साकमान, बेर्ट : (१२ जून १९४२– ). जर्मन वैद्यक, संशोधक व शास्त्रज्ञ. त्यांना १९९१ सालचे वैद्यकाचे (किंवा शरीरक्रियाविज्ञानाचे)नोबेल पारितोषिक जर्मन भौतिकीविज्ञ एर्व्हिन नेहेर यांच्याबरोबर देण्यात आले. साकमान यांनी कोशिकेच्या (पेशीच्या) क्रियेविषयीचे मूलभूत संशोधन केले. या दोघांनी आयन परिवाहाच्या (आयन-चॅनलच्या) अध्ययनासाठी पट्टी-पकड (पॅच-क्लँप) तंत्र विकसित केले व कोशिकांमधील एक-आयन परिवाहांच्या शोधासाठी त्यांना हे नोबेल पारितोषिक मिळाले. हे तंत्र कोशिका जीवविज्ञान व तंत्रिकाविज्ञान यांमध्ये व्यापकपणे वापरले जाते. या तंत्रामुळे कोशिकापटलातील एका अँपिअरच्या एक अब्जांश एवढा अत्यल्प विद्युत् प्रवाह ओळखता येतो.
साकमान यांचा जन्म जर्मनीतील स्टुटगार्ट येथे झाला. त्यांचे शिक्षण ट्युबिंगेन, म्यूनिक व गटिंगेन विद्यापीठांत झाले असून त्यांनी बी. ए. व एम्.डी. या पदव्या संपादन केल्या आहेत. म्यूनिक येथील मनोदोषचिकित्साविषयक माक्स प्लांक इन्स्टिट्यूटमध्ये संशोधन साहाय्यक (१९६९-७०), लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेजमधील जीवभौतिकी विभागात ब्रिटिश कौन्सिल फेलो (१९७१–७३), गटिंगेन येथे जीवभौतिकीय रसायनशास्त्रासाठीच्या माक्स प्लांक इन्स्टिट्यूटमध्ये संशोधन साहाय्यक (१९७४–७९), कोशिकापटल जीवविज्ञान गटात संशोधन साहाय्यक (१९७९–८२), कोशिकापटल शरीरक्रियाविज्ञान विभागात प्रमुख (१९८३–८५) व संचालक (१९८५–८७), कोशिका शरीरक्रियाविज्ञान विभागात प्राध्यापक (१९८७–८९) आणि म्यूनिक येथील वैद्यकविषयक माक्स प्लांक इन्स्टिट्यूटमधील कोशिका शरीरक्रियाविज्ञान विभागाचे संचालक (१९८९-९०) म्हणून त्यांनी काम केले असून हायड्लबर्ग विद्यापीठात १९९० साली ते शरीरक्रियाविज्ञानाचे प्राध्यापक झाले. २००८ पासून ते माक्स प्लांक इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोबायोलॉजीमध्ये विशेष गुणवत्ताप्राप्त प्राध्यापकांच्या संशोधक चमूचे नेतृत्व करीत आहेत.
ब्रिटिश कौन्सिलचे फेलो असताना त्यांनी प्रगत अध्ययन पूर्ण केले, तर १९७४ साली त्यांनी गटिंगेन विद्यापीठातून एम्.डी. पदवी संपादन केली. तेथील जीवभौतिकीय रसायनशास्त्राच्या माक्स प्लांक इन्स्टिट्यूटमध्ये तंत्रिका जीवविज्ञान विभागात साकमान व नेहेर यांनी एकाच प्रयोगशाळेत एकत्र संशोधन केले. एकत्रित काम करताना या दोघांनी कोशिकापटलातील आयन परिवाहांच्या (विद्युत् भारित अणू, रेणू वा अणुगट यांच्या प्रवाहांच्या) वैशिष्ट्यदर्शक संचांचे अस्तित्व निर्णायक रीतीने प्रस्थापित केले. यांपैकी काही परिवाहामधून फक्त धन विद्युत् भारित आयनांचाच प्रवाह जाऊ शकतो तर इतर परिवाहांमधून केवळ ऋण विद्युत् भारित आयनांचाच प्रवाह जाऊ शकतो. यामुळे त्यांनी परीक्षण केलेली कोशिकांची दीर्घ पल्ल्यांतील कार्ये प्रस्थापित झाली. अखेरीस त्यांनी मधुमेह, द्रवार्बुदीय तंत्वात्मकता, अपस्मार, अनेक हृद्वाहिनी विकार व विशिष्ट प्रकारच्या तंत्रिका-स्नायू विकृती या रोगांमधील आयन परिवाहांचे कार्य शोधून काढले. या शोधांमुळे नवीन व विवक्षित (विशिष्ट) औषधचिकित्सा विकसित करता आल्या.
साकमान यांनी दृक्प्रणाली, तंत्रिका शरीरक्रियाविज्ञान, जीवभौतिकी आणि त्यांचा निदानीय उपयोग वगैरे विषयांवर अनेक संशोधनपर लेख लिहिले असून ते विविध नियतकालिकांमध्ये प्रसिद्घ झाले आहेत. संगीत, वाचन, टेनिस खेळणे, बर्फावरून घसरण्याचा खेळ वगैरे साकमान यांचे छंद आहेत.
अमेरिकेची नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस (१९९३), लंडनची रॉयल सोसायटी (१९९४) इ. संस्थांचे ते परदेशी सदस्य आहेत तर त्यांना १९९९ साली लंडन विद्यापीठाची सन्माननीय डी. एस्सी. पदवी मिळाली. नोबेल पारितोषिकाशिवाय इतर अनेक पुरस्कार, पारितोषिके व अभ्यागत व्याख्याते इ. मानसन्मान त्यांना मिळाले आहेत. तसेच त्यांनी बेर्ट साकमान प्रतिष्ठान स्थापले आहे.
ठाकूर, अ. ना.