मुकर्जी, धूर्जटि प्रसाद : (१८९४–१९६२). प्रसिद्ध बंगाली समाजशास्त्रज्ञ. १९२२ मध्ये अर्थशास्त्र आणि समाजशास्त्र या विषयांचे व्याख्याते म्हणून लखनौ विद्यापीठात नेमणूक. त्याच विद्यापीठात १९५१ मध्ये अर्थशास्त्र–समाजशास्त्र विभागाचे प्राध्यापक आणि प्रमुख म्हणून नियुक्ती. १९५४ मध्ये निवृत्त. निवृत्तीपूर्वी एक वर्ष (१९५३) अलीगढ विद्यापीठात अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून ते गेले होते तेथे ते पाच वर्ष राहिले. राष्ट्रीय काँग्रेसने आरंभिलेल्या स्वातंत्र्यआंदोलनाशी ते समरस झाले होते. १९३७ मध्ये भारतातील अनेक प्रांतात काँग्रेस पक्ष सत्तेवर होता. त्यावेळी तेव्हाच्या संयुक्त प्रांतात माहिती प्रसारणाचे संचालक म्हणून मुकर्जींची नियुक्ती झाली होती. महायुद्धात सहभागी होण्याच्या मुद्यावर काँग्रेसने सत्ता सोडली, तेव्हा तेही विद्यापीठास परत आले.

भारतीय समाजशास्त्रीय परिषदेचे ते संस्थापक-अध्यक्ष होते (१९५३–५४). आंतरराष्ट्रीय समाजशास्त्रीय मंडळाचे ते उपाध्यक्ष होते. इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोशल स्टडीज, हेग येथे अम्यागत प्राध्यापक म्हणून काही काळ ते गेले होते. यूनेस्कोच्या नियंत्रणावरून पॅरिस येथे व्याख्यानासाठीही ते गेले होते.

मुकर्जींनी इंग्रजीत व बंगालीत काही मोजकेच पण महत्त्वपूर्ण ग्रंथलेखन केले. पर्सनॅलिटी अँड द सोशल सायन्सेस (१९२४), बेसिक कॉन्सेप्ट्स इन सोशिऑलॉजी (१९३२), मॉडर्न इंडियन कल्चर (१९४२), टॅगोर : अ स्टडी (१९४३), इंडियन म्यूझिक (१९४५), ऑन इंडियन हिस्टरी (१९४५), इंट्रोडक्शन टु इंडियन म्यूझिक (१९४५), प्रॉब्लेम्स ऑफ इंडियन युथ (१९४६), व्ह्यूज अँड काउंटर व्ह्यूज (१९४६), डायव्हर्सिटीज (संपा.१९५८) हे त्यांतील काही महत्त्वाचे इंग्रजी ग्रंथ होत. बंगालीतही त्यांनी कथा (रिअँलिस्ट–१९३३), कादंबरी (अंतःशीला–१९३५, आवर्त–१९३७, मोहाना–१९४३), निबंध (आमरा ओ ताम्हारा–१९३१, चिंतयसी–१९६३, कथा ओ सुर–१९३८) इ. प्रकारचे लेखन केले आहे.

मुकर्जींच्या व्यासंगाचा प्रवास इतिहासाकडून अर्थशास्त्र आणि नंतर समाजशास्त्र असा झालेला होता. भारतीय आर्थिक आणि सामाजिक घडामोडींविषयक विवेचनात त्यांची ऐतिहासिक दृष्टी प्रकर्षाने जाणवते. त्यांच्या ऐतिहासिक दृष्टिकोनामुळेच ते मार्क्सवादाच्या जवळ गेले अगर ते मार्क्सवादी बनले, असे मन काही अभ्यासकांनी व्यक्त केले परंतु अन्य काहींच्या मते मुकर्जींना भारतीय सामाजिक–सांस्कृतिक इतिहासात वर्गसंघर्ष कोठेही आढळला नाही, तर तत्त्वज्ञान आणि धर्म यांचाच प्रभाव आढळला. हा इतिहास म्हणजे दीर्घ काळ चालत आलेल्या सांस्कृतिक समन्वयाचा एक प्रयोगच होय, असा त्यांचा अभिप्राय होता.

मुकर्जींनी संस्कृतीच्या विविध पैलूंवर लेखन केले, हे त्यांच्या ग्रंथसूचीवरून स्पष्ट होते. भारतीय कला, संगीत आणि समाजजीवन यांचे मूलगामी आणि सर्वंकष दृष्टिकोनातून विश्लेषण करणारे श्रेष्ठ विद्वान म्हणून समाजशास्त्रीय क्षेत्रामध्ये त्यांचे स्थान महत्त्वपूर्ण आहे.

संदर्भ :1. Madan, T. N. Dialectic of Tradition and Modernity in the Sociology of D. P. Mukerji”, Sociological Bulletin, Vol. 26, No. 2. PP. 155-178, New Delhi, September 1977.

             2. Unnithan, T. K. N. Indra Deva Yogendra Singh, Towards Sociology of Culture in India, New Delhi, 1965.

कुलकर्णी, मा. गु.