सांची : आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतातील एक प्राचीन बौद्घ अवशेषांचे पर्यटनस्थळ. ते मध्य प्रदेश राज्यात विदिशा जिल्ह्यात भोपाळच्या ईशान्येस सु. ४७ किमी. व सांची रेल्वे स्थानकापासून १·४ किमी. वर आहे. येथील सर्व अवशेष विंध्याचलनामक टेकडीच्या पठारावर असून टेकडीची उंची ९१ मी.आहे.या टेकडीभोवती पूर्वी भरभक्कम दगडी तटबंदी होती मात्र ती आज जमीनदोस्त झाली असून तिचे जीर्णशीर्ण अवशेष गतवैभवाची साक्ष देतात.टेकडीच्या माथ्यावर बौद्घ स्तूप, विहार, चैत्यगृहे व मंदिरे यांचे अवशेष आढळतात. येथे उपलब्ध झालेल्या गुप्तकालीन कोरीव लेखांत या स्थळाचा उल्लेख ककनय, काकनाद, काकनादबोटी, बोटा-श्रीपर्वत असा केल्याचे आढळते. महावंस व दीपवंस या बौद्घ ग्रंथांत त्यास चेतियगिरी म्हटले आहे. सांचीचा इतिहास सम्राट अशोक(इ. स. पू. २७३–२३२) याच्यापासून ज्ञात होतो तथापि येथील वास्तुकला व शिल्पकला तत्पूर्वीपासून बाराव्या शतकापर्यंतची आहे. सांचीला तीन बौद्घ स्तूप असून त्यांतील महास्तूपाची मूळ वास्तू अशोकाने बांधली. या स्तूपाचा शोध १८१८ मध्ये जनरल टेलर याने लावला. त्यात गौतम बुद्घाच्या अस्थींचे अवशेष असावेत, अशी एक वदंता आहे. त्या स्तूपाचा आकार विद्यमान स्तूपाच्या निम्मा असावा. हा मूळ स्तूप विटांचा होता आणि प्रशस्त जोते बांधून त्यावर लहानसे अर्धगोलार्ध घुमट बांधलेले होते. चौथऱ्यावरच प्रदक्षिणामार्ग होता. अशोकानंतर सु. शंभर वर्षांनी शुंग काळात (इ. स. पू. १८७– ७५) स्तूपाचा आकार वाढविण्यात आला आणि त्यावर शुंग राजांनी सुंदर कठडे व दगडी तोरणे बांधली.या पुनर्रचित स्तूपाचा व्यास सु. छत्तीस मी. व उंची साडेसोळा मी. होती. हा कठडा म्हणजेच वेदिका होय. हा बौद्घ शिल्पकलेतील एक वैशिष्ट्यपूर्ण घटक होय. महास्तूपानंतर उर्वरित दोन स्तूप नंतरच्या राजांनी बांधले. तसेच काही विहार, चैत्यगृहे आणि मंदिरे बांधली पण त्यांचा काल निश्चित नाही तथापि तेराव्या शतकापर्यंत हे बांधकाम चालू होते.
महास्तूपास इ. स. पू. पहिल्या शतकात चार दिशांस चार तोरणयुक्त प्रवेशद्वारे बांधण्यात आली. त्यांच्या उभारणीस पन्नास ते पाऊणशे वर्षांचा काळ लागला असावा. या तोरणांची उंची सु.१० मी. व रुंदी ६ मी. असून तोरणे हाच सांचीचा सर्वांत विलोभनीय कलाविष्कार आहे. येथील मूर्तिकाम उद्बोधक असून येथे ⇨ भारहूत प्रमाणे वेदिकेवर कोरीव काम नाही मात्र भारहूत येथील सर्व रूपके दृग्गोचर होतात. या तोरणांत पूर्व व उत्तर दिशेची तोरणे तुलनात्मक दृष्ट्या कलापूर्ण व वैविध्यपूर्ण अलंकरणाने युक्त आहे. दक्षिणेकडील तोरण सर्वांत प्राचीन असून ते सातवाहन राजा सातकर्णी याच्या पदरी असणाऱ्या आनंदनामक कलाकाराने दान दिल्याचा कोरीव लेखात उल्लेख आहे. प्रत्येक तोरणाची सर्वसाधारण वास्तुरचना सारखी असून अन्य ठिकाणच्या तोरणांप्रमाणे ती अंतर्वक्र नसून चौकोनी आहेत. स्तंभ पायात चौकोनी असून उतळ्यांवरचे सिंह, बुटके यक्ष आणि हत्ती हे जणू आपल्या मस्तकावर तोरणाचा भार पेलत आहेत, असे वाटते. प्रत्येक तोरणाच्या माथ्यावर एकावर एक असे तीन आडवे शिल्पपट्ट एकमेकांपासून अलग खोदले आहेत. कठडे व तोरणे यांचे स्वरूप पाहता आणि ते तयार करण्याची पद्घती यांवरून हे दगडी काम मुळातील लाकडी नमुन्याबरहुकूम बनविलेले असावे. दोन फलकांमध्ये दगडी खुंट्या ठोकून त्यांचा विलगपणा दृढतर केला आहे. येथील मूर्तिकामात बुद्घाची मूर्ती कुठेच आढळत नाही मात्र बुद्घाचे अस्तित्व धर्मचक्र, रिकामे सिंहासन, बुद्घ पादुका इ. सांकेतिक प्रतीकांतून व्यक्त करण्याचा प्रयत्न कलाकाराने केला आहे. याशिवाय बोधिवृक्षाखाली अशोक, त्याची राणी, राजपुत्र इ. मंडळी बुद्घाची पूजा करीत असतानाचे दृष्य आहे. त्याच ठिकाणी बुद्घाचे महाभिनिष्क्रमण, कश्यप ऋषींची कथा इ. शिल्पाकृती आढळतात. दक्षिण तोरणावर कमलवनातील लक्ष्मी, अशोकाची रामग्रामाची यात्रा, छदंत जातका तील कथाविषय इ. दृष्ये खोदली आहेत. पश्चिमेच्या तोरणावर हत्तींनी केलेली बोधिवृक्षाची पूजा, बुद्घाच्या अस्थींसाठी चाललेला अनुयायांतील झगडा, महाकपि, वेस्संतर आदी जातकांतील कथा यांचे चित्रण असून माराची बुद्घावर स्वारी, जेतवनदान इ. कथाविषयक दृष्ये कोरलेली आहेत. त्यांच्या डोक्यावर मध्यभागी एक चक्र व त्यावर त्रिशूल आहे. काही विद्वान हे त्रिशक्तीचे प्रतीक मानतात तर काही शिल्पज्ञ ते बुद्घ, धर्म व संघ या त्रिरत्नांचे प्रतीक मानतात. एकूण येथील शिल्पांकनात गौतमाच्या पूर्वजन्माच्या जातककथा त्याच्या चरित्रातील विविध प्रसंग, चार सिंह किंवा हत्तींचे त्रिरत्न चिन्ह यांसारख्या स्पष्टपणे धार्मिक आशय व्यक्त करणाऱ्या विषयांबरोबरच यक्ष-यक्षी, वृक्षिका अशी काही पारंपरिक रूपके आणि केवळ सुशोभनासाठी पशुपक्षी, लतापल्लव व भौमितिक रचनाबंध तोरणांवर कोरलेले आहेत. एकएक कथा व प्रसंग शिल्परूप करीत असताना त्या अनुरोधाने प्राकार, चैत्य, स्तूप, राजप्रासाद यांसारख्या वास्तू, त्यांतील आसने, मंचक, छत्रचामरे, मिरवणुकांच्या प्रसंगात सजविलेले हत्ती-घोडे आणि विविध पोषाखांतील विविध अलंकारांनी नटलेले स्त्री-पुरुष तपशिलांत कोरले आहेत. तसेच उभी, बसलेली, नृत्यात मग्न असलेली, मद्यपान केलेली, स्तूपापुढे नतमस्तक झालेली, प्रणयालापांत गुंग असलेली अशी अनेक युगुले दिसतात. येथील मूर्तिकामाचा आणखी एक विशेष म्हणजे त्यात दैनंदिन जीवनातील हरतऱ्हेचे प्रसंग कोरले आहेत. त्यांवरून तत्कालीन जीवनाची सुस्पष्ट कल्पना येते. येथील कलाकारांना मोरांविषयी विशेष आस्था होती. जागोजाग त्यांचे शिल्पांकन आढळते. एकूण येथील अलंकरणात अनेक विषय असून त्यात वैविध्य आहे. येथील मानवाकृती प्रमाणबद्घ, एकसंध, जिवंत व लालित्यपूर्ण असून त्यात गतिमानता आहे. सर्व मूर्ती पूर्ण उठावातील असल्यामुळे त्रिमिती छाया-प्रकाशाचा समतोल कलाकाराने साधला आहे.पूर्व दिशेच्या तोरणावरील सुप्रसिद्घ वृक्षी वा शालभंजिका या मूर्तीत हे कौशल्य प्रत्ययास येते. पारदर्शक तलम वस्त्रातील ही वृक्षिका प्रथम दर्शनी पूर्णतः नग्न वाटते व ती वृक्षाखाली जणू फांदीला लोंबकळत आहे, अशी खोदली आहे. तिची गतिमानता, पुष्ट वक्षःस्थळे आणि पृथुल नितंब तिच्या सौंदर्यात भर घालतात. तिच्या हातांत, कानांत आणि गळ्यात अलंकार आहेत. तोरणांवरील एकूण वृक्षिकांत गतिमानता आणि कमनीयता या दृष्टीने या वृक्षीचा क्रमांक उपलब्ध प्रतिमांत फार वरचा लागतो. बौद्घ कवी व लेखक अश्वघोषाने बुद्घचरितात तिची तुलना स्वर्गीय अप्सरेबरोबर केली आहे. या मूर्तीतून सुफलनाचा आविष्कार व्यक्त होतो, असे काही तज्ज्ञ मानतात.
येथील मंदिरे निरंधार (प्रदक्षिणामार्गविरहित) या सुरुवातीच्या विधान प्रकारातील असून गर्भगृह व मुखमंडप एवढी अंगे या वास्तुतून दृग्गोचर होतात. येथील विहार व चैत्यांचे स्वरूप परंपरागत असून बरीच पडझड झाली आहे तथापि येथील भग्न अवशेषांच्या संभारात एक अशोकस्तंभ असून त्यावरील ब्राह्मी लिपीत कोरलेल्या लेखात ‘लोकांनी आपापसांत भेदभाव वाढवू नये’ अशी आज्ञा आहे. याचे स्तंभशीर्ष (चार सिंहांचे) संग्रहालयात ठेवले आहे.
सांचीला अनेक उत्खनने झाली व अद्यापि प्रायोगिक तत्त्वावर उत्खनने होतात. कॅप्टन जॉन्सन याने १८२२ मध्ये केले तिसऱ्या स्तूपाचे उत्खनन आणि स्तूप वरून खाली खोदविला. त्यामुळे या वास्तूची नासधूस झाली. यात ⇨ सर अलेक्झांडर कनिंगहॅमला १८५१ मध्ये एक धातुपात्र सापडले. त्यात चार बौद्घ आचार्यांच्या अस्थी होत्या. सुरुवातीच्या उत्खननांत क्रमांक दोनच्या स्तूपात बुद्घाचे दोन प्रमुख शिष्य सारिपुत्त व मोग्गलान यांच्या अस्थींचे करंडक कनिंगहॅमला सापडले. ते त्याने लंडनला पाठविले पण स्वातंत्र्यानंतर ते १९५३ मध्ये भारतात आणून त्यांसाठी नवीन विहार बांधला. अलीकडील १९९६-९७ च्या उत्खननात पहिल्या शतकापासून पाचव्या शतकांदरम्यानचे काही वास्तुविशेष आढळले. शिवाय एक आहत नाणे, शक-क्षत्रपांची १७६ चांदीची नाणी आणि मोगलपूर्व काळातील तीन तांब्याची नाणी सापडली.
सांचीतील कलावशेषांत हस्तिदंत कलेतील सूक्ष्मपणा व तपशिलांची रेलचेल आहे. विदिशा नगरीत एका काळी हस्तिदंती कला प्रगत अवस्थेत होती. शिवाय या ठिकाणी शुंग, गुप्त काळातील व नंतरचे अनेक कोरीव लेख-दानलेख सापडले असून त्यांतील एका लेखात हस्तिदंती कलाकारांच्या दानाचा उल्लेख आहे, त्यावरून या कलाकारांचा प्रभाव या कलेवर जाणवतो.(चित्रपत्र).
संदर्भ : 1. Dhavalikar, M. K. Sanchi : A Cultural Study, Poona, 1964.
2. Marshall, Sir John Foucher, Alfred, The Monuments of Sanchi, 3 Vols., New Delhi, 1982.
3. Mitra, Debala, Sanchi, New Delhi, 2003.
४.देशपांडे, सु. र. भारतीय शिल्पवैभव, पुणे, २००६ पुनर्मुद्रण २०१२.
५. माटे, म. श्री. प्राचीन भारतीय कला, पुणे, १९७४.
देव, शां. भा. देशपांडे, सु. र.
“