सात्मीकरण,सामाजिक : (ॲसिमिलेशन, सोशल). सांस्कृतिक समावेशनाच्या सामाजिक प्रकियेला दिलेली समाजशास्त्रीय संज्ञा. सात्मीकरणात भिन्न सांस्कृतिक मूल्ये, धर्म, चालीरीती, रुढी असलेले दोन अथवा अनेक सामाजिक समूह सामोपचाराने एकत्र राहतात. सात्मीकरण हे अनेक संस्कृतींचे मिश्रण असून ह्यात गौण गटांची संस्कृती प्रभावशाली सांस्कृतिक समाजात मिसळून जाते किंवा प्रभावशाली समूहाकडून नष्ट होते. समाजात संघटनात्मक आणि विघटनात्मक अशा दोन्ही प्रकारच्या प्रक्रिया चालू असतात. सात्मीकरण संघटनात्मक प्रकियांसारखी समाजात समतोल आणि सामंजस्य साधणारी प्रक्रिया आहे. सात्मीकरणाला दुसरे नाव संमीलन किंवा संमीलीकरण असे आहे. संमिलनामुळे सात्मीकरण सुलभ होते.

सात्मीकरण सामाजिक असल्यामुळे विविध संस्कृती असणारे वांशिक गट, भाषिक गट किंवा प्रादेशिक गट एकाच प्रदेशात राहू लागतात. त्यावेळी त्यांच्यात देवघेव सुरु होते. बाहेरुन आलेले, स्थानिक उच्च वा नीच दर्जा असलेले गट मूळ समाजातील प्रमुख प्रवाहातील प्रभावी गटांमध्ये या ना त्या प्रसंगांमध्ये मिसळू लागतात रीतीभाती, फॅशन्स, सणवारांवेळच्या कर्मकांडांचे अनुकरण होऊ लागते वरिष्ठ गटांचे अनुकरण कनिष्ठ गटातील मंडळी अप्रत्यक्ष-प्रत्यक्ष रीत्या करु लागतात. अशा अनुकरणामुळे भिन्न संस्कृतीच अंगवळणी पडण्यास सुरुवात होते. त्या संस्कृतीतील माणसे आपली वाटू लागतात. त्यातल्या त्यात प्रभावी गटाची मूल्ये आणि संस्कृती अंगीकृत करण्याकडे कल असतो. उदा., अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील समाज हा यूरोपातील विविध संस्कृतींच्या आप्रवाशांनी व्यापला असून ह्यांत आशियाईही सामील झाले आहेत. हे समाज आपापसांतील मूळच्या संस्कृती विसरुन अमेरिकन संस्कृतीशी एकरुप होण्यासाठी अमेरिकन जीवनशैली आत्मसात करीत आहेत. भारतीय संस्कृतीने अनेक बाह्य आक्रमकांना पचविले आणि ते भारतीय होऊन गेले. अनेक सांस्कृतिक गट मोठ्या समाजात स्वतःच्या संस्कृतीतील काही वैशिष्ट्ये कायम ठेवून (पेहराव, लोकगीते, कला, संगीत, भाषा, लिपी) मूळच्या समूहाशी तादात्म्य पावतात. धर्मांतर केलेले गट नवीन धर्मात सामावून जातात. सात्मीकरण सामाजिक स्वरुपाचे असून समाजातील विविध गटांना स्पर्श करून जाते परंतु सर्वच गटांमध्ये सात्मीकरणाची प्रक्रिया होतेच असे नाही. संपूर्ण सात्मीकरण ही संकल्पना अवास्तव आहे कारण आप्रवाशांपैकी एतद्देशीय लोक आपापले उत्सव सण, समारंभ साजरे करतात. भारतात सिंधी वा पारशी बाहेरुन आले, त्यांनी व्यापारात जम बसविला आणि त्यांपैकी काही राजकीय पक्षांमध्येही सामील झाले पण गौण गट म्हणूनच त्यांनी स्वतंत्र अस्तित्व जपले आहे. सात्मीकरणाची प्रक्रिया संथपणे चालते. प्रत्येक सांस्कृतिक गट स्वतःची संस्कृती पूर्णपणे न विसरतामुख्य गटाबाहेर राहतो. समाजात एखादा गट बलवान असतो (सत्ता, संपत्ती, जात, धर्म या दृष्टींनी) तोच आपली मूल्ये आणि जीवनशैली इतरांवर लादतो व तीच अधिकांशाने इतर बहुतेक गट आत्मसात करतात. गटांमध्ये फार भिन्नता असेल, तर ते पूर्णतः बदलून जात नाहीत मात्र राष्ट्रीय समारंभांच्या निमित्ताने किंवा सभ्यता म्हणून सर्व गटांबरोबर राहतात.

काळदाते,सुधा