजधानी अन्यत्र हलविल्यामुळे सानाचे महत्त्व कमी झाले. या सत्ताधीशांपैकी ताहिरिद वंशातील अब्द अल वाहिब इब्न साहिर (कार. १४७८–८८) याने सानात सुंदर मशिदी आणि मद्रसा बांधल्या. त्यांपैकी जामी अल्-कबीर (भव्यमशीद) ही मक्का येथील मशिदीच्या तोडीची मानली जाते. पुढे ईजिप्त मामलूक सुलतानाने साना १५१६ मध्ये काबीज केले पण त्याच वर्षी ऑटोमन सम्राटाने ते पादाकांत केले. ऑटोमन सम्राटांनी इमामांबरोबर १९१३ मध्ये तह करून स्थानिक इमामांना स्वातंत्र्य दिले. पहिल्या महायुद्घात (१९१४–१८) ऑटोमन साम्राज्य संपुष्टात आल्यानंतर सानाला राजधानीचा दर्जा प्राप्त झाला. अहमद इमाम (कार. १९४८–६२) याच्या कारकीर्दीत राजधानी दक्षिण येमेन मधील ताईझ येथे हलविण्यात आली परंतु येमेन मध्ये बिगेडियर अब्द अल्-सलाल याने इमाम मुहंमद अल्-बद्र यास पदच्युत करून राष्ट्राध्यक्षपद व सेनाप्रमुखपद आपल्याकडे घेतले आणि येमेनच्या अरब प्रजासत्ताकाची घोषणा केली (१९६२). तेव्हा साना पुन्हा राजधानी झाली. त्यानंतर इमाम सत्तेचे पुरस्कर्ते आणि प्रजासत्ताकवादी यांत यादवी युद्घ १९७० पर्यंत चालू होते. १९६२–७० मधील यादवी युद्घात शहर व परिसरातील अनेक इमारतीची फार मोठी हानी झाली होती. पुढे येमेन अरब प्रजासत्ताक आणि पीपल्स डेमॉक्रटिक रिपब्लिक ऑफ येमेन यांच्या एकीकरणाचे प्रयत्न सफल होऊन २२ मे १९९० रोजी रिपब्लिक ऑफ येमेन हे राष्ट्र निर्माण झाले. त्याची राजधानी साना ठरली.

सानातील ज्यू लोकांनी १९४९-५० मध्ये इझ्राएलमध्ये स्थलांतर केले. त्यामुळे हस्तकौशल्य कलेतून मिळणाऱ्या उत्पन्नावर मर्यादा आल्या. सानाच्या मध्यवर्ती वस्तीत सात मजली प्रजासत्ताक राजप्रासाद (पूर्वीचा इमामचा राजवाडा) आहे तर पूर्व भागात बाजारपेठ आणि लहान मोठ्या चाळीस मशिदी आहेत. पश्चिमेकडील नवीन भागात बिर अल्-अझाब, बिर अल्-बहायामी आणि बिर ॲश-शम्स ह्या नवीन वसाहती आहेत. या भागांतून चामडी कमविणे, जडजवाहिर, भांडीनिर्मिती या उद्योगांबरोबरच कशिदाकाम करणारे कारागीर आढळतात. विदेशी गुंतवणुकीतून येथे आधुनिक कारखाने उभारले जात आहेत. चीनच्या सहकार्याने वस्त्रोद्योग सुरु झाला आहे (१९६६). हे प्रादेशिक व्यापारी केंद्र आहे. चीनने बांधलेला (१९६१) महामार्ग आणि अन्य रस्ते यांनी ते महत्त्वाच्या शहरांशी जोडले आहे . सानाच्या पश्चिमेस २० किमी. वर आंतरराष्ट्रीय विमानतळ अर्-रहबाह आहे. येथील साना विद्यापीठाची स्थापना १९७० मध्ये झालेली आहे.

देशपांडे, सु. र.