साकल्य मानसशास्त्र : (होलिस्टिक सायकॉलॉजी ). साकल्य म्हणजे समग्रता, एक पूर्ण.संपूर्ण विश्व हेच एक साकल्य, एक पूर्ण आहे. सर्व शास्त्रे, सर्व संकल्पना ह्यांच्याकडे एक साकल्य म्हणून पाहणे हा साकल्यवादी दृष्टिकोण होय. निसर्गातही अनेक साकल्ये आहेत. अशा साकल्यांच्या महत्त्वाची जाणीव प्राचीन काळापासून प्रकट होत आली आहे.
साकल्य मानसशास्त्र हेही व्यक्तीकडे जीवशास्त्रीय, मानसशास्त्रीय आणि समाजशास्त्रीय अशा वेगवेगळ्या संदर्भांत एक साकल्य म्हणूनच पाहते. व्यक्तीचे आणि तिच्या वर्तनाचे विखंडन करणे म्हणजे तिचे सत्त्व बिघडवणे होय असे झाल्याने त्या व्यक्तीचे खरेखुरे आकलन होत नाही, असे साकल्यवादी मानसशास्त्र मानते. हा दृष्टिकोण विभाजनवादी दृष्टिकोनाच्या थेट विरोधी आहे. एखादी घटना तपासण्यासाठी, तिची चिकित्सा करण्यासाठी विभाजनवादी (रिडक्शनिस्ट) निरीक्षक तिचे विखंडन करून तिच्या एकेका भागाचा विचार करतो. मानसशास्त्रात हा विभाजनवादी दृष्टिकोण, उद्दीपक-प्रतिसादाच्या सूत्राधारे वर्तनाचे विश्लेषण करणे आणि मानवी वर्तनाकडे एक यांत्रिकता म्हणून पाहणे ह्या प्रवृत्तीतून दिसून येतो.
साकल्यवादी दृष्टिकोण मानसशास्त्राच्या अनेक क्षेत्रांत–मुख्यतः व्यक्तिमत्त्वविचारात–दिसून येतो. प्रत्येक व्यक्ती हे एक साकल्य म्हणून समजण्यात यावे, हा विचार मानवत्वलक्षी (ह्यूमॅनिस्टिक) संप्रदायाच्या व्यक्तिमत्त्वविषयक प्रणालीत आधारभूत मानण्यात येतो. मानवत्वलक्षी मानसशास्त्र माणसाला इतर प्राण्यांपेक्षा वेगळा आणि श्रेष्ठ मानते. हे वेगळेपण केवळ परिगणनात्मक आहे असे नाही, तर ते गुणात्मकही आहे. माणसामध्ये असे काहीतरी आहे, की ते केवळ मानवीच आहे अनन्यसाधारण आहे.मानवत्वलक्षी मानसशास्त्राने माणसाच्या अनन्यसाधारणत्वावर आणि साकल्यावर दिलेला भर माणसाच्या स्थूल किंवा सांघातिक (मोलर) विश्लेषणाकडे नेतो. मानवत्वलक्षी मानसशास्त्रज्ञांनाही माणसाचा एकेक भाग वेगळा मानून विचार करावा, हे मान्य नव्हते. अमेरिकन मानसशास्त्रज्ञ कुर्ट गोल्डस्टाइन (१८७८–१९६५) आणि जर्मन मानसशास्त्रज्ञ अब्राइम मॅस्लो (१९०८–७०) हे मानवत्वलक्षी मानसशास्त्रातले मुख्य विचारवंत होत. मनुष्याकडे एक साकल्य म्हणून पाहावे, हा गोल्डस्टाइनचा आग्रह होता. माणसाचा साकल्यवादी दृष्टिकोनातून अभ्यास केल्यास माणूस हा विश्वातील अधिक व्यापक अशा साकल्याचा भाग बनतो, असे मॅस्लोचे प्रतिपादन होते. [⟶ मानसशास्त्र (मानवत्वलक्षी संप्रदाय)].
⇨ ज्ञानसंपादनाच्या क्षेत्रावरही साकल्य मानसशास्त्राचा परिणाम दिसून येतो. उद्दीपक-प्रतिक्रिया ह्यांचा संबंध ज्ञानसंपादनातील पायाभूत प्रक्रिया आहे, हा विचार साकल्य मानसशास्त्राने नाकारलेला आहे. ह्या संदर्भात व्यूह मानसशास्त्रज्ञांची प्रणाली निर्देशिता येते. व्यूह मानसशास्त्र आणि साकल्यवाद ह्यांचा निकटचा संबंधही आहे. अनेक संवेदने एक साकल्य म्हणून एकत्र आल्याने आपल्याला जो बोध होतो तो त्यातील वेगळ्या, अलग संवेदनांपेक्षा अगदी वेगळा असतो, इतकेच नव्हे, तर कोणत्याही वर्तनातील वा क्रियेतील संपूर्ण अर्थ हा त्या क्रियेतील घटकांपेक्षा वेगळा व अधिक असतो, असे व्यूहमानसशास्त्रज्ञांचे प्रतिपादन होते. [⟶ व्यूह मानसशास्र].
कुलकर्णी, अ. र.