सॅफो : (इ. स. पू. सु. ६१०/६१२– ५७०/५८०?). प्राचीन ग्री क कवयित्री. जन्म पूर्व इजीअन समुद्रातील लेझ्बॉस (मिटलीनी) ह्या बेटावर एरिसस येथे. तिच्या जीवनाविषयी निश्चित अशी माहिती मिळत नाही तथापि तिचा विवाह अँड्रस बेटावरील सर्सिलस या श्रीमंत व्यापाऱ्याशी झाला होता आणि तिला क्लिस नावाची एक मुलगी होती. लेझ्बॉस बेटावरील जाचक राजकीय परिस्थितीमुळे तिला काही काळ (काहींच्या मते उरलेले सारे आयुष्य) सिसिलीत जाऊन राहावे लागले, असे म्हटले जाते.
सॅफोच्या भोवती तिच्या वाङ्मयप्रेमी तरुण मैत्रिणींचे एक वर्तुळच (थिॲसस) तयार झाले होते. त्यात या तरुणींना नृत्य, संगीत आणि काव्य यांचे शिक्षण मिळत असे. तसेच सॅफोप्रमाणेच कविता करणे, एकमेकींना आपल्या कविता वाचून दाखविणे, हा ह्या मैत्रिणींचा आवडता छंद होता आणि ह्या वर्तुळाचे नेतृत्व सॅफोकडे होते. उत्कट जिव्हाळ्याच्या भावबंधाने बांधलेल्या अशा ह्या मैत्रिणी होत्या. प्रेम आणि सौंदर्य ह्यांची ग्री क देवता ⇨ ॲफ्रो डाइटी हिची उपासना ही ह्या मैत्रिणींच्या वर्तुळात चालत असे, असे दिसते. गीक तत्त्वज्ञ ⇨सॉक्रे टीस ह्याच्या भोवती निर्माण झालेल्या तत्त्वचिंतकांच्या वर्तुळाशी सॅफोच्या ह्या वर्तुळाची तुलना केली गेलेली आहे.
सॅफोची कविता आज अत्यंत त्रुटित स्वरूपात उपलब्ध आहे. मुळात ती बरीच असली पाहिजे कारण इ. स. पू. तिसऱ्या शतकात तिची कविता नऊ भागांत संकलित केली गेली होती. हे संकलन मध्ययुगात नष्ट झाले (१०७३) तथापि ईजिप्तमधील ऑक्सिरिंकस येथील उत्खननात (१८९७) तिच्या कवितेचे काही अंश पपायरसवरील लेखनाच्या स्वरूपात उपलब्ध झाले आहेत.
कोमल आणि विशुद्घ प्रेभावनेचा तीव्र आविष्कार, हे सॅफोच्या कवितेचे लक्षणीय वैशिष्ट्य होय. तिच्या अनेक कविता तिच्या मैत्रिणींना उद्देशून लिहिलेल्या आहेत. प्रेमाच्या स्मृती, प्रिय व्यक्तींच्या वियोगाची वेदना ती इतक्या थेटपणे आपल्या कवितांतून व्यक्त करते की, त्यांना अलंकरणाची आवश्यकताच उरत नाही. किंबहुना ह्या थेटपणामुळेच तिच्या कवितांतील भावस्पंदन आजही जिवंत वाटते. तिच्या भाव-जीवनातील अनेक उत्कट क्षणांचा प्रत्ययही तिच्या कवितांतून येतो. तिची एकंदर कविता ही तिच्या स्त्रीत्वाची अत्यंत नाजूक आणि मृदुल अशी अभिव्यक्ती आहे. प्रेमातून निर्माण होणाऱ्या चिंतेतून आणि अस्वस्थतेतून आपणास मुक्त करावे, अशी प्रार्थनाही ती ॲफोडाइटीला करते.
भोवतालच्या सुंदर निसर्गाचे भानही तिच्या कवितेला आहे. फुलांचे बहर घेऊन येणारा वसंतऋतू, सफरचंदांच्या बागेतून झुळझुळत जाणारे पाणी आणि प्रकाशाची एकेक कला वाढवीत पूर्णत्वाकडे जाणारा चंद्र हेही तिच्या कवितेत खोल आनंदभावना घेऊन येतात.
तिने आपल्या कवितेसाठी अनेक छंद वापरले. त्यांतील ‘सॅफिक’ हा छंद तिच्या नावाशी निगडित झालेला आहे. सॅफोने मुख्यत्वे स्थानिक लेस्बियन-ईऑलिक बोलीभाषेत काव्यरचना केली आहे. प्रख्यात गीक तत्त्ववेत्ता ⇨प्लेटो यानेही तिच्या कवितेची प्रशंसा केली होती, असे म्हटले जाते. श्रेष्ठ रोमन कवी ⇨काटलस ह्याच्यावर तिच्या कवितेचा फार मोठा प्रभाव होता.
पहा : गीक साहित्य (भाव कविता).
संदर्भ : Durant, Will, The Life of Greece, New York, 1939.
कुलकर्णी, अ. र.