विल्यम्स, विल्यम कार्‌लॉस : (१७ सप्टेंबर १८८३–४ मार्च १९६३). आधुनिक अमेरिकन कवी. जन्म रदरफर्ड, न्यू जर्सी येथे. आरंभीचे शिक्षण न्यूयॉर्क सिटी आणि स्वित्झर्लंडमध्ये. त्यानंतर पेनसिल्व्हेनिया विद्यापीठात वैद्यकाचा अभ्यास करून पदवी मिळवली (१९०६). १९१० ते १९५१ पर्यंत रदरफर्डमध्येच त्याने वैद्यकीय व्यवसाय केला. वैद्यकीचा व्यवसाय करीत असतानाच विल्यम्सने कविता, कथात्मक साहित्य, समीक्षात्मक निबंध असे लेखन केले. पोएम्स (१९०९). नंतर निघालेले द कलेक्टेड लेटर पोएम्स (१९५०) आणि द कलेक्टेड अर्लिअर पोएम्स (१९५१) हे त्याचे कवितासंग्रह विशेष निर्देशनीय आणि महत्त्वाचे आहेत. विद्यापीठीय शिक्षण घेत असतानाच विख्यात अमेरिकन कवी ⇨एझरा पाउंड ह्याच्याशी त्याची मैत्री झाली. १९१२–१४ ह्या काळात अमेरिकन साहित्यातील प्रतिमावादी कवींचे नेतृत्व पाउंडने केले होते. प्रतिमावाद्यांचा पहिला जाहीरनामाही त्याने लिहिला होता. प्रतिमावादाचा विल्यम्सवर पडलेला प्रभाव त्याच्या पोएम्स आणि द टेंपर्स (१९१३) ह्या आरंभीच्या काव्यग्रंथांत दिसून येतो. वॉल्ट व्हिटमनचाही विल्यम्सच्या कवितेवर प्रभाव होता. साहित्यातील देशीपणाचाही (नेटिव्हिटी) विल्यम्सचा आग्रह होता. पेटर्‌सन (५ भाग, १९४६–५८) हे न्यू जर्सीमधील एका शहरातील आधुनिक माणसाचे चित्रण करणारे दीर्घकाव्य ह्या संदर्भात लक्षणीय आहे. विसाव्या शतकातील महत्त्वाच्या तत्वचिंतनात्मक अमेरिकन कवितांत ह्या कवितेचा अंतर्भाव होतो. मोजक्या शब्दांत विविध विषयांचे उठावदार व रेखीव चित्रण करण्याची धडपड हे विल्यम्सच्या कवितेचे एक लक्षणीय वैशिष्ट्य. व्यवहारातील भाषा नेमकी पक़डून ती काव्याच्या पातळीवर नेण्याचे त्याचे कौशल्य त्याच्या कवितेतून प्रत्ययास येते. पिक्चर्स फ्रॉम ब्ऱ्यूद्येल (१९६३) ह्या त्याच्या काव्यग्रंथाला पुलिट्‌झर पुरस्कार मिळाला.

विल्यम्सच्या गद्यलेखनात द ग्रेट अमेरिकन नॉव्हेल (१९२३, निबंध), इन द अमेरिकन ब्रेन (१९२५ , निबंध), द नाइफ ऑफ द टाइम्स (१९३२), लाइफ अलॉंग द पसेइक रिव्हर (१९३८, समाजवर्णने), मेक लाइट ऑफ इट (१९५०) आणि द फार्मर्स डॉटर्स (१९६१) हे कथासंग्रह ए व्हॉयेज टू पेगनी (१९२८), व्हाइट म्यूल (१९३७), इन द मनी (१९४०) आणि द बिल्ड अप (१९५२) ह्या चार कादंबऱ्या ह्यांचा समावेश होतो. त्याने आत्मचरित्रही-ॲन ऑटोबायग्राफी (१९५१)– लिहिले आहे.

रदरफर्ड येथेच तो निधन पावला.

संदर्भ : 1. Breslin, James E. William Carlos Williams:An American Artist, Oxford, 1970.

           2. Conarroe, Joel, William Carlos Williams, Paterson: Language and Landscape, Oxford, 1970.

           3. Weaver, Mike, William Carlos Williams, Cambridge, 1971.

नाईक, म. कृ.