सॅरासेनिएलीझ : (कलशपर्णी गण). फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] कीटकभक्षक (मांसाहारी) वनस्पतींचा एक गण. याचा समावेश ⇨ आडोल्फ एंग्लर व के. प्रांट्ल यांच्या वर्गीकरणाप्रमाणे आर्किक्लॅमिडी नावाच्या उपवर्गात एक गण म्हणून केला आहे. यातील वनस्पतींच्या फुलात सुट्या पाकळ्या असतात किंवा त्या नसतात. सॅरासेनीएलीझ गणाचा समावेश ⇨ जॉन हचिन्सन यांनी हर्बेसी गटात, तर ए. एल्. तख्तजान यांनी रॅनन्क्युलॉइडी गटात केलेला आहे. या गणातील वनस्पती ⇨ ओषधी असून त्यांना एकाआड एक व कीटकभक्षणासाठी रसांतरित पाने (कलशासारख्या पानांवरून गणाचे व कुलाचे नाव येथे सुचविले आहे) व नियमित फुले असतात. फुले अवकिंज व अंशतः किंवा पूर्णतः चक्रीय (पुष्पदलांची अनेक मंडले असलेली) असतात [⟶ फूल]. परिदले सर्व सारखी किंवा संदले व प्रदले (पाकळ्या) परस्परांहून भिन्न असतात. तीन ते पाच किंजदलांच्या (स्त्री-केसरांच्या) संयुक्त व ऊर्ध्वस्थ किंजपुटात अक्षलग्न किंवा तटलग्न बीजकविन्यास (किंवा किंजपुटाच्या भिंतीवर बीजकांची मांडणी) असून तीन किंवा अधिक बीजके असतात बिया सपुष्क (गर्भाबाहेर अन्नांश असलेल्या) असतात. या गणात सॅरासेनिएसी, नेपेंथेसी व ड्रॉसेरेसी या तीन लहान कुलांचा समावेश करतात. तख्तजान यांनी सॅरासेनिएलीझ गण पॅपॅव्हरेलीझ (अहिफेन)गणाच्या बाजूस ठेवला असून त्यात फक्त सॅरासेनिएसी हे एकच कुल दाखविलेले आहे.

सॅरासेनिएसी : (कलशपर्णी कुल). जॉर्ज बेंथॅ व सर विल्यम जॅक्सन हूकर यांच्या पद्घतीत या कुलाचा अंतर्भाव पराएटेलीझ गणामध्ये केलेला आढळतो. यातील वनस्पती बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणाऱ्या) असून पाने कलशाप्रमाणे व जमिनीवर गुच्छाप्रमाणे पसरलेली, नळीसारखी व कित्येकदा पंखयुक्त आणि टोकांस लहान पाती असलेली दिसतात. द्विलिंगी फुले स्वतंत्र अक्षावर (पुष्पबंधाक्षावर) एकटी किंवा मंजरीवर अनेक येतात संदले ४-५ सुटी, दीर्घस्थायी व रंगीत असतात. पाकळ्या पाच व सुट्या केसरदले असंख्य किंजदले ३-५ व जुळलेली असून ऊर्ध्वस्थ किंजपुटात ३-५ कप्पे व अनेक अक्षलग्न बीजके असतात. बोंडात सपुष्क बीजे व फळ कप्प्यांच्या बाजूवर असून ते तडकते. या कुलात तीन प्रजाती (सॅरासेनिया, हेलिअँफोराडार्लिंग्टोनिया) आणि सु. १४ जाती असून त्यांचा प्रसार अमेरिकेत आहे ⇨ पॅपॅव्हरेसी (अहिफेन) कुलाशी याचे आप्तभाव आहेत.

नेपेंथेसी : (घटपर्णी कुल). या कुलात नेपेंथस ही एकच प्रजाती असून तीत सु. ६० जाती (जे. सी. विलिस : दोन प्रजाती व ६८ जाती) समाविष्ट आहेत. हचिन्सन यांनी हे कुल ॲरिस्टोलोकिएलीझ (सापसंद-ईश्वरी) गणात घातले आहे. या वनस्पती लहान, वर चढणाऱ्या (आरोही) झुडपासारख्या असून खोड जाडसर व भूमिगत असते. पानांचा उपयोग चढण्याकरिता व कीटकांना आकर्षित करून पकडण्याकरिता केला जातो. पानाचा देठ पंखयुक्त, मध्यशीर स्पर्शग्राही प्रतान (ताणा) व टोकाचा भाग कलशयुक्त (घट वा चंबुयुक्त) असतो. फुले एकलिंगी, लहान, हिरवट व परिमंजरीवर आणि स्वतंत्र झाडांवर येतात फुलात दोन संदले व दोन प्रदले नर-फुलात ४-२४ केसरदले जुळून वाढतात परंतु परागकोश अलग असतात. स्त्री-फुलात तीन ते चार कप्प्यांच्या (व किंजदलांच्या) ऊर्ध्वस्थ किंजपुटात अनेक अक्षलग्न बीजके असून बोंड कप्प्यांच्या बाजूवर तडकते. बीजे लांबट, केसाळ टोकांची, अनेक व सपुष्क असतात. या वनस्पती मूळच्या बोर्निओतील असून दक्षिण चीनमध्ये व ऑस्ट्रेलियात आणि आशियातील उष्ण भागात (आसामात व इंडोमलायात) आढळतात. अमेरिकेत एकही जाती एतद्देशीय नाही. ॲन्युरोस्पर्मा प्रजातीतील एका जातीचा अंतर्भाव नेपेंथसमध्येच करतात. काही जाती ⇨अपिवनस्पती असतात ने. ॲम्पुलॅरिया ची काही पाने प्रतानयुक्त असून घटाचा पूर्ण अभाव असतो, तर काही पानांचे देठयुक्त घटात रुपांतर होऊन त्यांचा एक गुच्छ जमिनीतून वाढलेला आढळतो. एक नवलपूर्ण वनस्पती म्हणून काही जातींची व संकरजांची लागवड करतात. घटात पडलेल्या व बुडून मेलेल्या कीटकांवर एंझाइमांची क्रिया होऊन त्यांचे शोषण वनस्पती करते. ने. राजा (बोर्निओ) याचा घट सु. एक मीटर लांब असतो.

ड्रॉसेरेसी : (कीटाश कुल). या कुलात एकूण चार प्रजाती व सु. ९० जाती आहेत (विलिस : १०५ जाती). त्यांचा प्रसार सर्वत्र असून विशेषतः अम्लयुक्त दलदलीत परंतु सर्वसाधारणपणे ओलसर ठिकाणी त्या भरपूर प्रमाणात आढळतात. ड्रॉसेरेसी व नेपेंथेसी या दोन कुलांचा समावेश तख्तजान यांनी रोझिडी उपकुलात केला आहे व ⇨ सॅक्सिफ्रागेसी (पाषाणभेद) कुलाशी त्यांचा आप्तभाव दाखविला आहे. रिचर्ड वेस्टाइन व इतर शास्त्रज्ञांनी या कुलाचा अंतर्भाव पराएटेलीझ गणात केला असून इतरांनी ⇨लेंटिब्युलॅरिएसी (दृतिपर्ण) कुलाशी साम्य दर्शविले आहे. या कुलातील वनस्पती वर्षायू (एक वर्षभर जगणाऱ्या) किंवा बहुवर्षायू प्रपिंडीय (ग्रंथियुक्त) ओषधी किंवा लहान झुडपासारख्या असून जमिनीजवळ साध्या पानांचा गुच्छ असतो त्यांना बहुधा पातळ उपपर्णे असतात काहींत कळीमध्ये ही पाने टोकापासून तळाकडे गुंडाळलेली असून बहुधा त्यांवर दोन्ही बाजूंस (डायोनिया त फक्त एका बाजूस) प्रपिंडयुक्त केस असतात त्यांच्या साहाय्याने ती पाने कीटकांना आकर्षून घेतात व त्यांचा अन्न म्हणून उपयोग करतात (त्यावरून कुलनाम). काहींत (ॲल्ड्रोव्हँडाडायोनिया) स्पर्शग्राही पाने स्पर्शाने मिटतात व पुढे पकडलेले मृत कीटक पचवितात या दोन्ही वनस्पतींत देठ सपाट पानांसारखा असून पात्यांचे रूपांतर चापासारख्या संरचनेत झालेले असते. फुले द्विलिंगी, नियमित, एकाकी किंवा अनेक मंजरींवर येतात. ती चतुर्भागी किंवा पंचभागी व अवकिंज असतात. संदले पाच व जुळलेली आणि पाकळ्या पाच असतात. केसरदले पाच, क्वचित अधिक व सुटी परागांच्या चौकड्या असतात. दोन ते पाच जुळलेल्या किंजदलांच्या ऊर्ध्वस्थ किंजपुटात बहुधा तटलग्न बीजकविन्यास (आतील भागांवर चिकटलेली बीजके) असून तीन ते अनेक बीजके असतात [⟶ फूल]. बोंड कप्प्यावर तडकते व बिया सपुष्क असतात.

ड्रॉसेरा, डायोनिया, ॲल्ड्रोव्हँडाड्रॉसोफायलम या ड्रॉसेरेसी कुलातील चार प्रजाती आहेत. ड्रॉसोफायलम ची एक जाती पोर्तुगाल, दक्षिण स्पेन व मोरोक्को येथे आढळते. डायोनिया (कॅरोलिनात) व ॲल्ड्रोव्हँडा (अमेरिकेखेरीज इतरत्र) यांच्याही एकेकच जाती आहेत. ड्रॉसेरा च्या (इं. सनडयू) सर्वांत जास्त (सु. ८०–८५) जाती ऑस्ट्रेलियात असून काही थोड्या इतरत्र आढळतात. डायोनिया चा अंतर्भाव डायोनिएसी या स्वतंत्र कुलात करतात. ड्रॉ. पेल्टेटा, ड्रॉ. इंडिका, ड्रॉ. बर्मनी आणि ॲ. व्हेसिक्युलोसा इ. जाती भारतात सामान्यपणे आढळतात. ॲल्ड्रोव्हँडा बांगला देशातही आढळते.

पहा : कीटकभक्षक वनस्पति.

संदर्भ : 1. Lawrence, G. H. M. Taxonomy of Vascular Plants, New York, 1965.

2. Mitra, J. N. An Introduction to Systematic Botany and Ecology, Calcutta, 1964.

3. Takhatajan, A. L. A System of Phylogeny of the Flowering Plants, Edinburg, 1969.

परांडेकर, शं. आ.