सॅन होसे –२ : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी कॅलिफोर्निया राज्यातील सांता क्लॅरा परगण्याचे मुख्य ठिकाण व प्रमुख औद्योगिक शहर. लोकसंख्या ९,८९,४९६ (२०१२ अंदाज). पूर्वेकडील डियाब्लो पर्वतातील मौंट हॅमिल्टन व पश्चिमेकडील सांता क्रूझ पर्वत यांदरम्यान असलेल्या सांता क्लॅरा या सुपीक खोऱ्यात कॅयोटी व ग्वादलूप या नद्यांकाठी हे शहर वसले आहे. कॅलिफोर्नियाच्या पश्चिममध्य भागात असलेले सॅन होसे सॅन फ्रॅन्सिस्कोपासून आग्नेयीस ८० किमी.वर आहे.
कॅलिफोर्नियातील या पहिल्या नागरी वसाहतीची स्थापना होसे ख्वाकीन मोरागा या स्पॅनिश दर्यावर्दी समन्वेषकाने २९ नोव्हेंबर १७७७ रोजी केली. त्याचा हेतू हे स्थळ अन्य स्पॅनिश वसाहतींचा रसद तळ म्हणून लष्करी दृष्ट्या विकसित करण्याचा होता. ग्वादलूप नदीकाठावर वसलेले असल्याने आणि सेंट जोसेफ याच्या स्मरणार्थ त्याने त्यास ‘प्वेब्लो दे सॅन होसे दे ग्वादलूप’ हे नाव दिले. स्पॅनिश वसाहतकाळात व नंतर मेक्सिकन साम्राज्याच्या वेळी या स्थळाने गहू , भाजीपाला, दूध वगैरेंचा पुरवठा लष्कराला, विशेषतः माँतारे आणि सॅन फ्रॅन्सिस्को येथील संरक्षक दलांना, केला जात होता. अमेरिकेने ते हस्तगत केल्यानंतर (१८४६) ते कॅलिफोर्निया राज्याची काही वर्षे राजधानी होती (१८४९- ५२) इ. स. १८५० मध्ये त्यास शहराचा दर्जा देण्यात आला. त्याच सुारास सोन्याच्या खाणींच्या शोधामुळे या शहरास व्यापारी महत्त्व प्राप्त झाले. सॅन फ्रॅन्सिस्कोपासून येथपर्यंत लोहमार्ग आल्यानंतर (१८६४) त्याचा विकास व वाढ झपाट्याने झाली. लोहमार्गामुळे कृषी उत्पादने निर्यातीसाठी सॅन फ्रॅन्सिस्को बंदराकडे पाठविणे सुलभ झाले. परिणामतः सांता क्लॅरा खोऱ्यातील कृषी व दुग्ध व्यवसायाला चालना मिळाली.
विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत या नगरातील बहुतेक कारखाने सुक्या फळांच्या प्रक्रियेत तसेच फलोद्योग उपयुक्त वस्तू व कृषी अवजारांच्या निर्मितीत गुंतलेले होते. परिसरात द्राक्ष पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात होत असल्याने वाईन बनविण्याचे कारखाने येथे होते. दुसऱ्या महायुद्घकाळापासून (१९३९-४५) येथील कारखान्यांच्या स्वरूपात आमूलाग्र बदल झाले. कृषी उत्पादनांवरील प्रक्रिया उद्योग मागे पडून त्यांची जागा वेगाने वाढत गेलेल्या इतर कारखान्यांनी व व्यापाराने घेतली. विद्युत् उपकरणे, इलेक्ट्रॉनिक साहित्य, संगणक, यंत्रांचे व विमानांचे सुटे भाग, मोटारगाड्या, क्षेपणास्त्रे, अग्निबाण, रसायने, कृषी अवजारे, अन्न-प्रक्रिया उपकरणे, फुले, फळे, भाजीपाला इ. उत्पादने हवाबंद डब्यात भरणे, बेकरी उत्पादने, बीअर, गालीचे, कापड, गृहोपयोगी व उपभोग्य माल इ. वस्तूंची निर्मिती येथे होऊ लागली. १९७० –८० या दशकापासून सांता क्लॅरा खोऱ्याच्या अगदी उत्तर भागात सॅन होसे ते पॅलवल्तो या शहरांदरम्यानच्या ४० किमी.च्या विस्तृत क्षेत्रात ‘सिलिकन व्हॅली’ या नावाने औद्योगिक वसाहतींचा समुदाय स्थापन झाला आहे. संगणकशास्त्र आणि तत्संबंधीचे संशोधन, संगणक निर्मिती आणि व्यापारीकरण यांना चालना मिळाली. १९९० नंतर या क्षेत्रातील विशेष संशोधनात शास्त्रज्ञांनी लक्ष घातले असून संगणकाचा सर्व स्तरांवर कसा उपयोग करता येईल, हा विचार दृढमूल झाला. ‘सिलिकन व्हॅली’ या संगणकीय स्थळाने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे.
शैक्षणिक, सांस्कृतिक व प्रेक्षणीयस्थळ म्हणूनही सॅन होसे महत्त्वाचे आहे. येथे अनेक वस्तुसंग्रहालये आहेत. येथील रोझिकूशियन पार्कमध्ये ईजिप्शियन म्यूझीयम, सायन्स म्यूझीयम व कृत्रिम तारामंडळ तर केली पार्कमध्ये जपानी उद्यान व प्राणिसंग्रहालय आहे. सॅन होसे हिस्टॉरिकल म्यूझीयम, स्टेट हाउस म्यूझीयम, ट्रिटॉन म्यूझीयम ऑफ आर्ट, युथ सायन्स इन्स्टिट्यूट इ. प्रसिद्घ व प्रेक्षणीय आहेत. येथील सॅन होसे स्टेट युनिव्हर्सिटी (१८६२) हे कॅलिफोर्निया राज्यातील सर्वांत जुने विद्यापीठ असून तिथे कलावीथी आणि सॅन होसे सिटी कॉलेज आहे. युनिव्हर्सिटी ऑफ सांता क्लॅराच्या पटांगणात ‘द मिशन ऑफ सांता क्लॅरा’ची इ. स. १७९७ मधील प्रतिकृती आहे. ॲलम रॉक पार्क (क्षेत्र २७८ हे.) नावाने ओळखले जाणारे म्यूनिसिपल करमणूक-स्थळ येथे असून तेथे खनिज पाण्याचे झरे आहेत. येथील न्यू आल्मदेन क्विकसिल्व्हर माईन्स प्रदर्शन पाहण्यासारखे आहे. अनेक कृत्रिम जलाशयांची निर्मिती येथे करण्यात आलेली आहे. येथील म्यूनिसिपल गुलाब पुष्प उद्यान प्रसिद्घ असून त्यात अमेरिकेतील उत्तमोत्तम गुलाबाच्या फुलांच्या जाती आढळतात. पहिले विश्व मराठी साहित्यसंमेलन गंगाधर पानतावणे ह्यांच्या अध्यक्षतेखाली येथे झाले (२००९). एक निवासी शहर म्हणूनही सांता क्लॅरा खोऱ्यात याचा विस्तार वेगाने वाढला आहे.
देशपांडे, सु. र.