सॅलिकेसी : (वाळुंज कुल). फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति,आवृतबीज उपविभाग] सॅलिकेलीझ (वाळुंज) गणातील हे एकमेव कुल आहे. जे. सी. विलिस यांनी या कुलांत फक्त तीन प्रजाती व सु. ६३० जाती समाविष्ट केल्या असून त्या बहुतेक पानझडी वृक्ष किंवा ⇨ क्षुप (झुडपे) आहेत.
(१) सॅलिक्स (विलो या इंग्रजी नावाने ओळखल्या जाणाऱ्या झाडांची) प्रजाती उत्तर समशीतोष्ण कटिबंध, मध्य यूरोप, हिमालय व उत्तर अमेरिका या ठिकाणी आणि उष्णकटिबंधीय प्रदेशांत आढळते.
(२) पॉप्यूलस (पॉप्लर या इंग्रजी नावाने ओळखल्या जाणाऱ्या झाडांची) प्रजाती फक्त समशीतोष्ण कटिबंधात आढळते.
(३) चोसेनिया प्रजातीची एकच जाती ईशान्य आशियात आढळते.
द्विदलिकित वर्गातील वनस्पतींच्या कुलात सॅलिकेसी कुलाला प्रारंभिक स्थान दिले गेलेले आहे. ⇨जुग्लँडेलीझ (अक्रो ड) कुलाशी त्याचे जवळचे नाते असल्याचे सिद्घ झाले आहे तथापि ⇨जॉन हचिन्सन यांच्या मते सॅलिकेसी हे प्रगत कुल असून त्याचे परिदलमंडल ऱ्हसित आहे. ⇨ फिलिप व्हॅन टीघेम यांनी सॅलिकेसीचे पायपरेसीशी आप्तभाव असल्याचे दर्शविले आहे. याला जे. वेलोनोव्हस्की, ए. जे. ईम्स व एम्. जे. फिशर यांनी पाठिंबा दिला आहे. ह्या कुलात त्वक्षाकर [बुचासारखा पदार्थाचा संचय करणाऱ्या कोशिकांची (पेशींची) निर्मिती करणारे ऊतक ⟶ त्वक्षा] अपित्वचेत निर्माण होतो. जून वृक्षात शाकीय प्ररोह व ऱ्हस्व प्ररोह असे दोन फांद्यांचे प्रकार आढळतात. पाने साधी, एकाआड एक, सोपपर्ण (तळाशी उपांगे असलेली) व पतिष्णु (गळून जाणारी) फुलोरा दाट, उभा किंवा लोंबते (नत) कणिश असून नवी पाने येण्यापूर्वी तो आलेला आढळतो. फुले बहुधा एकलिंगी व भिन्न झाडांवर असतात. पापुद्र्या सारख्या छदांच्या बगलेत फूल येते. परिदले नसतात लहान पेल्यासारखे किंवा विविध प्रकारचे मधुरसयुक्त प्रपिंडीय (ग्रंथियुक्त) बिंब किंवा खवले असतात. केसरदले (पुं-केसर) दोन किंवा अधिक व सुटी स्त्री-पुष्पात दोन जुळलेली किंजदले (स्त्री-केसर) किंजपुटात एकच कप्पा बीजके (अपक्व बीजे) अनेक, अधोमुख व तटलग्न (आतील बाजूस चिकटलेली) बोंड २–४ शकलांत फुटते बिया अनेक, अपुष्क (गर्भाबाहेर अन्नांश नसलेल्या), लहान व प्रत्येकीवर केसांचा झुबका असतो. सॅलिक्स प्रजातीतील जातींच्या लाकडांपासून उत्तम लोणारी कोळसा मिळतो. कोवळ्या फांद्यांच्या टोपल्या करतात. विलोच्या काही जातींच्या लाकडाचा वापर क्रिकेट बॅटकरिता करतात. नद्यांच्या काठाने वाळुंजाच्या जाती आढळतात.
पहा : पॉप्लर बहान वाळुंज.
संदर्भ : 1. Lawrence, G. H. M. Taxonomy of Vascular Plants, New York, 1965.
2. Mitra, J. N. An Introduction to Systematic Botany andEcology, Calcutta, 1964.
परांडेकर, शं. आ. जमदाडे, ज. वि.