सॅलिंजर, जेरोम डेव्हिड : (१ जानेवारी १९१९–२७ जानेवारी २०१०). अमेरिकन कथा-कादंबरीकार. जन्म न्यूयॉर्क शहरी. त्याचे वडील ज्यू होते आई ख्रिस्ती. न्यूयॉर्कमधील एका सैनिकी शाळेत व मॅनहॅटन पब्लिक स्कूलमध्ये त्याने शालेय शिक्षण घेतले. न्यूयॉर्क आणि कोलंबिया विद्यापीठांतून काही काळ शिक्षण घेतल्यानंतर त्याने स्वतःस लेखनाला वाहून घेतले. १९४० पासून त्याच्या कथा प्रसिद्घ होऊ लागल्या. १९४२-४६ ह्या काळात तो अमेरिकी सैन्यात होता. त्याच्या काही उत्कृष्ट कथांतून त्याचे युद्घातील अनुभव आलेले आहेत. अशा कथा मुख्यत्वे द न्यू यॉर्कर मासिकातून प्रसिद्घ झाल्या. १९५१ साली प्रसिद्घ झालेल्या द कॅचर इन द राय ह्या त्याच्या एकमेव कादंबरीला सर्वसाधारण वाचक, साहित्यसमीक्षक तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्याकडून उत्तम प्रतिसाद आणि मान्यता प्राप्त झाली. वसतिगृहातून पळून गेलेल्या एका बंडखोर, हळव्या व अंतर्मुख कुमाराचे जीवन ह्या कादंबरीत त्याने प्रत्ययकारी शैलीत रंगविले आहे. याशिवाय त्याने फॉर एझ्मी वीथ लव्ह अँड स्क्वॉलर (१९५०), नाइन स्टोरीज (१९५३), फॅनी अँड झूई (१९६१), रेझ हाय द रूफ बीम, कार्पेंटर्स अँड सीमोर : ॲन इंट्रोडक्शन (१९६३) व हॅपवर्थ (१९९७) इ. कथासंग्रह लिहिले. त्यांतील पहिल्या कथासंग्रहात त्याच्या नाइन स्टोरीज याचा अंतर्भाव होतो. ह्यांतील कथांतूनही कुमारजीवनाचे चित्रण आहे. आधुनिक अमेरिकन कुमारजीवनाचे सहानुभूतिपूर्ण दर्शन घडविण्यात यशस्वी झालेला लेखक म्हणून सॅलिंजरची ख्याती आहे. १९५३ साली न्यू हँपशर येथील एका खेड्यात त्याने एकांतवास पत्करला. त्याच्या एकांतवासामुळे आणि प्रसिद्घीपासून दूर राहण्याच्या प्रवृत्तीमुळे त्याच्याभोवती गूढतेचे एक वलय निर्माण होऊन तो एक चर्चेचा विषय बनला आहे. कॉर्निश (न्यू हँ पशर) येथे त्याचे निधन झाले.
नाईक, म. कृ.
“