सॅनिडीन : हे अल्कली फेल्स्पारांपैकी एक खनिज असून ⇨ऑर्थोक्लेजाचा (KAlSi3O8) हा काचेसारखा प्रकार आहे. ऑर्थोक्लेजातील ५० टक्क्यांपर्यंत पोटॅशियमाच्या जागी सोडियम येऊन सॅनिडीन तयार होते. सॅनिडिनाचे स्फटिक स्वच्छ काचेसारखे दिसणारे, वडीसारखे चापट व पारदर्शक असतात. स्फटिक एकनताक्ष व चौरस प्रचिनाकार असून त्यांत कार्ल्सबाड यमलन सामान्यपणे आढळते [⟶ स्फटिकविज्ञान]. ⇨ पाटन (001) चांगले सामान्यपणे रंगहीन चमक काचेसारखी व पाटनपृष्ठावर मोत्यासारखी कस पांढरा वि. गु. २.५५– २.७६ कठिनता ६. हा ऑर्थोक्लेजाचा उच्च (७००° से. पेक्षा अधिक) तापमानाला अधिक स्थिर राहणारा प्रकार असून याच्या प्रकारांत सोडियम प्रमुख घटक असतो व सोडा ऑर्थोक्लेजाशी ते निगडित असतात. भूकवचात कधीकधी आढळणारे सॅनिडीन जलदपणे थंड झालेले असते. त्यामुळे त्याच्या स्फटिक जालकात सिलिकॉन व ॲल्युमिनियम या अणूंची वाटणी विस्कळीतपणे झालेली असते. यामुळे याची संरचना अव्यवस्थित असते. सॅनिडीन मालेतील ऑर्थोक्लेज व मायक्रो क्लीन या खनिजांत संरचना पूर्णपणे व्यवस्थित होत गेलेली आढळते. सॅनिडीन मालेतील ऑर्थोक्लेज ४० टक्क्यांहून कमी असणाऱ्या मधल्या घटकांना ॲनॉर्थोक्लेज म्हणतात आणि सोडियमाचे प्रमाण विपुल असणाऱ्या ज्वालामुखी खडकांत त्यांचे स्फटिक आढळतात (उदा., सिसिलीमधील पँटेलॅरिया अँडेसाइटी लाव्हा). सॅनिडिनाचे स्फटिक भूवैज्ञानिक दृष्ट्या अलीकडच्या काळातील न बदललेल्या सिकत (सिलिकेचे प्रमाण अधिक असलेल्या) ज्वालामुखी खडकांत (उदा., रायोलाइट, ट्रॅकाइट,फोनोलाइट) जडवलेले आढळतात. सॅनिडीन हे किलिमांजारो (टांझानिया ), माउंट केन्या (केन्या), यलोस्टोन नॅशनल पार्क (वायोमिंग, अमेरिका) व ऱ्हाइनलँड (जर्मनी) येथे आढळते.

सॅनिडिनाचे स्फटिक वडीसारखे असल्याने फलक अर्थाच्या ग्रीक शब्दावरून हे नाव पडले आहे. याची ग्लासी फेल्स्पार, आइस फेल्स्पार व रायाकोलाइट ही पर्यायी नावे आहेत. सॅनिडिनासारखे असलेले नॅट्रॉन सॅनिडीन यूगोस्लाव्हियातील सोडा डायपराइट या खडकात आढळते. रूपांतरित खडकांच्या खनिज ⇨ संलक्षणी वर्गीकरणात सॅनिडीन संलक्षणी हा प्रमुख विभाग आहे.

पहा : फेल्स्पार गट.

ठाकूर, अ. ना.